चैतन्य प्रेम

सध्याच्या रोगसंकटाच्या वातावरणात एक शब्द आत्यंतिक वापरला जात आहे, तो म्हणजे- ‘संसर्ग’! योगायोग असा की, बाहेरच्या परिस्थितीचे ‘साक्षी’ बनून आपण स्वत:ला ‘घरंटाइन’ केलं असतानाच विनोबांचं एक पुस्तक हाती आलं. ‘महागुहेत प्रवेश’ हे त्याचं नाव. ध्यानाविषयीचं चिंतन हा या पुस्तकाचा गाभा आहे. यात पातंजल योगसूत्रांचंही विनोबांनी संक्षेपानं चिंतन केलं आहे. त्यात ‘‘शौचात् स्वांग-जुगुप्सा परै: असंसर्ग:।’’ या पातंजलीच्या सूत्रावरील विनोबांच्या विचारमंथनात आज चर्चेत असलेले दोन परवलीचे शब्द सापडतात, ते म्हणजे- ‘संपर्क’ आणि ‘संसर्ग’! अर्थात, विनोबांनी हे चिंतन मांडलं होतं तेव्हा आजच्या रोगसावटाची कल्पनाही कुणी केली असण्याची शक्यताच नाही. विनोबांनी मांडलेलं हे सूत्र ‘पातंजल योगदर्शना’च्या साधनपादात आहे. ‘शौच’ म्हणजे शुचिता, स्वच्छता. ही दोन प्रकारची असते : पहिली शारीरिक आणि दुसरी मानसिक. या सूत्रात शारीरिक शुचितेचं वर्णन आहे. या सूत्राच्या अर्थाचा रोख असा की, ‘शारीरिक शुचिता पाळल्याने स्वत:च्या देहाविषयी अरुची निर्माण होते आणि शुचितेचं पालन करीत नसलेल्या माणसाचा संसर्ग होऊ नये अशी बुद्धी होते.’ आता साधनेचा पाया पक्का नसलेल्या माणसाला स्वत:च्या देहाची अरुची कधीही वाटत नसली, तरी या सूत्राच्या विवेचनात विनोबांनी मांडलेला एक विचार आजच्या पार्श्वभूमीवर प्रकर्षांने मनाला भिडतो. तो विचार म्हणजे, ‘संपर्क असावा, संसर्ग नको!’ विनोबा लिहितात, ‘दुसऱ्याशी संपर्क असावा, संसर्ग नसावा. म्हणजेच संपर्क आक्रमक, शारीरिक पीडा देणारा नसावा. जरा दुरून संपर्क असावा. सोबत असावी, तरी अंतरही असावे. समजा ग्रामरचना करायची आहे; तर त्यात संपर्काची योजना असावी. आजची जी नगररचना आहे, ती संसर्ग योजना आहे. त्यात असा संपर्क आहे, ज्यामुळे अस्वच्छता होते. चित्त शांत राहत नाही.’ मग संपर्क आणि संसर्ग यांतील अंतर दाखवताना विनोबा जे सांगतात, त्यातील मुद्दय़ाचीही चर्चा सध्या बरीच झाली आहे. विनोबा लिहितात, ‘आपल्याकडे एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करण्याची प्रथा आहे. पश्चिमेकडे हस्तांदोलन करतात. आपल्या योजनेत संसर्ग नाही, संपर्क आहे.. ते लोक फुलांचा गुच्छ हातात देतात. गुच्छात फुलांना स्वातंत्र्य नसतं. सगळी फुलं एकत्र बांधलेली असतात. आपल्याकडे हार घालण्याची पद्धत आहे. त्यात प्रत्येक फूल वेगवेगळे असते. स्वतंत्र असते. गुच्छात संसर्ग आहे, संपर्क नाही. हारात संपर्क आहे, संसर्ग नाही.’ त्यामुळे संपर्काला वाव देत संसर्ग टाळणारी ग्राम आणि नगररचना असावी, असं मत विनोबा मांडतात. आता विनोबांच्या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीचा विचार केला, तर शारीरिक स्वच्छतेइतकीच मनाची स्वच्छता महत्त्वाची झाली आहे, हे लक्षात येईल. संसर्ग नको, पण नुसता संपर्क नको, तर संवादही हवा, हे लक्षात येईल. संसर्ग टाळण्यासाठी संपर्काचे मार्ग नियंत्रित करतानाच संवादाचे मार्ग खुंटू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. ‘वाद’ आणि ‘संवाद’ हे दोन शब्द आहेत. ‘वाद’ हा मतभेद सूचित करतो, तर ‘संवाद’ हा मतभेद असूनही त्यातून मार्ग काढण्याची सक्रिय सदिच्छा व्यक्त करतो. हा संवाद जसा दुसऱ्याशी आहे, तसाच तो स्वत:शीही घडला पाहिजे. अंतरंगातील अशुद्ध विचारांचा संसर्ग त्यातून सुटला पाहिजे.