भुकेल्या पोटासाठी अवघी दुनिया भगवंताला आळवत आहे. हृदयाची भूक भागावी, यासाठी मात्र कुणीच हाक मारत नाही! ‘आधी पोटोबा, मग विठोबा’ या म्हणीचा दाखला देत काही जण विचारतात की, ‘‘भुकेल्या पोटी भक्ती कशी साधेल? तेव्हा आधी पोटाची भूक भागवा, मगच हृदयाच्या भुकेकडे लक्ष जाईल.’’ पण असं होतं का हो? माणसाची भौतिकाची भूक कधीच संपत नाही. पोट भरलं की भगवंताची भक्ती सुरू होईलच, असं नाही. धनबळानं अहंकार वाढू शकतो. फसव्या मोठेपणाच्या कल्पनेत मन अडकू शकतं. संत तुलसीदास यांनी ‘श्रीरामचरितमानस’मध्ये म्हटलं आहे की, ‘‘नहिं कोउ अस जनमा जग माहीं, प्रभुता पाई जाहि मद नाहीं!’’ (बालकाण्ड). म्हणजे, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं प्रभुत्व मिळूनही ज्याच्या अंत:करणात त्या बळाचा मद निर्माण होत नाही, असा या जगात कुणीही नाही! तेव्हा पोटाची भूक भागली की निवांत भक्ती करू, या म्हणण्याला अर्थ नाही. आता काही जण म्हणतात की, ‘‘भौतिक जीवनातल्या अडचणी कमी होऊ  देत, भौतिक जीवन थोडं मार्गी लागू दे, मग साधना करू.’’ तर, तसंही शक्य नाही. एक माणूस नदीकाठी उभा होता. काही तास उलटले तरी तो तसाच उभा! त्या नदीकाठी राहत असलेल्या एका माणसाला राहावलं नाही. त्यानं विचारलं, ‘‘बाबा, तुम्ही नदीकाठी असे उभे का आहात सकाळपासून?’’ तो माणूस उत्तरला, ‘‘मला पलीकडे जायचं आहे!’’ आश्चर्यानं गावकरी म्हणाला, ‘‘अहो, मग जायचं की! त्या काय होडय़ाही आहेत..’’ तो माणूस उत्तरला, ‘‘छे! मला होडीची भीती वाटते.’’ गावकऱ्यानं विचारलं, ‘‘मग जाणार कसे?’’ माणूस म्हणाला, ‘‘ही काय नदी वाहतच तर आहे! सगळं पाणी वाहून गेलं की जाईन चालत!’’ तशी आपली गत आहे. भौतिक परिस्थिती सुधारली की भक्ती करू, असं मत असेल तर भक्ती कधीच होणार नाही! नदी वाहत असली, तरी सगळं पाणी जसं वाहून जात नाही; तसंच भौतिक जीवन कितीही सावरा, ते कायमचं स्थिरसावर कधीच होणार नाही. मग वाहती नदी पार करायची, तर जसं होडीतून जायला हवं; तसंच भक्तीच्या होडीनं वाट काढल्याशिवाय भौतिकाच्या भवसागरातून पार होताच येणार नाही. पोहून हा भवसागर पार करू म्हटलं, तर इच्छांच्या लाटा, मोहाच्या मगरी, भ्रमाचे भोवरे कधी बुडवतील याचा नेम नाही! बरं, ज्या भौतिकात आज आपण अगदी गुंतून आहोत, रुतून आहोत, ते आपल्यालाही मृत्यूच्या क्षणी सोडावंच लागणार आहे. एकनाथ महाराज ‘एकनाथी भागवता’च्या सतराव्या अध्यायात सांगतात, ‘‘जैसे वृक्षातळीं पांथिक। एकत्र मीनले क्षण एक। तैसे पुत्रदाराप्तलोक। सर्वही क्षणिक संगम।।४९८।। उभय नदीप्रवाहेंसीं। काष्ठें मीनलीं संगमीं जैसीं। सोयरीं सर्व जाण तैसीं। हेलाव्यासरसीं फांकती।।४९९।।’’ पूर्वी लोक दूरदूरचा प्रवासही पायीच करीत. मग दमल्यावर वाटेतील एखाद्या मोठय़ा वृक्षाच्या शीतल छायेत काही घटका विश्रांती घेत. त्या वेळी तिथं विसाव्याच्या हेतूनं बसलेल्या अन्य पांथस्थांशी तेवढय़ा काळापुरतं हितगुज होई. मग परत जो तो आपापल्या मार्गानं निघून जाई. तसं या जीवनवृक्षाच्या सावलीत काही काळासाठी पती-पत्नी, पुत्र-कन्या, आप्त-मित्र असे पांथस्थ जमले आहेत. काही काळात ते एकमेकांपासून अटळपणे दुरावणार आहेत. हे अटळ जीवनसत्यच आहे! – चैतन्य प्रेम