इशित ‘केबीसी’त जिंकला असता, तर अशाच प्रतिक्रिया उमटल्या असत्या का? त्या वेळी कदाचित त्याच्या या अशा ‘दिसण्या’चे स्मार्टनेस म्हणून कौतुक झाले असते…
एखाद्या घटनेचे इंटरनेटवर वादळ निर्माण होणे हे आजच्या डिजिटल काळात काही नवीन नाही. ती या जगात टिकून राहण्यासाठीची गरज आहे. पण वादळ असले तरी डिजिटलच ते. काही दिवसांनी वा आठवड्यांनी त्याचा परिणामही उरत नाही. याचीही या डिजिटल जगताला सवय, कारण हे विरले तरी पुढचे वादळ तयार असते किंवा मिळवले, निर्माण केले जाते. जागतिक तापमानवाढीमुळे कमी वेळात अधिक पाऊस पडण्याच्या घटना जशा सातत्याने वर्षभर आताशा कुठे ना कुठे घडत असतात, तशीच कमी वेळात अशी जोरदार डिजिटल वादळे सातत्याने मोबाइल, दूरचित्रवाणी, संगणक अशा आधुनिक पडद्यांना धडका देत राहतात. त्यातील अलीकडचे वादळ हे गुजरातच्या गांधीनगरमधील इशित भट्ट नावाच्या मुलाच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातील वर्तनाने निर्माण झालेले. याचे वैशिष्ट्य असे, की ते केवळ समाजमाध्यमांवरील टीका, खिल्ली इतक्यापुरते मर्यादित न राहता त्याचा पैस एकूणच सध्याच्या मुलांचे वर्तन, आधुनिक भारतातील अनघड पालकत्व आणि मध्यमवर्गाच्या बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक जाणिवा इथपर्यंत विस्तारला. म्हणून त्यावर भाष्य आवश्यक.
अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करीत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सध्या बच्चेकंपनी सहभागी होत आहे. इशित भट्ट हा अनेक सहभागींपैकी एक. त्याला ‘हॉटसीट’वर बसायची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच प्रश्नापासून वातावरण ‘ताप’वायला सुरुवात केली. ‘मला नियम वगैरे समजावत बसू नका, थेट प्रश्न विचारा’, ‘पर्याय देऊच नका, मला उत्तर माहीत आहे’, ‘उत्तराच्या पर्यायावर एक नाही, चार-चार कुलपे ठोका’, अशी त्याची वाक्ये आता रील्स, मीम्समधून सार्वत्रिक झाली आहेत. उत्तरांचे पर्याय दाखवण्याआधीच तो उत्तरे देऊन मोकळा होत होता, पण पाचव्या प्रश्नाला तो अडला आणि त्यानेच पर्यायांची विचारणा केली. त्यावर मग हशा पिकला. पर्याय दाखवल्यावर त्याने त्यातील एक उत्तर घाईघाईने देऊन टाकले, पण ते चुकले आणि तो स्पर्धेचा पहिला टप्पाही पार न करता स्पर्धेतून बाहेर पडला. इशितच्या या काही मिनिटांच्या दूरचित्रवाणी अस्तित्वाची गेले दहा दिवस चर्चा सुरू आहे. वास्तविक अमिताभ बच्चन यांनी इशितला त्यांच्या नेहमीच्या शैलीत अतिशय संयतपणे हाताळले. पण कदाचित म्हणूनच समाजमाध्यमांवर पहिल्या टिप्पण्या आल्या, त्या इशित बच्चन यांच्याशी अनादराने वागला, अशा. हा मुलगा अतिशय आगाऊ, उद्धट, हेकट आहे, वडीलधाऱ्यांशी कसे वागावे, हे याला माहीत नाही इथपासून टिप्पण्या सुरू होऊन याच्या आई-वडिलांनी याच्यावर नीट संस्कार केले नाहीत, इथपर्यंत गेल्या.
या ढगफुटीसारख्या टिप्पणी वर्षावानंतर हळूहळू या मुलाला असे धारेवर धरू नका, असा एक सूर उमटलेला दिसतो. अनेक मानसतज्ज्ञ, लाइफ कोच वगैरे यात उतरले आहेत आणि ते या मुलाच्या निमित्ताने एकूणच सध्याच्या काळातील मुले आणि पालकत्व यावर भाष्य करताना दिसत आहेत. याचे सगळे नमुने विविध समाजमाध्यम मंचांवर आहेतच, त्यामुळे त्याची पुन्हा उजळणी करण्याचे कारण नाही. यानिमित्ताने चर्चा व्हायला हवी आहे, ती भारतातील मध्यमवर्गाच्या बदलत्या जाणिवांची. इशितच्या निमित्ताने जे घडताना दिसते आहे, ते प्रत्येक जण इशितच्या वर्तनावर आणि पर्यायाने त्याच्या पालकांवर भाष्य करून, आपण म्हणतो तेच याचे ठोस उत्तर आहे, असे सांगण्याच्या स्पर्धेत उतरल्याचे. भाष्य करणारा प्रत्येक जण एक प्रकारे इशितसारखेच – ‘पर्याय देऊ नका, मला उत्तर माहीत आहे’ – असे पर्याय न ऐकताच एकमेकाला ऐकवतो आहे. पण, यावर ठोस असे एकच एक उत्तर नाही, ते का हे समजून घेणे गरजेचे.
नवे सहस्राक सुरू झाल्यानंतरच्या गेल्या पाव शतकात तंत्रज्ञानाने मनुष्याचे जगणे बदलले, यात कुणाचे दुमत असायचे कारण नाही. त्याचे दुष्परिणाम बेदखल करून चालणार नाहीत, तशी त्यांची उपयुक्तताही नाकारून चालणार नाही. या दोन्हींत मेळ घालायला जमत नाहीये, ही खरी रड आहे. जेन झी किंवा जेन अल्फाचे या जगात स्वागतच मोबाइल, स्मार्टफोनने केले. साहजिकच तो आणि त्याच्यावरील सर्व तंत्रआयुधे ही त्यांच्या आयुष्याची सहयात्रिक आहेतच. या तंत्रआयुधांचा वापर करून काढलेल्या छायाचित्रांत, चित्रफितींत आपण आणि आजूबाजूचे इतर कसे दिसतात, हे पाहतच ही पिढी मोठी झाली आहे, होत आहे. आरशात पाहण्यापेक्षा मोबाइलचा कॅमेरा सेल्फी मोडमध्ये टाकून स्वत:ला पाहणारी ही पिढी आहे. त्यांची आणि ते इतरांची जोखू पाहत असलेली प्रतिमा यावर पोसली जाते आहे, ‘स्व’-रूप पाहण्याची ताकद देणाऱ्या तात्त्विक जाणिवेवर नाही. सेकंदा-दोन सेकंदाला नवे दृश्य पाहण्याची सोय करून ठेवणारी ही तंत्रआयुधे जे दाखवतात, ते पाहताना त्यातील काय अधिक ‘चांगले’ दिसते, याचे पर्याय पाहणारे निवडत असतात. तो संस्कार त्यांच्या नकळत त्यांच्यावर होत असतो. ढोबळ मानाने सांगायचे, तर कोणते कपडे परिधान केल्याने आत्मविश्वास असल्याचा संदेश जातो इथपासून दुसऱ्याशी कसे बोलले तर वाहवा होते इथपर्यंतचे लाखो पर्याय स्मार्टफोन नावाचा पडदा पोस्ट, रील, मीम इत्यादी चित्रगुंतवळ्यातून देत असतो, पाहणाऱ्याला तसे व्हायला सुचवत असतो. अमुक एक असे करतो ते ‘कूल’ आहे, म्हणून केले पाहिजे, असे हे मूल्यमापन आहे. ‘जो जे ‘कूल’, तो ते पाहो’ असाच याचा नियम आहे. तो लक्षात ठेवून एखादा इशित जेव्हा स्वत:ला त्याचे पडद्यावरचे दिसणे-असणे कसे असावे, हे कल्पून तसे कॅमेऱ्यासमोर दाखवायचा प्रयत्न करतो, तेव्हा जे होते, ते ‘कौन बनेगा करोडपती’त घडले आहे. इशितने स्वत:ला प्रदर्शित करताना, त्याला जे ‘कूल’ वाटले, त्याप्रमाणे केले असावे. त्याचे हे दर्शन ज्यांना तसे वाटत नाही, ते त्याच्या निंदेत गुंतले आहेत, काही त्याच्या वर्तनाचे विश्लेषण करून त्याचे उत्तर देण्यात, तर काही त्यावरून आधुनिक पालकत्वाचे अनघडपण अधोरेखित करून उपाय सुचवण्यात.
जे दिसते, ते पाहणाऱ्यांना, या दिसण्यावर टिप्पण्या करण्याची मुभा नेहमीच असते, पण हे पाहणारे जेव्हा दाखवणारे होतात, तेव्हा पाहणाऱ्यांच्या टिप्पण्या या दाखवणाऱ्यांनी कशा स्वीकारायच्या याचे भान कोणतेच तंत्रआयुध देत नाही. पालकांची भूमिका काही असेल, तर ती इथे आहे, किमान हे भान देणारी. अलीकडच्या काळात एकुलत्या एक, स्वत:च्या घरातही पुन्हा स्वत:चा स्वतंत्र अवकाश असलेल्या मध्यमवर्गातील मुलांना ‘जिवंत’ सहजीवनात उमलण्याची संधीपेक्षाही गरजच उरलेली नाही, हे वास्तव आहे. हवे ते बसल्या जागी मिळते आहे, नको ते नाकारण्याची मुभा आहे आणि हा पर्याय वस्तूंप्रमाणेच जिवंत माणसांबाबतही आहे. याला स्वत:च्या मतांवर कोणत्याही गोंधळाविना ठाम असण्याची चांगली बाजू असली, तरी दुसऱ्याचेही मत असते आणि ते नाही पटले, तरी त्याचा आदर करायचा असतो, या सहअस्तित्वाच्या नियमाला थेट फाटा मिळण्याचा धोकाही आहे, जो इशितसारख्या एखाद्या ‘एपिसोड’च्या निमित्ताने समोर येतो. पण, तरी उलटा विचार करू. इशित ‘केबीसी’त जिंकला असता, तर अशाच प्रतिक्रिया उमटल्या असत्या का? त्या वेळी कदाचित त्याच्या या अशा ‘दिसण्या’चे स्मार्टनेस म्हणून कौतुक झाले असते. कुणी सांगावे, मुलाचा लहानपणापासूनच सामान्यज्ञानाचा किती चांगला अभ्यास करून घेतला आहे, असे म्हणून त्याच्या पालकांचीही पाठ थोपटली गेली असती! असो! इशितचा भाग प्रदर्शित झाल्याने वाहिनीचे तेवढे फावले असणार. वास्तविक त्यांच्याकडे हा भाग न दाखवण्याचा – किंवा किमान त्याचे ते कथित उर्मट वर्तन पडद्यावर न आणण्याचा- पर्याय होताच की. तरीही त्यांनी तो न स्वीकारण्यामागे यानिमित्ताने चर्चा घडून, प्रेक्षकसंख्या वाढण्याच्या शक्यतांकडे डोळा असू शकतो. इशितच्या निमित्ताने उठलेल्या वादळावर ठोस उत्तर नाही, ते यामुळेच. पडद्यावरच्या कथित आगाऊपणाच्या आगेमागे इतके काय काय ‘दिसते’ आहे, ‘पाहण्या’ची इच्छा असेल, तर किमान त्या वादळाने आपल्यासमोर आणलेला प्रश्न तरी नेमका कळेल!