मानवी इच्छाशक्तीचे अलौकिक दर्शन घडवणारी सिमॉन बाइल्स… हा यंदाच्या ऑलिम्पिकमधला उमेद वाढवणारा निर्णायक क्षण…
कोणत्याही भव्य घटनेत काही क्षणचित्रे असतात, काही मन-चित्रे असतात आणि काही असतात- डिफायनिंग मोमेंट- म्हणता येतील असे निर्णायक क्षण. मनु भाकर हिची दोन, मराठमोळा स्वप्निल कुसळे, अमन शेरावत, आपला हॉकी संघ आदींची कांस्य पदके, नीरज चोप्राचे रौप्य ही काही आपण लक्षात ठेवावी अशी पॅरिस ऑलिम्पिकमधील क्षणचित्रे. आवर्जून लक्षात ठेवावीत अशी मनचित्रे यापेक्षा अधिक. भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानी आव्हानवीर अर्शद नदीम याला उत्तेजन देणारा नीरज चोप्रा आणि त्या उमद्या मानसिकतेचे उगम दर्शवणाऱ्या त्याच्या आईची स्पर्धेनंतरची उदात्त प्रतिक्रिया, पाकिस्तानातून अर्शदच्या अम्मीने दर्शवलेला असाच मायाळू उमदेपणा हे एक असे सुखद उल्लेखनीय मनचित्र. आपल्या विनेश फोगटचे जे काही झाले ती तर दु:खद मनचित्रांची मालिकाच. त्यातील एकेक चौकट म्हणजे वेदनाचित्र. एका क्रीडाबाह्य कारणासाठी पदक गमवायची वेळ आलेली विनेश एका बाजूला. आणि मी सुवर्णपदकाखेरीज अन्य काहीही स्वीकारणार नाही, असे ठाम म्हणत रौप्याची संधी नाकारत सुवर्ण पदकाचा घास घेणारी चीनची हौ झीहुई हे एक देदीप्यमान मनचित्र. चीनच्या या स्पर्धकाच्या नावे वास्तविक ऑलिम्पिकची दोन सुवर्ण पदके, विश्वविजेतेपद आहे आणि तरीही तांत्रिक चुकीमुळे पॅरिसला सुवर्ण चुकेल की काय अशी शक्यता निर्माण झाल्यावर तिच्या प्रशिक्षकाने क्षणात ही चूक दुरुस्त केली आणि हौ हिने नव्या भारोत्तोलन विक्रमासह सुवर्ण पटकावले. ते पाहिल्यावर विनेशचे जे झाले ते मनचित्र अधिकच वेदनादायक ठरते. पण या सगळ्यांस गाडून पॅरिस ऑलिम्पिकच्या निर्णायक क्षणांवर नाव कोरले जाते ते सिमॉन बाइल्स हिचे आणि तिच्या एकटीचे.
सिमॉन हिने या एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक रौप्य एकहाती लुटले एवढ्या एकाच कारणासाठी ती निर्णायक क्षणाची निर्माती ठरत नाही. तिच्या एकूण पदकांची संख्या ४० पेक्षाही जास्त आहे आणि त्यातली फक्त ऑलिम्पिकमधली पदकसंख्या डझनास एक कमी इतकी भव्य आहे. हे तिचे तिसरे ऑलिम्पिक. ती ऑलिम्पिक आणि अन्यत्र साधारण ३७ स्पर्धांत उतरली. त्यात केवळ चार स्पर्धांत तिला सुवर्ण पदक मिळवता आले नाही, म्हणूनही ती निर्णायक क्षणाची मालकीण ठरत नाही. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेतच. पण या सगळ्याच्या जोडीला वैयक्तिक तसेच क्रीडा आयुष्यात करावा लागलेला संघर्ष आणि त्यावर मनातील खिलाडूपणास तडा जाऊ न देता केलेली मात सिमॉनला असामान्यत्वाच्या पातळीवर घेऊन जाते. इतिहासावर असे असामान्यत्व कोरणाऱ्यांचाच निर्णायक क्षणांवर अधिकार असतो. पॅरिस ऑलिम्पिक हे सिमॉनचे ऑलिम्पिक ठरते. खरे तर याआधीच्याच टोकिओ ऑलिम्पिकमधून सिमॉनवर ‘बहुत बेआबरू’ होऊन काढता पाय घेण्याची नामुष्की आली होती. तत्पूर्वी ब्राझीलमधल्या रिओ येथील ऑलिम्पिक खेळात सिमॉनने आपल्या अविश्वसनीय प्रतिभेचे दर्शन घडवले होते. त्यामुळे टोकिओत तिच्या नावावर अर्धा डझन पदके गृहीत धरली जात होती. पण तिला माघार घ्यावी लागली. त्यासाठी कारण ठरले ट्विस्टी. अवघड कसरती करत असताना अधांतरी अवस्थेत उंचीचा अंदाज तिने गमावला आणि त्यामुळे तिचा आत्मविश्वासच गेला. संघाच्या जोरावर नाव राखण्यापुरते रौप्य तिने मिळवले खरे. पण जे झाले त्यामुळे तिच्या क्रीडा भविष्यालाच फास लागला. हा अपघात नुसता शारीरिक नव्हता.
त्यातून सिमॉन नैराश्य-विमनस्कतेच्या गर्तेत गेली आणि लहानपणापासून भोगाव्या लागलेल्या आयुष्याने तिला मनोरुग्ण केले. अमेरिकेतील असंख्य गरीब अफ्रिकी निर्वासितांच्या वाट्यास आलेले निराश आयुष्य हेच सिमॉनचेही भागधेय होते. जन्मदात्यांऐवजी कोणा अन्यांनीच तिला वाढवले. या सर्व कटू जखमा तिच्या भरल्याही होत्या. पण टोकिओ ऑलिम्पिकने त्या सर्वांवरच्या खपल्या निघाल्या आणि आपल्या प्रशिक्षकाकडूनच झालेल्या लैंगिक शोषणाच्या भयानक जखमांच्या आठवणींना तिला विदग्ध केले. या प्रशिक्षकास शिक्षा झाली आणि सिमॉनसह अन्य काहींना हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल गौरवले गेले. हा गौरवही सहन होणार नाही इतकी नाजूक तिची मनोवस्था होती. पण सिमॉनचा धीरोदात्तपणा असा की तिने हे सर्व उघड केले आणि मनोरुग्णता कबूल करण्याची हिंमत दाखवली. ‘‘करेज टु सोअर: अ बॉडी इन मोशन, अ लाइफ इन बॅलन्स’’ या ‘बेस्ट सेलर’ आत्मचरित्रात तिची ही कर्मकहाणी नमूद आहे. ती घेऊनच ती पॅरिस ऑलिम्पिकला उतरली आणि अर्धा डझनास एक कमी पदके लुटून गेली. अलीकडेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफ्रिकी निर्वासितांवर आपला सामाजिक बुद्ध्यांक दर्शवणारी टीका केली होती. हे अफ्रिकी ‘‘काळी कामे’’ (ब्लॅक जॉब्स) करतात असे ट्रम्प म्हणाले. पॅरिसमधील विक्रमी कामगिरीनंतर सिमॉन हिने ट्रम्प यांना ‘‘आय लव्ह माय ब्लॅक जॉब’’ असे चोख प्रत्युत्तर दिले. मानवी क्षमता, मर्यादांवर मात करण्याच्या अ-लौकिक ताकदीचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेली सिमॉन म्हणूनच पॅरिस ऑलिम्पिकचा निर्णायक क्षण ठरते. आणि तोच क्षण सदेह अनुभवण्यासाठी टॉम क्रूझ, निकोल किडमन, लेडी गागा, आरिआन ग्रांदे, सारा जेसिका पार्कर असे डझनाहून अधिक कलाकार खास पॅरिसला पायधूळ झाडते झाले. एखाद्या जिमनॅस्टच्या प्रदर्शनासाठी इतके तारकादल क्रीडा मैदानावर उतरण्याचा प्रसंग विरळाच. त्यातूनही सिमॉन या ऑलिम्पिकचा निर्णायक क्षण कसा ठरते, हे दिसून येते.
बाकी तसे नेहमीचेच. पदकांसाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या चीनशी सरकारी पातळीवर कसलाही आटापिटा न करणाऱ्या अमेरिकेने या स्पर्धांत पदक बरोबरी साधली. हे दोन देश क्रीडा क्षेत्रातही महासत्ता कसे आहेत ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. तथापि महासत्तापदापर्यंत पोहोचण्याचा या दोन देशांचा मार्ग भिन्न. पाश्चात्त्यांची क्रीडाविश्वातील आघाडी मोडून काढण्यासाठी चीनमधे सरकारी वरवंटा निरंकुशपणे फिरवला जातो तर अमेरिका लोकशाही तत्त्वांचा आदर करत हा विषय नागरिकांवर सोडते. चीनचे पदकांसाठीचे वर्तन पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत रशियाची आठवण करून देते तर अमेरिका नागरिकांच्या उद्यामशीलतेवर विश्वास ठेवते. जे कोणी गुणवान असतील त्यांना अमेरिकी सरकार सर्व साह्य जरूर करते. मात्र अमेरिकी राज्यकर्ते पदकविजेत्यांच्या गौरव-उजेडात आपली प्रतिमा उजळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत नाहीत. म्हणून स्पर्धेत पदके मिळवण्याच्या ईर्षेने निघालेल्या स्पर्धकांना अमेरिकी सत्ताधीश ‘मने जिंकून या’सारखा बावळट सल्ला देत नाहीत की विजयीवीरांना आग्रहाने बोलवून चहा-पाणी करण्यात आणि त्यांना ‘मार्गदर्शन’ वगैरे करण्यात वेळ घालवत नाहीत. आणखी एक बाब. इतका भव्य सोहळा पॅरिसमध्ये पंधरवडाभर रंगला. पण कोठेही फ्रेंच सत्ताधीशांचे मिरवणे नाही की त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन नाही. नाही नाही म्हणता या यजमान देशानेही १६ सुवर्णपदकांसह ६४ पदके जिंकून पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले.
भारत टोकियो ऑलिम्पिकच्या तुलनेत २३ पायऱ्या गडगडून ७१ व्या स्थानावर गेला आहे. यातून आपली अधोगती किती, हे स्पष्ट दिसते. पाकिस्तानही आपल्यापेक्षा नऊ पायऱ्या पुढे आहे! ही बाब तरी खरे तर आपल्याकडे ऑलिम्पिक भरवण्याच्या चर्चा करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हरकत नाही. ऑलिम्पिक म्हणजे केवळ भव्य स्टेडियम्स, पंचतारांकित सुविधा आणि या निमित्ताने कंत्राटेच कंत्राटे, ती मिळवण्याची चंगळ इतकेच नसते. ते काय असते हे समजून घेण्यासाठी आधी जुगाडांच्या पलीकडे पाहायची सवय अंगी बाणवावी लागेल. त्याची सुरुवात कधी करणार, हा प्रश्न.
© IE Online Media Services (P) Ltd