अग्रलेख : आनंदचे वारसदार!

‘चेन्नईतले बुद्धिबळ ऑलिम्पियाड आजवर झालेल्यांपैकी सर्वाधिक सुनियोजित म्हटले पाहिजे’, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया या स्पर्धेसाठी आलेले बहुतांश पाहुणे मायदेशी पोहोचल्यानंतर व्यक्त करतात, ही आपल्यासाठी समाधानकारक आणि अभिमानास्पद बाब.

अग्रलेख : आनंदचे वारसदार!
फोटो सौजन्य : पीटीआय

स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षांत आपल्या देशाचे ७५ बुद्धिबळपटू ‘ग्रँडमास्टर’ असणे आणि ऑलिम्पियाडचे आयोजन आपण अल्पावधीत करणे, दोन्ही अप्रूपाचे!

बुद्धिबळाचा पट विस्तारत असताना, महिलांसाठी संधी कमी आणि म्हणून ७५ पैकी केवळ दोनच महिला, हे मात्र शोचनीय..

‘चेन्नईतले बुद्धिबळ ऑलिम्पियाड आजवर झालेल्यांपैकी सर्वाधिक सुनियोजित म्हटले पाहिजे’, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया या स्पर्धेसाठी आलेले बहुतांश पाहुणे मायदेशी पोहोचल्यानंतर व्यक्त करतात, ही आपल्यासाठी समाधानकारक आणि अभिमानास्पद बाब. चेन्नईपासून काही अंतरावर असलेल्या मामल्लापुरम येथे ही स्पर्धा प्रत्यक्ष खेळवली गेली. त्यासाठी जगभरातून १८६ देशांचे १७०० खेळाडू, प्रशिक्षक, सहायक भारतात आले होते. ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन हे बहुविध खेळांच्या स्पर्धेप्रमाणेच आव्हानात्मक समजले जाते, कारण नियोजनाचा भार सहसा एका शहराच्या आणि राज्याच्या प्रशासनाला उचलावा लागतो. त्या आघाडीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि त्यांच्या प्रशासनाची कामगिरी खणखणीत होती. स्टॅलिन सरकारमधील अत्यंत वरिष्ठ नोकरशहा संयोजनकार्यासाठी तैनात होते. स्थानिक प्रशासन, कॉर्पोरेट विश्व, असंख्य प्रशिक्षित कार्यकर्ते असा फौजफाटा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निगुतीने राबला. माजी जगज्जेता आणि महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा तमिळनाडू किंवा चेन्नईचा आहे या वास्तवापाशी आत्मसंतुष्ट न राहता, त्याच्या देदीप्यमान कारकीर्दीला शोभेसे संयोजन चेन्नईने करून दाखवले. इतर सर्व शहरांसाठी आणि राज्य सरकारांसाठी त्यामुळेच हे ऑलिम्पियाड आदर्शवत ठरावे. या ऑलिम्पियाडची आणखी एक गंमत म्हणजे, मुळात ते चेन्नईत होणारच नव्हते. २०२० मध्ये ते रशियात होणार होते. त्या वेळी करोनामुळे ते लांबणीवर पडले आणि यंदाच्या वर्षी युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यामुळे त्या देशाकडून यजमानपदच काढून घेण्यात आले. ऐन वेळी यजमानपद कोणाला द्यायचे याचे उत्तर भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सचिव भारतसिंह चौहान यांनी दिले. ही स्पर्धा भारतात भरवून दाखवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भारतातून दिल्ली, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांनी रस दाखवला. त्यातही तमिळनाडूने १०० कोटी रुपयांची हमी तातडीने देऊन आणि असा तसा निधी तत्परतेने उभा करून बाजी मारली. हल्लीच क्रीडा प्रकल्प आणि स्पर्धामध्ये नवोन्मेषी रुची निर्माण झालेल्या गुजरात राज्याने ही स्पर्धा भरवण्यासाठी जोर लावला होता. परंतु स्पर्धा भरवण्याचा अनुभव आणि पायाभूत सुविधा उभारण्यातली तत्परता या जोरावर तमिळनाडूने बाजी मारली. खेळाडूंच्या कामगिरीकडे वळण्यापूर्वी ही प्रस्तावना आवश्यक, कारण खेळातील यश हे निव्वळ खेळाडूंचे असत नाही. या स्पर्धेपूर्वी भारतात झालेली अशी बहुराष्ट्रीय स्पर्धा म्हणजे दिल्ली राष्ट्रकुल २०१०. त्याही स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवलीच होती. मात्र आजही ती स्पर्धा खेळाडूंच्या कामगिरीसाठी नव्हे, तर सुरेश कलमाडी प्रभृतींच्या घोटाळय़ांसाठीच कुपरिचित आहे. चेन्नई ऑलिम्पियाडच्या बाबतीत हे होणार नाही. किंबहुना, भारतीय बुद्धिबळपटूंच्या कामगिरीइतकीच ती उत्तम संयोजनासाठीही स्मरणात राहील. आता थोडेसे पटावरील भारतीयांच्या कामगिरीविषयी.

विश्वनाथन आनंदच्या उदयानंतर बुद्धिबळाच्या या जन्मभूमीत या खेळामध्ये थोडय़ा अवकाशानंतर अक्षरश: क्रांती झाली. सरत्या सहस्रकात भारतात आनंद, दिव्येंदु बारुआ आणि प्रवीण ठिपसे असे तीन ग्रँडमास्टर होते. यंदा स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षांत ही संख्या ७५वर पोहोचली आहे. आनंदचा उदय नव्वदच्या दशकातला, पण तो दिग्विजयी आणि जगज्जेता ठरू लागला नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात. त्याच काळात बुद्धिबळाविषयी भारतीयांमध्ये अभूतपूर्व आकर्षण निर्माण होऊ लागले. या आवडीला आणि नैसर्गिक गुणवत्तेला उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची जोड मिळत गेली आणि त्याचे परिणाम आज दिसत आहेत. आतापर्यंतच्या ऑलिम्पियाडमध्ये आपल्याला क्वचितच पदके मिळत होती. यंदा तीच संख्या सातवर पोहोचली. डी. गुकेश आणि निहाल सरीन यांना वैयक्तिक सुवर्णपदक, अर्जुन एरिगेसी याला रौप्यपदक; तर आर. प्रज्ञानंद, त्याची बहीण आर. वैशाली, तान्या सचदेव आणि आपल्या नागपूरची दिव्या देशमुख यांना वैयक्तिक कांस्य पदक मिळाले. याशिवाय दोन सांघिक कांस्य पदके अशी ही कामगिरी सर्व संघांमध्ये सर्वोत्तम ठरली. यजमान देश म्हणून प्रत्येकी तीन संघ उतरवण्याची संधी भारताला मिळाली. यातही भारताच्या ब संघाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. गुकेश, सरीन, प्रज्ञानंद, रौनक साधवानी हे या संघातील सदस्य वीस वर्षांखालील आहेत. त्यांनी अमेरिकेसारख्या बलाढय़ आणि अव्वल मानांकित संघाला ३-१ अशी धूळ चारली. भारतीय पुरुषांच्या वरिष्ठ संघालाही त्यांनी झाकोळले. गुकेश आणि वरिष्ठ संघाकडून खेळलेला अर्जुन एरिगेसी (हाही तसा युवाच) बुद्धिबळात प्रस्थापित मानल्या जाणाऱ्या एलो मानांकनामध्ये २७०० गुणांच्या वर पोहोचले आहेत. गुकेश आता आनंदनंतर दुसऱ्या क्रमाकांचा भारतीय बुद्धिबळपटू बनला असून, त्याने क्रमवारीत पेंटाल्या हरिकृष्ण आणि विदित गुजराथी यांना मागे टाकले आहे.

महिलांमध्ये कोनेरु हम्पीच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेले कांस्य पदकही कौतुकास्पदच. हम्पी आणि हरिका द्रोणवल्ली या ग्रँडमास्टर हा सर्वोच्च किताब मिळालेल्या भारतातील दोनच बुद्धिबळपटू आहेत. ही संख्या वाढवावी लागेल आणि त्यासाठी सर्वागीण प्रयत्नांची गरज आहे. पुरुषांमध्ये ७३ ग्रँडमास्टर आणि महिलांमध्ये २ ग्रँडमास्टर इतकी दरी या दोहोंतील दर्जामध्ये खचितच नाही. परंतु जगभरातच महिलांसाठीच्या स्पर्धा फार होत नाहीत आणि या नियमाला भारत अपवाद ठरू शकतो. ऑलिम्पियाडमध्ये यापूर्वी अनेकदा पुरुषांपेक्षा महिलांची कामगिरी चांगली झाली होती. हम्पी, हरिका, तान्या सचदेव यांच्याबरोबरच आर. वैशाली, भक्ती कुलकर्णी, दिव्या देशमुख अशा अनेक उदयोन्मुख गुणवान बुद्धिबळपटू भारतात आहेत. त्यांच्यासाठी भारतात वरिष्ठ पातळीवरील, उच्च मानांकित स्पर्धा अधिकाधिक भरवल्या जाण्याची गरज आहे. टाटा स्टील स्पर्धेच्या निमित्ताने यंदा त्याची सुरुवात होईल हे कौतुकास्पद असले, तरी इतर समूहांनीही यात लक्ष घालण्याची गरज आहे. महिला सक्षमीकरण हे तत्त्व निव्वळ घोषणांपुरते मर्यादित न राहता, भारताच्या सक्षम महिला बुद्धिबळपटूंना सातत्याने पाठबळ देत राहिले पाहिजे. चीन, रशिया आणि अमेरिका यांच्या तोडीच्या स्पर्धा याही देशात व्हायला पाहिजेत. भारतात इतर अनेक खेळांमध्ये प्रगतीसाठी आजही परदेशी प्रशिक्षक हा महत्त्वाचा घटक असताना, बुद्धिबळात मात्र देशी प्रशिक्षकांनी उत्तम कामगिरी करून दिलासा दिला. महिला संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे आणि पुरुष ब संघाचे प्रशिक्षक आर. बी. रमेश हे दोघे एके काळचे उत्कृष्ट ग्रँडमास्टर. आज दोघेही तितकेच चांगले प्रशिक्षक आहेत आणि सातत्याने भारतीय संघांना मार्गदर्शन करत आहेत.

यानिमित्ताने या स्पर्धेत विजयी ठरलेल्या उझबेकिस्तान आणि युक्रेनचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. उझबेकिस्तान खुल्या गटात तर युक्रेन महिला गटात अजिंक्य ठरले. भारताच्या ब संघाप्रमाणेच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक युवा बुद्धिबळपटूंचा भरणा उझबेकिस्तानच्या संघात होता. रशिया, अमेरिका, चीन, भारत यांच्याप्रमाणेच या देशातही बुद्धिबळ महासत्ता बनण्याची क्षमता आहे हे दिसून आले. महिलांमध्ये युक्रेनचे अजिंक्यपद तर अधिक उल्लेखनीय. युद्धजर्जर अशा युक्रेनमध्ये अनेक शहरे उद्ध्वस्त झालेली आहेत. या परिस्थितीतही युक्रेनच्या महिला संघाने उत्तम तयारी केली आणि पटावरील प्रत्येक आव्हानाला त्या धीरोदात्तपणे सामोऱ्या गेल्या.

या संस्मरणीय कामगिरीला धुमारे फुटले पाहिजेत. विश्वनाथन आनंद आता आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा (फिडे) उपाध्यक्ष बनला असून, प्रत्यक्ष खेळाऐवजी प्रशासकाच्या भूमिकेतून अधिक दिसू लागला आहे. याच भूमिकेतून भारताकडे अधिकाधिक दर्जेदार स्पर्धा आणण्यास तो प्राधान्य देईल, हे नक्की. विश्वनाथन आनंदसारखा दुसरा किंवा दुसरी कोणी होणे नाही. पण आनंदचे वारसदार मोठय़ा संख्येने निर्माण होऊ लागले आहेत, हेही स्वागतार्हच!

मराठीतील सर्व संपादकीय ( Editorial ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Editorial chess player grandmaster of the olympiad organized ysh

Next Story
अग्रलेख : आणखी एक निवर्तली!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी