जगातला प्रत्येक जण प्रत्येक क्षणी आपापल्या स्वार्थासाठीच धडपडतो आहे. त्यामुळे जो तो अशांत आणि अस्थिरतेच्या खाईत कधी कोसळेल, याचीही काही शाश्वती नाही. त्यामुळे या बाहेरच्या जगात कोलाहल असणारच; पण अंत:करणात कोलाहल नको, हे सत्पुरुषाच्या सहवासात जाणवू लागतं. त्यांच्यासारखंच आपण शांत-तृप्त असावं, अशी तीव्र इच्छाही मनात उत्पन्न होते; पण गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे, काही सत्पुरुष क्रोधाविष्ट होतात, तेव्हा माणसाच्या मनात विकल्प निर्माण होऊ शकतो. इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती अशी की, संत आणि सत्पुरुष वा सद्गुरू यांच्यात एक अगदी सूक्ष्म असा भेद आहे. संत हा केवळ भगवंताच्या भक्तीत रममाण असतो, तर सत्पुरुष वा सद्गुरू हे जनांना भक्तीची शिकवण देत असतात. त्यामुळे संत हा अंतर्बाह्य़ शांतच असतो, तर सत्पुरुष वा सद्गुरू हा समाजाला वळण लावण्यासाठी बाह्य़त: क्रोधाविष्कार धारण करू शकतो. गोंदवलेकर महाराज एकदा संतापून कुणाला काही तरी ओरडत होते. भाऊसाहेब केतकर बाजूलाच उभे होते. त्यांच्या मनात आलं की, महाराजांच्यात एवढा राग असणं बरं नाही. हे त्यांच्या मनात येताच महाराज एकदम त्यांच्याकडे वळले आणि म्हणाले, ‘‘भाऊसाहेब, हा राग गळ्याच्या वर आहे!’’ कधी कधी परम शांतीनंही पालट घडू शकतो. एकनाथ महाराज स्नानाहून गंगेवरून परतत असता पैठण येथेच एक यवन त्यांच्यावर अनेकवार थुंकला, तरी नाथांची शांती ढळली नाही. त्या शांतीचा वारंवार प्रत्यय आल्यावर त्या यवनानं त्यांचे पाय धरले. आता अशा त्रासाच्या घटना प्रत्येकच संताच्या जीवनात घडल्या आहेत आणि त्रास देणाऱ्यांत जसे अडाणी आणि परधर्मी होते तसेच दशग्रंथी विद्वान आणि स्वधर्मीदेखील होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण समाजाचा त्रास सोसूनही समाजाला जागृत करण्याचं काम संत सतत करीत राहिले आणि प्रतिकूल परिस्थितीतही जो एखादं सकारात्मक काम करत राहतो त्याच्या अंगी धीर, उमेद, चिकाटी यांबरोबरच मुख्य गुण असतो, तो म्हणजे शांती! अवधूतानं हाच गुण पृथ्वीकडून ग्रहण केला. ज्या पृथ्वीवर अवधूत वावरला, त्याच पृथ्वीवर आपणही जन्मलो आणि जगतही आहोत. पण हा गुण आपल्या आकलनातही कधी आला नाही. मग हा चराचरातला पहिला गुरू कसा आहे? या गुरूपासून अवधूत नेमकं काय शिकला? यदुराजाला अवधूत सांगतो की, ‘‘पृथ्वी गुरु त्रिविध पाहीं। पर्वत वृक्ष आणि मही। यांचीं लक्षणें धरितां देहीं। गुरुत्व पाहीं पृथ्वीसी॥३६१॥’’ पर्वत, वृक्ष आणि भूमी या तिघांचे गुण पृथ्वीनंही आत्मसात केले आहेत आणि त्यामुळे ती तीन प्रकारे गुरू ठरली आहे, असं अवधूत म्हणतो. आता या तिघांचे कोणते गुण साधकाला घेण्यासारखे आहेत, याचं विवेचन तो करतो. तो म्हणतो, ‘‘पृथ्वी ते नानाभूतीं। माझी माझी म्हणौनि झोंबती। नाना भेदी भिन्न करिती। निजवृत्तिव्यवहारें॥३६३॥ त्या भूतांचे भिन्न वर्तन। पृथ्वी संपादी आपण। मोडों नेदी अभिन्नपण। अखंड जाण सर्वदा॥३६४॥’’ म्हणजे पृथ्वी सगळी एकसंध आहे आणि तिच्याच आधारावर जीव जगतो आहे. तरीही तो त्या जमिनीचे तुकडे पाडतो आणि माझेपणानं त्या तुकडय़ांना स्वत:चं मानून, कवटाळून जगतो. वैर पोसतो, रक्तपातही घडवतो. तरीही ही पृथ्वी अभिन्नत्व मोडत नाही. ती सर्व जीवमात्रांना सारखाच आधार देते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2020 रोजी प्रकाशित
२९२. प्रथम गुरू
गोंदवलेकर महाराज एकदा संतापून कुणाला काही तरी ओरडत होते. भाऊसाहेब केतकर बाजूलाच उभे होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-02-2020 at 04:44 IST
मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmyog ekatmyog article number