सहभागी झालेल्यांतील जे कोणी ‘पहिल्या क्रमांकाचे’ ठरले तेच करंडकाचे विजेते जाहीर होणे नैसर्गिक. पण ‘पुरुषोत्तम करंडक’च्या आयोजकांना हे मान्य नाही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शतकातील सर्वाधिक लोकप्रिय व्यावसायिक चित्रपट ‘शोले’ प्रसृत झाला तेव्हा त्या वर्षी त्यास ‘फिल्मफेअर’ पुरस्कार नव्हता. एकमेव मिळाला तो माधव शिंदे यांना उत्कृष्ट संकलनासाठी. तत्त्वज्ञ संशोधक अल्बर्ट आइन्स्टाइन याला त्याच्या जगन्मान्य सापेक्षता सिद्धान्तासाठी कधीही ‘नोबेल’ मिळाले नाही. अनेकांच्या गळय़ातील ताईत असलेल्या आणि अनेक लोकप्रिय गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बॉब मार्ले या गायकाचे ग्रॅमी विजेत्यांत नाव नाही. १९४१ साली पार्श्वगायन सुरू करणाऱ्या मुकेश यांची दखल राष्ट्रीय पुरस्कारांनी घेण्यासाठी १९७४ साल उजाडावे लागले. असे अनेक दाखले देता येतील. त्यावरून दिसते की संबंधित क्षेत्राचे परीक्षक आणि स्पर्धक हे गुणवत्ता आणि ती जोखण्याची क्षमता या मुद्दय़ांवर एकाच पातळीवर असतातच असे नाही. याची जाणीव आताच होण्याचे कारण म्हणजे यंदा ‘पुरुषोत्तम करंडक’ न देण्याचा संबंधित स्पर्धा आयोजकांचा निर्णय. राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरुणांसाठी ही स्पर्धा म्हणजे जीव की प्राण. ती जिंकणे म्हणजे आभाळास हात लागले असे त्या वयात वाटते. (नंतर यातील अनेकांस आपण तरुणपणी किती मूर्ख होतो, याचाही साक्षात्कार होत असेल. असो) यंदा दोन वर्षांच्या करोना खंडानंतर ही स्पर्धा झाली. साहजिकच या करोनोत्तर करंडकावर कोणाचे नाव कोरले जाणार याबद्दल संबंधितांत अतिरिक्त उत्सुकता होती. पण त्यावर आयोजकांनी पाणी ओतले. त्यांच्या मते यंदा पहिले पारितोषिक देण्याच्या योग्यतेची एकही एकांकिका नाही. म्हणून पहिल्या क्रमांकाच्याही एकांकिकेस करंडक नाकारला गेला. या एकांकिका, त्यांच्या संहिता, सादरीकरण आदींच्या तपशिलात न जाता ‘पुरुषोत्तम’ आयोजकांच्या या आविर्भावाने काही प्रश्न निर्माण होतात.

हेही वाचा >>> अग्रलेख : राखील तो इमान!

उदाहरणार्थ एक साधा तर्काधारित मुद्दा असा की एकदा का स्पर्धा घेतली गेली की तीत पहिला निश्चित झाल्याखेरीज थेट दुसरा क्रमांक असूच शकत नाही. ‘पुरुषोत्तम’ने यंदा पहिला क्रमांक निवडला. पण रोख रकमेसाठी. करंडकासाठी नाही. हे अधिकच हास्यास्पद. रोख रक्कम देण्यास विजेता योग्य, पण करंडकासाठी नाही, हे कसे ? ‘करंडक’ पात्र ठरविण्याचे काही किमान निकष निश्चित आहेत काय? अमुक इतके वजन उचलणे अथवा इतक्या वेळेत तितके अंतर कापणे इत्यादी काही निश्चित केले गेले असेल तर आपणास काय साध्य करायचे आहे हे पहिल्या क्रमांक इच्छुकांस स्पर्धेआधीच माहिती असते. एकांकिका स्पर्धेत असे पूर्वनिश्चित निकष असू शकत नाहीत. म्हणजे अनुप जलोटा यांच्याप्रमाणे टाळय़ा वाजत नाहीत तोपर्यंत दमसास कायम ठेवायचा, पुढचे वाक्य विसरला बहुधा असे प्रेक्षकांस वाटेल इतका विक्रमी पॉझ घेऊन दाखवायचा इत्यादी काही निकष पहिल्या क्रमांकासाठी पूर्वघोषित असते तर ते साध्य झाले नाहीत म्हणून ‘सर्वोत्कृष्ट’चे पारितोषिक नाकारणे योग्य ठरले असते. पण या स्पर्धात तसे काही नव्हते. याचा अर्थ असा की सहभागी झालेल्यांतील जो/जे कोणी सर्वोत्तम म्हणून पहिल्या क्रमांकाचे ठरले ते या करंडकाचे विजेते जाहीर होणे नैसर्गिक. पण हा साधा तार्किक युक्तिवाद पुरुषोत्तम आयोजकांस बहुधा ठाऊक नसावा. पण त्यामुळे उपस्थित होणारा प्रश्न असा की, या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचा कोणी विजेता नसेलच तर तीत दुसरा वा तिसरा क्रमांक तरी कसा काय कोणास देता येईल? जेथे पहिलाच नसेल तेथे दुसरा वा नंतरचा कसा काय असणार?

दुसरे असे की अशा प्रकारच्या स्पर्धेत प्राप्त परिस्थितीत उपलब्ध स्पर्धकांतच डावे-उजवे काय ते ठरवावे लागते. कलाक्षेत्रातील विजयांस शास्त्रकाटय़ांचा आधार नसतो. जे काही असते ते सापेक्ष असते. तेव्हा विशिष्ट दर्जाच्या कलाकृती सादर झाल्या नाहीत हे आयोजक वा परीक्षक यांचे विधानच तर्कदुष्ट तसेच स्पर्धेच्या लौकिकावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरते. हे योग्य असेल तर आयोजकांनी याआधी प्रत्येक वर्षी आयोजक वा परीक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे नाटय़कृती सादर झाल्या असे जाहीर करायला हवे. ते करायचे तर या अपेक्षा काय हे निश्चित व्हायला हवे. अपेक्षा काय हे सांगायचे नाही आणि तरी अपेक्षाभंगाचे दु:ख मात्र व्यक्त करायचे ही शुद्ध लबाडी झाली. तसेच आयोजक/परीक्षक आणि स्पर्धक हे परस्परविरोधी घटक अपेक्षांबाबत जर एकाच प्रतलावर आले तर मग स्पर्धेची गरजच काय? अशा परिस्थितीत व्यक्त होण्यासाठी ‘ज्ञानदीप’चा किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवर घरातल्या घरात दागिने घालून बसणाऱ्या सासू-सुनांच्या मालिकेचा एखादा भाग पुरेसा होईल. तेथे काही स्पर्धा असण्याचा प्रश्नच येत नाही. पण स्पर्धेचे, त्यातही विशेषत: कला स्पर्धेचे, उद्दिष्टच प्रचलित अपेक्षांना धक्का देणे हे असायला हवे. कादंबरीबाबतच्या प्रचलित समजांना ‘कोसला’ धक्का देते, रकृ जोशी काव्यलेखनाचे प्रचलित समज बाजूस ठेवून ‘अक्षरकविता’ करतात, कोणत्याच घराण्यांच्या चौकटीत कोंबता न येणारे गाणे वसंतराव देशपांडे सादर करतात तेव्हा अशांचे परीक्षण ‘पुरुषोत्तम’कार कसे करणार? प्रचलितांचा अपेक्षाभंग, समजांचे मूर्तिभंजन हे कलाकाराचे आद्य ध्येय असायला हवे. ते पुरेसे नाही, ही तर मराठी कलाविश्वाची खरी शोकांतिका आहे. असे असताना तरुणांच्या अभिव्यक्तीचा मुक्त हुंकार असलेल्या एकांकिका स्पर्धात जर अपेक्षाभंग होत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे.

हेही वाचा >>> अग्रलेख : देवेंद्रीय आव्हान : २.०

पुढील मुद्दा तांत्रिक. या स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिका थेट काही अंतिम फेरीत आल्या नाहीत. त्या त्या प्राथमिक फेऱ्यांत या सर्वोत्कृष्ट ठरल्या. म्हणून त्यांची अंतिम फेरीत निवड झाली. पण या प्राथमिक चाळण्यांत ‘तुम्ही ‘अ’ दर्जाच्या नाही, ‘ब’ दर्जाच्याच आहात’, असे त्यांस सांगितले गेले होते काय? तसे झाले असते तर अंतिम फेरीत सर्वच ‘ब’ दर्जाच्या एकांकिका उरल्या असत्या आणि मग ‘ब’ तील ‘अ’ निवडणे सोपे झाले असते. पण तसे झालेले नाही. प्राथमिक फेऱ्यांत या एकांकिका त्या त्या फेऱ्यांतील उत्तम म्हणूनच निवडल्या गेल्या. म्हणजे अंतिम फेरी ही प्राथमिक फेऱ्यांतील उत्तमांतच होणार आणि या उत्तमांतील सर्वोत्तम विजेता ठरायला हवी. असे असताना अंतिम फेरीत कोणीच सर्वोत्कृष्ट नाही; हे आयोजक कसे काय म्हणतात?  हा यातील सर्वात आक्षेपार्ह भाग. सर्वोत्कृष्ट काय हे ठरवण्याचा मक्ता काय तो आमच्याकडे आहे आणि आम्ही जो ठरवू तो सर्वोत्कृष्ट हा परीक्षक आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आयोजकांचा अहं! वास्तविक यंदाच्या स्पर्धेतील स्पर्धक आयोजकांस परीक्षकांच्या सर्वोत्तमतेबाबतही प्रश्न विचारू शकतात. ते विचारले गेले नसतील तर तो स्पर्धकांचा विनय किंवा नियमांचा आदर करणे असेल. ही नाटय़स्पर्धा आहे. तिचे मूल्यमापन करणाऱ्यांचे नाटय़ क्षेत्रातील योगदान काय, असा प्रश्न कोणी उपस्थित केल्यास त्यास औद्धत्य ठरवणे अवघड. ज्याचे परीक्षण करावयाचे आहे त्याच क्षेत्रात परीक्षकांचे कर्तृत्व निर्विवाद असावे ही अपेक्षा गैर नाही. या सर्वापलीकडचा मुद्दा नाटय़क्षेत्राच्या भवितव्याचा. आधीच रंगभूमी करणाऱ्यांची संख्या आकसू लागली आहे. दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी आदी आकर्षणांमुळे या क्षेत्राकडे अनेक पाठ फिरवू लागले आहेत. तेव्हा जे काही कोणी प्रयत्न करीत आहेत त्यांच्या पाठीशी उभे रहायचे की तुमच्यात अपेक्षित गुणवत्ता नाही, म्हणून त्यांना खिजवायचे? ते पाप यंदाच्या ‘पुरुषोत्तम’ने केले. यंदा ‘करंडक पात्र कोणीच नाही’ असे म्हणण्यातून सुरेश भट म्हणून गेले त्या प्रमाणे सांस्कृतिक मठांतील मंबाजींची मक्तेदारी तेवढी दिसते. विजेते जाहीर करणे हे आयोजक टाळू शकतील. पण गुणवत्ता नाकारू शकणार नाहीत. पहिल्या परिच्छेदातील उल्लेख परीक्षकांच्या नाकांवर टिच्चून गुणवत्ता सिद्ध करणाऱ्यांचे. ही मंबाजींची मक्तेदारी प्रत्येक पिढीने त्या त्या वेळी मोडून काढलेली आहे. ‘पुरुषोत्तम’ त्यास अपवाद असणार नाही.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on results of purushottam karandak zws
First published on: 21-09-2022 at 01:47 IST