डॉ. सुनीलकुमार लवटे
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे वडील बाळाजीपंत कृष्ण जोशी यांची अशी इच्छा होती की, पूर्वजांचे आणि आपले जीवन वैदिकी, याज्ञिकी, भिक्षुकीत गेले, तर मुलगा लक्ष्मणाने तरी संस्कृत पंडित म्हणून नाव कमवावे म्हणून त्यांनी लक्ष्मणास आठवे वर्ष लागताच शाळा सोडून घरी वेद शिकविण्यास सुरुवात केली. हे वेदाध्ययन तेराव्या वर्षापर्यंत चालले. हे शिक्षण शास्त्रोक्त पद्धतीने व्हावे म्हणून गुरुकुलाचा शोध सुरू झाला. त्या काळी हरिद्वार येथील स्वामी श्रद्धानंद यांनी चालविलेले गुरुकुल प्रसिद्ध होते. तिथे जाण्याचा लक्ष्मणाचा मानस होता; पण वडिलांचे मित्र देवकुळे त्या वेळी पिंपळनेर परिसराचे वनाधिकारी होते. ते मूळचे वाईचे. त्यांच्याकडून वडिलांना वाईच्या प्राज्ञपाठशाळेची आणि गुरू नारायणशास्त्री मराठे यांची माहिती मिळाली. हरिद्वारपेक्षा वाई जवळ, असा विचार करून वयाच्या १३ व्या वर्षी सन १९१४ ला वडिलांनी त्यांना ब्रह्मीभूत स्वामी केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) यांच्या पायाशी आणून सोडले. (इति तर्कतीर्थ)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरू नारायणशास्त्री मराठे बालब्रह्मचारी होते. वाईतील त्यांचा प्राज्ञमठ हे प्राचीन पद्धतीचे गुरुकुल होते. त्या वेळी तिथे ३०-३५ विद्यार्थी संस्कृत साहित्य, न्याय, व्याकरण इत्यादी शास्त्रे, वेदवेदांगे आणि वेदान्त यांचे अध्ययन करीत. गुरुवर्यांची मठावर २४ तास देखरेख असे. सोमवारी सुट्टी असे. त्या दिवशी अंगमेहनतीची कामे करावी लागत. सारवणे, शौचकूप सफाई, तसेच अन्य कामांचा त्यात समावेश होता. सायंकाळी ४ ते ६ व्याकरणे, पुराण प्रवचने चालत. त्यानंतर मंत्रपुष्प व शास्त्रचर्चा होत असे. शास्त्रार्थ चर्चा अर्थातच संस्कृतमध्ये होत असे. प्राज्ञपाठशाळेत स्वदेशीचा महिमा होता. सर्व विद्यार्थी साखरेचे व्रत पाळत. (विदेशी म्हणून ती खात नसत.) या आश्रमीय जीवनात ब्रह्मचर्यास असाधारण महत्त्व होते. म्हणून गुरुजी काव्य, नाटक, प्रबंधांतील शृंगारप्रधान सर्ग गाळून उर्वरित शिकवत. (विद्यार्थी मात्र ते शोधून-शोधून वाचीत.)

हेही वाचा : अन्वयार्थ : माफीने मणिपुरात सलोखा दिसेल?

त्या वेळी प्राज्ञपाठशाळेचे वातावरण पठडीतील वेदशाळेपेक्षा टिळक-आगरकर परंपरेच्या राष्ट्रीय शाळेचे होते. त्यामुळे असेच शिक्षण देणाऱ्या प्रा. वि. गो. विजापूरकरांच्या तळेगाव दाभाडे येथील समर्थ विद्यालयावर ब्रिटिशांनी बंदी घातल्यावर तेथील विद्यार्थी आणि शिक्षक वाईच्या प्राज्ञपाठशाळेत आले. येथे मराठेशाही का बुडाली व ब्रिटिश साम्राज्य का स्थापन झाले, यावर खल होई. स्वामी विवेकानंद, टिळक, अरविंद घोष यांच्या जीवननिष्ठेवर तासन् तास चर्चा होत असे. स्वामी दयानंदांच्या ‘सत्यार्थप्रकाश’ची आलोचना चाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जप्त केलेल्या ‘मॅझिनीचे चरित्र’चे गुप्त वाचन होई. आपला देश पाश्चिमात्य देशांपेक्षा मागे का, या प्रश्नाचा ऊहापोह केला जात असे. जुने जग आणि नवे जग येथे विचारांच्या क्षेत्रात एकमेकांशी संघर्ष व सुसंवाद करत एकत्र नांदत होते.

गुरू नारायणशास्त्री मराठे भौतिकशास्त्राचेही अभ्यासक होते. त्यांच्या वेदान्तमतांवर या नवशास्त्राचा प्रभाव असल्याची नोंद ‘किर्लोस्कर’ मासिकातील ‘महाराष्ट्राचा सत्पुत्र’ लेखात आढळते. हा लेख व त्यातील तपशील पाहता तर्कतीर्थांचे प्राज्ञपाठशाळेतील सहाध्यायी श्री. शं. नवरे यांनी लिहिला असावा, हे लक्षात येते. त्यानुसार नारायणशास्त्री मराठे उपनिषदातील ब्रह्मवाद शिकविताना ‘कॉन्झर्वेटिव्ह एनर्जी’च्या सिद्धांताचा उपयोग करत. भौतिकवादात ज्याला ‘मॅटर’ संबोधले जाते तेच ‘ब्रह्म’ होय, असे प्रतिपादन करत. म्हणून त्या वेळी विद्यार्थी असलेल्या विनोबा भावेंचे असे म्हणणे होते की, ‘नारायणशास्त्री भौतिक ब्रह्मवादी आहेत, खरे ब्रह्मवादी नाहीत.’

हेही वाचा : उलटा चष्मा : भारतातच पाकिस्तान?

शिक्षण मग ते काणत्याही काळातील असो, ते जोवर भविष्यलक्ष्यी आणि कालसंगत असत नाही, तोवर ते उपचारच बनून राहते. शिक्षकाला याचे भान असणे आवश्यक असते की, आपणास पोपट बनवायचे आहेत की गरुड. गरुड आपल्या पिलास डोंगरमाथ्यावरून एका गाफील क्षणी दरीत ढकलतो. त्या पिलाच्या पंखात बळ येते ते स्वतंत्र भरारीतून आलेल्या आत्मविश्वासाने. शिक्षणाचे खरे उद्दिष्ट देशासाठी जबाबदार आणि स्वावलंबी नागरिक घडविणे हे असते. प्राज्ञपाठशाळा गुरुकुलात याचे भान होते, म्हणून त्यांनी वेदाध्ययनास आधुनिकतेची आणि राष्ट्रीयत्वाची जोड दिली होती. परिणामी, तर्कतीर्थ ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ झाले.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarkteerth lakshman shastri joshi days in gurukul loksatta article css