मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांना दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम सोबत बाळगता येणार नाही या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त कामकाजात नेमकी कोणती सुधारणा झाली याचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेवरून एक समिती नेमण्यात आली. त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे खालीलप्रमाणे होती..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘समितीच्या असे निदर्शनास आले की, सर्वच विभाग व त्यांच्या ठिकठिकाणी विखुरलेल्या कक्षांत फायली तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. टेबलांवर ढीग लागल्याने खुर्चीत बसलेला कर्मचारीसुद्धा दिसत नाही. प्रवेशावरील निर्बंधांमुळे विशिष्ट विभागात येणारे अभ्यागत कामेच होत नसल्याने दिवसभर घुटमळताना आढळले. परिणामी गर्दी वाढली. या निर्णयाच्या आधी मंत्रालयातील बाबू एकदा कार्यालयात आल्यावर दिवसभर बाहेर पडायचे नाहीत. आता त्यांचे बाहेर पडण्याचे प्रमाण कमालीचे वाढले असून मंत्रालयाच्या आजूबाजूच्या हॉटेलांत गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे मंत्रालयातील उपाहारगृहाचा तोटा कमालीचा वाढला आहे.

आधी अभ्यागत व सरकारी बाबूंमध्ये वाद किंवा भांडणे होत नसत. आता कामावरून वाद वाढले असून गेल्या वर्षभरात अनेक वेळा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मंत्रालयात शिरल्यावर अभ्यागतांना ‘योग्य’ मार्ग दाखवणारे कर्मचारी वगळता इतरांची चिडचिड वाढल्याचे दिसून आले आहे. आधी मंत्रालयातील विविध कक्षांत पूजा-अर्चा होत, टेबलावर देवदेवतांच्या तसबिरी असत. आता प्रायोजकत्वाच्या अडचणीमुळे त्यातही घट झाली आहे. विशिष्ट हेतूने का होईना पण रात्री उशिरापर्यंत कार्यालयात बसून फायली हातावेगळय़ा करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या वृत्तीत आता बदल झाला असून, बरोबर सव्वासहाच्या ठोक्याला ते मंत्रालय सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सायंकाळच्या लोकलमधील गर्दी वाढल्याने या सेवेवर ताण पडत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कार्यालयातील संगणकांवर आभासी चलनाबाबतची माहिती जाणून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत पाचपट वाढ झाली असून जेवणाच्या सुटीत बहुसंख्य लोक याची माहिती धुंडाळत असतात, असे माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या पाहणीत आढळले आहे. ‘मोक्याच्या ठिकाणी’ काम करणारे कर्मचारी कार्यालय वेळेत सोडत असले तरी अभ्यागतांना बाहेर भेटून रात्री उशिरा घरी जातात व दुसऱ्या दिवशी ‘लेट’ कार्यालयात येतात असेही एका पाहणीत दिसून आले.  निर्णयाच्या अंमलबजावणीवरून अनेक आमदार व काही मंत्र्यांची मते जाणून घेतली असता त्या सर्वानी आमच्याकडे येणाऱ्या अभ्यागतांची गर्दी पूर्वीपेक्षा वाढली व कामेच होत नाहीत अशा तक्रारीही वाढल्याची माहिती दिली.

राज्याच्या अनेक भागांतून येणारे अभ्यागत पूर्वी एका दिवसात काम ‘निपटवून’ परत जायचे. आता कामे होत नसल्याने त्यांच्या थांबण्याची व्यवस्था करावी लागत असल्याचे यापैकी काहींनी सांगितले. एकूणच एरवी चैतन्यमय असलेले मंत्रालयातील वातावरण आता सुतकी झाल्याचे समितीला आढळले. हा निरीक्षणवजा अहवाल सहाव्या मजल्यावरील प्रमुखांच्या समोर गेल्यावर ‘आता काय करायचे’ यावर खल सुरू झाला. तेव्हा तिथेच बसलेला प्रमुखाचा एक सहकारी उद्गारला ‘१०ची मर्यादा २५ हजार करून टाका.’ हे ऐकून सारेच हास्यकल्लोळात बुडाले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chashma entering the ministry ten thousand make the limit 25 thousand ysh