महेश सरलष्कर

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेने पहिल्या दिवसापासून देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. द्वेषाला प्रेमाने उत्तर देण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या या यात्रेचे बर्हिरग वेगवेगळ्या माध्यमांमधून समाजापुढे येतच आहेत. ती आंध्र प्रदेशमध्ये असताना टिपलेले तिचे हे अंतरंग..

हैदराबादपासून सहा तासांच्या अंतरावर, कर्नाटकच्या सीमेवरचं गाव अलूर. बेल्लारी जिल्ह्यातून आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करून भारत जोडो यात्रा सकाळी साडेनऊ वाजता विश्रांती स्थळावर पोहोचली. डोंगरांच्या कुशीत मोठ-मोठे तंबू उभे केलेले होते. दोन तंबूंमध्ये यात्रेकरूंना आराम करण्यासाठी २०० हून अधिक खाटा, गादी-उशांची व्यवस्था केलेली होती. सकाळच्या सत्रात १२-१४ किमीची पदयात्रा करून एक-एक यात्रेकरू या तंबूत शिरत होता. काँग्रेसच्या ११८ यात्रेकरूंसाठी आणि संघटनांच्या सुमारे १०० यात्रेकरूंसाठी वेगवेगळे तंबू आहेत. संघटनांचे यात्रेकरू बदलत असतात. कोणी दोन-तीन दिवस यात्रेत सहभागी होऊन परत जातो, नवा येऊन मिळतो. काँग्रेसचे यात्रेकरू मात्र निर्धाराने पुढे जात आहेत, कन्याकुमारीपासून काश्मीपर्यंत. राहुल गांधी-दिग्विजय सिंह यांच्यासाठी स्वतंत्र कंटेनर, त्यांच्या भोवती सुरक्षारक्षकांसाठीही सुविधा. पदयात्रेत स्थानिक कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने येतात, त्यांच्यासाठी वेगळा तंबू. मध्यंतराच्या विश्रांतीस्थळी आल्यावर लगेच यात्रेकरूंना फळांचा नाश्ता दिला जातो. मग, दोन तासांनी शाकाहारी जेवण. जेवणामध्ये गोड पदार्थ. नंतर आइस्किम वा अन्य गोडधोड. मग, कोणी झोप काढतं, कोण इन्स्टाग्रामसाठी व्हिडीओ तयार करतं, कोणी गप्पांमध्ये रंगलेलं असतं. कोणी पत्रकारांना मुलाखती देत असतं. कन्हैया कुमार पदयात्रेत कविता म्हणतात, गाणी गातात, लोकांशी हितगुज करतात. पण, पत्रकारांपासून दूर पळतात. पत्रकारांनी काँग्रेसचं आणि त्यांचंही नुकसान केल्याची त्यांची भावना आहे! विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन-चार वाजता यात्रेकरू पुन्हा चालायला लागतात. १०-१२ किमीचा प्रवास करून संध्याकाळी सात वाजता रात्रीच्या विश्रांतीस्थळी (कॅम्प साइट) पोहोचतात. इथं फक्त यात्रेकरूंनाच प्रवेश दिला जातो. कार्यकर्ते, पत्रकारांना मज्जाव. कॅम्प साइटवर यात्रेकरूंना झोपण्यासाठी कंटेनरची सुविधा दिलेली आहे. शिवाय, तंबूही असतात.

यात्रेकरूंचा दिवस सकाळी चार वाजता सुरू होतो. हवामान बघून यात्रा कधी सुरू करायची हे ठरते. आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड उकाडा, आद्र्रता असल्यामुळं यात्रा सकाळी सहा वाजताच निघाली. यात्रा सकाळी लवकर सुरू झाली पाहिजे, असा राहुल गांधींचा आग्रह असतो. तासभर कडाक्याचं ऊन तर, तासभर मुसळधार पाऊस अशा टोकाच्या वातावरणात यात्रेकरू चालत जातात. सकाळी यात्रेकरू गेल्यानंतर कंटेनर बाहेर काढले जातात, वाहतुकीला अडथळा होऊ नये, याची काळजी घेत सुमारे ६० कंटेनर नव्या स्थळी पोहोचतात. रात्री यात्रेकरू येईपर्यंत कॅम्प-साइट सुसज्ज केली जाते. जेवणा-खाण्याची सोय कंत्राटी पद्धतीने केली जाते. आंध्र प्रदेश काँग्रेसकडे पैसे नसल्यानं चार दिवसांच्या यात्रेसाठी नाश्ता-पाण्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतची सुविधा कर्नाटकचे दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनी केली असं म्हणतात! सकाळी आठ-नऊ वाजेपर्यंत मध्यंतराचे विश्रांतीस्थळ तयार करावे लागते. दुसरा चमू आदल्या रात्रीच्या कॅम्प साइटवर आवराआवरी करतो. राहुल गांधींची जाहीरसभा होणार असेल वा ते मध्ये थांबून लोकांशी बोलणार असतील तर वेगळी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. वेगळय़ा ट्रकमधून सामुग्री आधी रवाना केली जाते.

राहुल गांधी संध्याकाळी पदयात्रेदरम्यान रस्त्याच्या कडेला, शेतात लोकांशी, विविध गटांशी गप्पा मारतात. अशा भेटीगाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित केल्या जात असल्या तरी, स्थानिक प्रश्न ऐरणीवर येतात. अदोनी गावातून जाताना राहुल गांधी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात तासभर चर्चा करत होते. तेव्हा जमलेली गर्दी, त्यांचा ताफा, काँग्रेसचे नेते, पोलिसांना थोडी उसंत मिळते. राहुल गांधींसोबत चालणे ही कसरत असते. चार-पाच किमी अंतर कापलं की लोक धापा टाकायला लागतात. पण, राहुल गांधी मात्र झरझर दिसेनासे होतात! भारत जोडो यात्रेचं थेट प्रक्षेपण होत असल्याने किमान ५० जणांचा ताफा राहुल गांधीसोबत असतो. यात्रेत ते वेगवेगळय़ा लोकांना भेटतात. अनेकदा हे भेटणं उत्स्फूर्त असतं. कुठल्याशा गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारा तरुण हातात फलक घेऊन उभा राहिलेला दिसला, राहुल गांधींनी त्याला रिंगणात बोलवून, तो ‘भाजपला विरोध का करतोय’, हे ऐकून घेतलं. काही वेळेला स्थानिक नेत्यांच्या ओळखीमुळंही लोकांना राहुल गांधीपर्यंत पोहोचता येतं. तेलंगणा-आंध्र प्रदेशमधील वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी कन्याकुमारीपासून यात्रा कव्हर करतोय, राहुल गांधींचं त्याच्याकडं लक्ष गेल्यावर त्यांनी प्रतिनिधीला खूण केली. मग चालता चालता दोन मिनिटांत यात्रेचं सार त्याला सांगून टाकलं! ‘इंदिरा गांधींचा नातू, राजीव गांधींचा मुलगा आलाय, त्याला भेटलं पाहिजे’, असं म्हणून लोक येतात. तरुण पोरं ‘राहुल-राहुल’ हाका मारत मागं मागं धावतात. राहुल गांधींच्या ताफ्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचं कडं असतं. त्याच्या आतमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी कमांडो असतात. या रिंगणामध्ये प्रेमापोटी लोक घुसखोरी करतात. त्यांना बाजूला काढलं जातं. राहुल गांधींच्या सोबत काँग्रेसचे नेते. मागे काँग्रेसचे यात्रेकरू. काँग्रेस नेते चंडी ओमन यांच्यासारखे यात्रेकरू तर अनवाणी निघाले आहेत. चंडी यांनी नाशिकच्या शेतकरी आंदोलनातून प्रेरणा घेतली आहे! आंध्र प्रदेशमध्ये दिसली नाही पण, राहुल गांधींच्या मागं केरळ, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये पाच-सात किमीची गर्दी होती असं यात्रेकरू सांगतात.

रिंगण संपलं की, पोलिसांच्या गाडय़ांचा ताफा, त्या मागे रुग्णवाहिका. ताफ्यातील ही रुग्णवाहिका फक्त राहुल गांधींसाठीच असते. संध्याकाळी अलूरहून अदोनीला पदयात्रा वेगाने पुढे जात होती. राखीव पोलीस दलाचे जवान दोन्ही बाजूला दोरखंड घेऊन जात असताना एक जवान अचानक दोन कारच्या मध्ये आला. मागच्या कारमधील ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबल्याने तो चिरडला जाण्यापासून वाचला पण, जवानाच्या पायाला लागलं. काही क्षणांसाठी त्याची शुद्ध हरपली. ही घटना घडली तेव्हा दिग्विजय सिंहही तिथूनच चालत निघाले होते. त्यांनी मागची रुग्णवाहिका बोलावली. जवानावर प्राथमिक उपचार केले आणि त्याची रुग्णालयात रवानगी केली. पण, रुग्णवाहिकेतील डॉक्टरांचं पथक तसं करायला नकार देत होतं. ‘ही रुग्णवाहिका फक्त राहुल गांधींसाठी असून पदयात्रा सोडून जाता येणार नाही’, असं प्रमुख डॉक्टर ठामपणे सांगत होते. दिग्विजय सिंह म्हणाले, ‘मी सगळी जबाबदारी घेतो, पण, जवानाला तातडीने रुग्णालयात न्या’. दिग्विजय यांनी राहुल यांच्या वैयक्तिक ताफ्यातील एका सदस्याला फोन लावून रुग्णवाहिका दुसरीकडं नेली जात असल्याचं कळवलं. मग, जवानासह रुग्णवाहिका रवाना झाली. पुढच्या पाच मिनिटांत दुसरी रुग्णवाहिका राहुल गांधींच्या ताफ्यात दाखल झाली!
राहुल गांधी यांच्या वैयक्तिक चमूतील सदस्य, सुरक्षारक्षक आणि यात्रेतील चमू असा सुमारे शंभर -सव्वाशे जणांचा ताफा दरमजल करत असतो. यात्रेचं आयोजन-व्यवस्थापन, प्रसारमाध्यम-समाजमाध्यमांद्वारे माहितीचे वहन अशा अत्यंत कळीचे घटक जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह हे सांभाळतात. जयराम रमेश यात्रेत फार चालत नाही, त्यांचं लक्ष आगाऊ व्यवस्थापन आणि माध्यम व्यवस्थापन, राहुल गांधींसोबत कार्यकर्ते, शिष्टमंडळाच्या चर्चाचं आयोजन या बाबींकडे जास्त असतं. दिग्विजय सिंह यांनी नर्मदा यात्रा यशस्वीपणे केली असल्यानं या यात्रेचा मार्ग ठरवण्यापासून अनेक बारीक-सारीक मुद्दय़ांचं आयोजन दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. ते दररोज २० ते २२ किमीची पदयात्रा करतात, पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काळात दोन-तीन वगळता दिग्विजय सिंह पदयात्रेत सक्रिय राहिलेले आहेत.

यात्रेच्या आयोजनाची आणि आखणीची जबाबदारी प्रदेश काँग्रेसकडं देण्यात आलेली आहे. यात्रेसाठी विशेष चमू बनवण्यात आलेला आहे. या चमूने रेकी करून राज्यांतर्गत यात्रेचा मार्ग ठरवलेला आहे. प्रत्येक दिवशी यात्रा कुठून सुरू होईल, मध्यंतर कुठं होईल, कॅम्प साइट कुठं असेल. यात्रा कुठल्या रस्त्यांवरून जाईल, याची आखणी केली जाते. यात्रेकरू, राहुल गांधींचा ताफा, कार्यकर्त्यांचा जमाव यामुळं मोठय़ा मोकळय़ा जागेवर वा मैदानावर तंबू ठोकावे लागतात. तशी जागा शोधणे, मग, कॅम्पसाठी आवश्यक स्थानिक परवानग्या, यात्रेसाठी पोलिसांची परवानगी अशा सर्व तांत्रिक कायदेशीर बाबी पूर्ण करून विनाअडथळा यात्रा पुढे न्यावी लागते. अनेकदा कॅम्प-साइटपासून काही अंतरावर सकाळी पदयात्रा सुरू होते वा शेवट जिथं होतो. त्यामुळं प्रत्यक्ष पदयात्रा सुरू होताना वा संपल्यानंतर देखील यात्रेकरूंना काही किमी अंतर चालत जावं लागतं.

राज्याच्या विभाजनापासून आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला प्रचंड विरोध केला जातो. दोन चाळिशी पार केलेले मोटारसायकलवाले राहुल गांधींची वाट पाहात बसले होते. त्यांचं म्हणणं होतं, राज्याचं विभाजन केलं म्हणून आम्ही काँग्रेसच्या विरोधात आहोत, आता राहुल गांधींनी आंध्रला विशेष राज्याचं दर्जा देण्यासाठी काही तरी केलं पाहिजे. त्याच संध्याकाळी राहुल गांधींनी जाहीर सभेत ही घोषणा केली! आणि तरीही काँग्रेस म्हणतं यात्रा राजकीय नव्हेच!
सकाळी १० ते दुपारी ४ हा वेळ मध्यंतराचा असला तरी, राहुल गांधींना या वेळेत विश्रांती घेता येत नाही. या वेळेत ते समाजातील विविध स्थानिक घटकांशी चर्चा करत असतात. दररोज मध्यंतरामध्ये स्थानिक गट राहुल यांच्यासमोर मोकळेपणाने आपली मते मांडतात. ज्या मुद्दय़ावर काँग्रेसच्या वतीने भूमिका मांडायची वा आश्वासनं द्यायची, तिथं राहुल गांधी मुद्दे मांडतात. आंध्र प्रदेशसाठी तीन नव्हे एकच राजधानी असेल आणि तीही अमरावतीच असेल, असं राहुल गांधींनी अशाच एका बैठकींमध्ये संबंधितांना सांगितलं. दररोज २२-२३ किमी चालणं. त्यातही लोकांशी संवाद साधणं, तीन-चार तास गंभीर मुद्दय़ांवर चर्चा, कधी जाहीर सभा तर, कधी पत्रकार परिषदा अशा भरगच्च कार्यक्रमानंतर रात्रीची विश्रांती. पुन्हा पहाटे चारपासून नवा दिवस, नवा मार्ग, नवा अनुभव..

mahesh.sarlashkar@expressindia.com