मुंबई शहरात छायाचित्रणाचे तंत्र आणि कला कशी रुजली, ती मुंबई इलाख्यात कशी पसरली आणि या भागातील संस्थानिकांचाही आश्रय तिला कसा मिळाला, याचा सचित्र वेध घेणारे ‘अर्ली बॉम्बे फोटोग्राफी’ हे पुस्तक म्हणजे दृश्य-पर्वणी आहेच, परंतु कलेतिहासाच्या अंगाने मुंबईतील छायाचित्रण-वाटचालीचा अभ्यास, हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.
मुंबईत आलेल्या अथवा मुंबईतच वाढलेल्या छायाचित्रकारांनी १८४० ते १९०० या काळात काढलेल्या छायाचित्रांचा केवळ एक संग्रह नव्हे, तर त्या छायाचित्रांचा अभ्यासही मांडणारे हे नवे पुस्तक आहे. हे मुंबईबद्दलचे पुस्तक नसून मुंबईतल्या एका कलेबद्दलचे आणि तंत्राबद्दलचे पुस्तक आहे.
लेखिका सुसान हॅपगूड या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी संलग्न ‘स्कूल ऑफ आर्ट अँड एस्थेटिक्स’मध्ये अभ्यागत प्राध्यापक होत्या. छायाचित्रणाची सुरुवात १८३६ मध्ये झाल्यानंतर काही वर्षांतच हे तंत्र काय आहे याची माहिती मुंबईत पोहोचली. ब्रिटिशांनी काही फोटोग्राफर विलायतेहून आणविले. त्यामुळे दक्षिण आशियात फोटोग्राफीची पहिली बीजे मुंबईत रोवली गेली. तेव्हाच्या काळातील छायाचित्रांचा हा अभ्यास कलेतिहासाच्या अंगाने केला गेला आहे. छायाचित्रण तंत्राच्या सुरुवातीची डॅग्युरोटाइप फोटोग्राफी या पुस्तकात कमी आहे, पण १८५० पासून ज्यांचा वापर सुरू झाल्या त्या आल्बुमेन सिल्व्हर प्रिंट भरपूर आहेत. कागदाला अंडय़ाचे पांढरे आणि मीठ लावून तो वाळवून, पुढे सिल्व्हर नायट्रेटच्या साह्याने काचेवरील ‘निगेटिव्ह’चा प्रिंट या तंत्रात घेतला जात असे. इतक्या जिकिरीच्या तंत्राने मुंबईत काम करणारे नारायण दाजी आणि हरिचंद चिंतामण हे दोघे ‘प्रोफेशनल फोटोग्राफर’ मुंबईचेच होते. हे दोघे ‘बॉम्बे फोटोग्राफिक सोसायटी’ या ब्रिटिशांच्या संस्थेचे पहिले देशी सदस्य. यापैकी नारायण दाजी यांच्याविषयी फार माहिती लेखिकेने दिलेली नाही. पण यापैकी नारायण दाजींचा स्टुडिओ मुंबईच्या काळा घोडा भागात, ‘रॅम्पार्ट रो’मध्ये होता आणि पुढे हरिचंद चिंतामणही त्या भागात आले, अशी माहिती आहे. म्हणजे तेव्हापासून मुंबईचा काळा घोडा भाग ‘आर्ट डिस्ट्रिक्ट’ होता, असे म्हणावयास हरकत नाही!
हरिश्चंद्र किंवा हरिचंद चिंतामण यांची माहिती अनेक संशोधकांमुळे उपलब्ध आहे. ते केवळ फोटोग्राफर नसून विद्वानही होते. भगवद्गीतेवर त्यांनी पुस्तक लिहिले होते. तो टीकाग्रंथ होता आणि पुढे हेच हरिचंद मुंबईच्या ‘प्रार्थना समाजा’चे पहिले अध्यक्ष झाले. बडोदे येथील महाराजा मल्हारराव गायकवाड यांच्यासह हरिचंद विलायतेच्या दौऱ्यावर गेले ते फोटोग्राफर म्हणून नव्हे, तर महाराजांचे पोलिटिकल एजंट म्हणून, अशी माहिती लेखिका देते. राजा दीनदयाळ हे त्या वेळचे फोटोग्राफर म्हणून भरपूर गाजले, त्यांचेही काही फोटो या पुस्तकात आहेत. पण दीनदयाळ मुंबईचे नसल्याने त्यांचे फार वर्णन लेखिकेने केले नसावे.
हौशी फोटोग्राफरांसाठी मुंबईतून निघणाऱ्या साप्ताहिकात तीन मोठे फोटो छापले जात, त्यापैकी एक आपला असणे हा मान होता. या साप्ताहिकाचे वर्गणीदार स्कॉटलंडपर्यंत होते. यामुळे, निव्वळ राजेमहाराजे किंवा धनिक लोक यांच्या छायाचित्रांशिवाय निराळी, निसर्गाची वा अन्य छायाचित्रे काढण्यास प्रोत्साहन मिळण्याजोगे वातावरण मुंबईत होते. काही संस्थानिकांनी स्वतची कार्डे फोटोग्राफीच्या तंत्राने तयार करवून घेतली होती, ते काम मुंबईत होई अशी माहिती येथे मिळते.
यातून उलगडणारा इतिहास हा एका तंत्राचा आणि कलेचा आहे. छायाचित्रण कलेचे आकर्षण समाजाला कसे होते, त्यास राजाश्रय व लोकाश्रय कसा मिळाला याचेही दर्शन पुस्तकातून घडते. मुंबईचा विकास कसा झाला हे दाखविणारी अनेक छायाचित्रे येथे असली, तरी हा पुस्तकाचा विषय मुंबई शहर हा नव्हे. बांधकामाची ही चित्रे आजच्या ‘इंडस्ट्रिअल फोटोग्राफी’प्रमाणे आहेत, असे लेखिका सांगते आणि ते खरेही आहे!
(ही दोन्ही छायाचित्रे दिल्लीतील ‘अल्काझी कलेक्शन ऑफ फोटोग्राफी’ या संस्थेकडे.)
पुस्तक : ‘अर्ली बॉम्बे फोटोग्राफी’ . लेखिका : सुसान हॅपगूड,
प्रकाशक : मॅपिन पब्लिशिंग व ‘मुंबई आर्ट रूम’ पृष्ठे : १४० (मोठा आकार); किंमत : १९५० रु.