विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करून ज्या व्यवसायात जाऊ इच्छितो, त्यासाठीचा कल तपासणे हाच प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यामागचा उद्देश असायला हवा…

परीक्षेचा निकाल चांगला लागला, एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाले, की आनंद होणे साहजिक. त्यातून ते ९० टक्के किंवा त्याहून अधिक वगैरे असतील, तर विद्यार्थी-पालकांना आकाश ठेंगणे होते. ‘हुशार’ १० टक्क्यांमधील असणे याला सामाजिक प्रतिष्ठेचे एक लोभस वलय आहे. पूर्वी हे अधिक होते; कारण ‘हुशार’ १० टक्क्यांमध्ये परीक्षा दिलेल्यांपैकी जेमतेम एक टक्का असायचे. पण, अलीकडे दहावी-बारावीच्या निकालानंतर असे ‘गुण’वंत गल्लोगल्ली सापडतात. म्हणजे ९० टक्के मिळवणे हे चांगलेच, पण ते मिळवण्याचेही अलीकडे सुलभीकरण झाले आहे की काय, त्याचेही एक ठरावीक सूत्र सापडले आहे की काय, असे वाटावे अशी आजची शिक्षण स्थिती आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल ‘सर्वोत्तम पाच’ म्हणजे सहापैकी ज्या पाच विषयांत सर्वोत्तम गुण आहेत, त्यावरून काढलेली टक्केवारी अशा पद्धतीने जाहीर करायला सुरुवात केली तेव्हापासून हे असे ‘गुण’वंत वाढले असल्याची चर्चा होत आहेच. ही निकालात वाढ होत नसून, त्याला सूज येत आहे, असेही शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक ओरडून सांगतात. पण, ‘अमुक पार’, ‘तमुक पार’ वगैरेचे आकर्षण इतके वाढले आहे, की बहुतांना नव्वदीपार म्हणजे गुणवत्ता वाटू लागली आहे. ही सगळी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे चार दिवसांपूर्वी जाहीर झालेला नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ या परीक्षेचा निकाल आणि त्यातही भरघोस वाढलेले ‘गुण’वंत. या निकालाने मात्र अनेक प्रश्नचिन्हं आणि काही चिंता उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे त्यावर चर्चा करणे महत्त्वाचे. वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी ‘नीट’ ही परीक्षा घेतली जाते. वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या देशभरातील लाखभर जागांसाठीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा होते, ज्याला यंदा सुमारे २३ लाख विद्यार्थी बसले. यंदाच्या परीक्षेचा निकाल अनेकांसाठी अजूनही ‘अनाकलनीय’ आहे. परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळवलेल्यांची संख्या ६७ इतकी आहे. त्यानंतरच्या प्रत्येक गुणासाठी एवढी स्पर्धा आहे, की ७२० पैकी ७०० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक १९९३ आहे. हे अत्यंत विचित्र अशासाठी, की देशातील आघाडीच्या दिल्लीतील ‘एम्स’मध्ये १२५ जागा उपलब्ध असताना, तेथील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला ७०० गुण मिळवूनही तेथे प्रवेशाची शाश्वती नाही. आता कोणी म्हणेल स्पर्धा असणे चांगलेच. मान्यही. पण, ती यंदाच अचानक कशी काय सुरू झाली, हा मोठा प्रश्न आहे. बरे, हे फक्त ७२० पैकी ७०० किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्यांपर्यंत मर्यादित नाही. उदाहरणार्थ, ७२० पैकी ६४८ गुण मिळवलेल्याचा गुणानुक्रम ४०,००० च्या पुढे आहे. याचा अर्थ परीक्षेत ९० टक्के गुण मिळवूनही सरकारी वैद्याकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेलच याची शाश्वती नाही.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial student curriculum separate entrance test for admission exam result amy