अमृता सुभाष
आयुष्यात न ऐकाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे कापूसकोंड्याच्या गोष्टी का? पण त्या ऐकाव्या लागतातच ना. पर्याय नाही देत आयुष्य… पण गुलजारांसारखी माणसं त्या गोष्टीकडेही ‘तखलीख ‘च्या दृष्टीनं पाहतात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलजारसाहेबांना ज्ञानपीठ जाहीर झालं त्याच दिवशी माझ्या कुटुंबातलं कुणी जिवाभावाचं आमच्या आयुष्यातून कायमचं निवर्तलं. मी त्या जिवाभावाच्या दु:खातनं सावरत पुण्याहून मुंबईला परत आले तेव्हा ज्ञानपीठाला काही दिवस उलटून गेले होते. गुलजारसाहेबांना फोन लावला आणि दोन रिंगनंतर त्यांचा ‘कॅन आय कॉल यू लेटर’ असा मेसेज आला आणि मी नेहमीप्रमाणे त्यांना ‘हांजी’ असं उत्तर पाठवलं. काही वेळानं फोन वाजताच मी तो उचलला आणि पलीकडून आवाज आला ‘‘आता बोला’’. गुलजारसाहेबांचं मराठी कानाला अतिशय गोड लागतं. मी म्हटलं,‘‘बधाई बधाई बधाई’’.. ते म्हणाले, ‘‘तो खाओ मिठाई मिठाई मिठाई!’’ मी म्हटलं, ‘‘कब आऊ खाने मिठाई मिठाई मिठाई, कल, परसो, परसो नही तो नरसो?’’ यावर ते म्हणाले,‘‘नेक्स्ट वीक?’’ मी म्हणाले,‘‘नेक्स्ट वीक फोन करू?’’ यावर ते म्हणाले,’’करो फोन या करो खून!’’ मी दचकून म्हटलं, ‘‘काय?’’ ते हसून हिंदीत म्हणाले, ‘‘अगं, ‘फोन’चं यमक ‘खून’शीच ‘जुळतं आहे’’. मी म्हटलं,‘‘नाही,नाही, ‘खून’ नको, दुसरा शब्द शोधा.’’ मग आम्ही ‘फोन’,‘खून’, ‘पतलून’… असे शब्द आठवत एकापुढे एक जोडत गेलो आणि या जोड-गाडीचा शेवट ‘‘मै अगले हफ्ते आऊंगी पेहेनके पुलोवर मरून’’ या ,कवितेच्या मीटरमध्ये कोंबलेल्या माझ्या वाक्यानं झाली. मग मी त्यांना संदेशचा एक शब्द सांगितला. ‘जुविता.’म्हणजे अर्थवाही यमक जुळवून जी केली जाते ती ‘कविता’. आणि काही वेळा अर्थ वगैरे सोडून यमकाचा आटापिटा करून जी जुळवली जाते ती ‘जुविता’! संदेश आणि मी सकाळी उठल्यापासून किंवा रात्री झोप येत नसेल तर अंथरुणात पडल्या पडल्या असे शब्दाला शब्द जुळवत जुविता रचत रहातो. ‘जुविता’हा संदेशनं मराठी भाषेला बहाल केलेला शब्द. शिवाय जुविता करताना अर्थवाही होण्याचं दडपण नसल्यानं मेंदू मोकळा होतो आणि खूप हसू येतं असा माझा अनुभव आहे. गुलजारसाहेबांना मी गमतीनं म्हटलं, ‘‘तुम्हाला कवितांचं ज्ञानपीठ तर मला जुवितांचं!’’

हेही वाचा >>>कशी ही शाळा? या कसल्या सहली?

मग अचानक मी त्यांना विचारलं, ‘‘तुम्हाला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?’’ एकमेकांशी संबंध नसलेल्या काही शब्दांची ‘जुविता’रचताना मला आपल्या मराठीमधला ‘कापूसकोंड्याची गोष्ट’हा खेळ आठवला. मी तो गुलजारसाहेबांना समजावला. म्हटलं, ‘‘समजा मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?’’, यावर तुम्ही म्हणालात, ‘सांग’ तर मी म्हणणार, ‘‘‘सांग’काय म्हणता, तुम्हाला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?’’ यावर जर तुम्ही म्हणालात ‘‘अगं सांग ना!’’ तर मी म्हणणार, ‘‘अगं सांग ना काय म्हणता, तुम्हाला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?’’ गुलजारसाहेबांना हा खेळ आवडला. मी तो खेळ तिथेच सोडून त्यांना म्हटलं, ‘‘गुलजारसाब, मै जहा रेहती हुं, वहा सामने मैदान है और काफी पेड है. उसपर बैठे दो पंछी और उनके सामने बैठा हुआ एक कुत्ता भी आपको ज्ञानपीठ के लिये बधाई दे रहे है.’’ यावर गुलजारसाहेब लगेच म्हणाले,‘‘पंछी और कुत्तो की बधाइया क्यू दे रही हो मुझे कापूसकोंड्या की कहानी बताओ.’’ मी म्हटलं,‘‘गुलजार साब, आमच्या कापूसकोंड्याच्या गोष्टीत आम्ही समोरच्याची शब्दश: नक्कल करतो, पण तुम्ही हा खेळ खेळताना माझे शब्द न वापरता मी जे म्हणते आहे ते संक्षिप्त मांडून त्याला कापूसकोंड्याची गोष्ट जोडलीत. म्हणजे, आम्हाला लहानपणी मराठीच्या पेपरात एक प्रश्न असायचा, ‘पुढील उताऱ्याचे संक्षिप्तीकरण करा’… तुम्ही कापूसकोंड्याची गोष्ट खेळताना मी जे बोलते आहे ते शब्दश: न बोलता संक्षेपाने बोलत आहात त्यामुळे हा खेळ अजूनच मजेदार होतो आहे, म्हणजे तुम्ही क्रिएटिव्ह होता आहात!’’ यावर ते म्हणाले, ‘‘क्रिएशन को उर्दू मे ‘तखलीख’ कहते है, कापूसकोंडे की कहानी बताओ!’’ मला ‘तखलीख’ हा शब्द ‘तकलीफ’असा ऐकू आला, मी म्हटलं, ‘तकलीफ’? ते म्हणाले ,‘‘तकलीफ नही बेटा ‘तखलीख!’’’

त्यांच्या प्रतिभेमुळे कापूसकोंड्याची गोष्ट वेगळीच वळणं घेत होती, ती पाहणं माझ्यासाठी चित्तथरारक होतं. मी म्हणाले,‘‘कापूसकोंडा कौन होगा? उसकी कहानी क्या होगी? क्या बताऊं मै आपको?’’ यावर ते म्हणाले, ‘‘बैंगन को पंजाबी मे ‘बताऊ’ कहते है, कापूसकोंडे की कहानी बताओ.’’ मी म्हटलं,‘‘क्या? बैंगन को ‘बताऊ’ कहते है? ते म्हणाले, ‘‘जी’’! आणि आम्ही दोघं हसायला लागलो.

हेही वाचा >>>अशी कशी ही शाळा? या कसल्या सहली?

मी गुलजारसाहेबांबरोबर’ मनोर’ या गावी ‘सायलेंट’ नावाच्या रिसॉर्टमध्ये शूटिंग करत होते. मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबरीवर आधारित ‘निर्मला’ नावाच्या चित्रपटात मी निर्मलाची भूमिका करत होते. रात्री त्या रिसॉर्टमध्ये नीरव शांतता असायची. एका शांत तळ्याकाठी वसलेल्या या रिसॉर्टचं नावच मुळी ‘सायलेंट’ असं होतं. पण रात्री मला एकटीला खोलीत खूप भीती वाटायची. एके दिवशी नाश्ता करताना मी गुलजारसाहेबांना म्हटलं, ‘‘इथे किती शांत आहे, मला रात्री खूप भीती वाटते.’’ ते शांतपणे म्हणाले, ‘‘ठीक है, टुंटे को भेजूंगा रात को.’’ मी विचारलं, ‘‘टुंटा कौन है?’’ ते म्हणाले, ‘‘एक भूत है, मेरा दोस्त.’’ मी म्हटलं,’’ गुलजार साब, मुझे डर लग रहा है और आप भूतो की बात कर रहे है?’’ तर ते म्हणाले,’’ अरे टुंटा बहोत प्यारा भूत है. पेहली बार वो मुझे एक एरोप्लेन की खिडकी में मिला. बादलोंमे से निकलकर एकदम मेरी खिडकी के पास आया, सूरज बिलकुल उसके पीछे ही था. आया और मुझसे बाते करने लगा. हमारी एकदम दोस्ती ही हो गयी. तुम्हे भी अच्छा लगेगा उससे मिलकर. आज रात को आयेगा वो.’’ त्या रात्रीनंतर मला कधीच भीती वाटली नाही. त्यानंतर ‘टुंटा’ आम्हा दोघांच्या भावविश्वातलं एक कायमचं पात्र होऊन गेला आहे. आम्ही एखाद्या जिवंत माणसाविषयी बोलावं तसं टुंट्याविषयी एकमेकांशी बोलतो. ‘‘परवा टुंटा तुमच्याविषयी विचारत होता’’ वगैरे… आता या टुंट्याच्या जोडीला कापूसकोंडय़ाही असणार आहे असं वाटतं आहे मला.

पण ही कापूसकोंड्याची गोष्ट इथेच संपली नाही. त्याला जोडून अचानक तेंडुलकरांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट आठवली. आणि ती मी गुलजारसाहेबांना सांगू लागले. विजय तेंडुलकर. तेव्हा डोंबिवलीत राहात असत. एके रात्री तेंडुलकर लोकलनं डोंबिवली स्टेशनला परतले. स्टेशन ते घरापर्यंतचा रस्ता सुनसान जंगल. ते चालत घरी निघाले. अचानक त्यांच्यासमोर एक आकृती आली. ते क्षणभर दचकलेच! नीट बघितल्यावर कळलं की ती एक बाई होती. तिच्या अस्ताव्यस्तपणामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य नीट नसावं हे स्पष्ट दिसत होतं. ती भीतीदायक दिसत होती. तीही तेंडुलकरांबरोबर चालायला लागली. अचानक तिनं त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यांना भीती वाटली पण तेही तिच्याशी बोलू लागले. तिच्या एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीही संबंध नव्हता. तिच्या संदर्भहीन बोलण्याला तेंडुलकर संदर्भहीन प्रतिसाद देऊ लागले. सुरुवातीची भीती ओसरून तेंडुलकरांना त्या जंगलात तिची सोबत वाटू लागली. नंतर त्यांनी या अनुभवाकडे जेव्हा वळून पाहिलं तेव्हा त्यांना जाणवलं की त्या बोलण्यानं त्या काळापुरतं त्यांना रिलॅक्स व्हायला झालं.

हेही वाचा >>>उद्योगांवर कृपादृष्टी… सामान्यांवर वक्रदृष्टी! 

संदर्भाला धरून वागण्या बोलण्याचा आपल्याला ताण येत असेल का? तो ताण तिच्या संदर्भहीन संगतीत सैलावला असेल का? यावर गुलजारसाहेब म्हणाले, ‘‘अब आकर मिलो मुझ से. इस के आगे वाली बात फोन पर नहीं होगी’’. तो फोन ठेवला आणि तडक अरुण शेवते यांना फोन लावला. निर्मलाच्या शूटिंगनंतर गुलजारसाहेबांनी मला जवळपास दत्तक घेतलंच होतं, परंतु त्यांचं आणि माझं नातं अधिक गहिरं होण्याचं कारण म्हणजे अरुण शेवते. माझ्या आयुष्यातले कितीतरी लेख मी शेवत्यांच्या प्रेमळ पण ठाम आग्रहामुळे आणि प्रोत्साहनामुळे लिहिलेले आहेत, अगदी हा लेखसुद्धा. तर शेवत्यांनी गुलजारसाहेबांना कुसुमाग्रजांच्या कवितांचं उर्दू भाषांतर करायची कल्पना सुचवली आणि माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस सुरू झाले. कारण गुलजारसाहेबांनी त्या कवितांचा भावानुवाद मराठीतून हिंदीत समजवण्यासाठी मला बोलावलं. मी तो भावानुवाद त्यांना कसा समजवायचे याची गुलजारसाहेब नक्कल करतात. ती पाहून सगळे हसून बेजार होतात. मला एखादा हिंदी शब्द आठवला नाही की मी भरतनाट्यम शिकलेली असल्यानं त्यातले हस्त वापरून त्यांना कविता समजवायचे. त्या वेळी माझ्या उडालेल्या तारांबळीची नक्कल गुलजारसाहेब करत असतानाचा एक फोटो माझ्याकडे आहे. शेवत्यांना फोन करून मी म्हटलं, ‘‘गुलजारसाहेबांसारख्या माणसाचा सहवास मला तुमच्यामुळे मिळाला. मी तुमच्या कायम ऋणात राहीन. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना माझ्या आणि गुलजारसाहेबांमध्ये झालेलं फोनवरचं संभाषण सांगितलं. त्यात तेंडुलकरांची त्या संदर्भहीन बोलणाऱ्या बाईविषयीची गोष्ट सांगताना अचानक मला अजून एक गोष्ट आठवली.

माझ्या आयुष्यातल्या संदर्भ हरवलेल्या माणसाची, माझ्या बाबांची गोष्ट, माझे बाबा आणि गुलजारसाहेब यांच्यातल्या अजब नात्याची गोष्ट. बाबांना जेव्हा अल्झायमर झाला तेव्हा ते व्हायोलंट व्हायला लागले. यांना कसं शांत वाटेल काही कळेना..मी गुलजारसाहेबांना त्याविषयी सांगितलं तर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. मी बावरून म्हटलं, ‘‘सॉरी, मी हे तुम्हाला सांगायला नको होतं..’’ ते म्हणाले, ‘‘ हवं होतंस सांगायला…’’ मग डोळे पुसत उठले आणि बाहेरच्या खोलीतनं एक सीडी आणि एक छोटी पुस्तिका घेऊन आले. अब्दुल कलाम यांचं लघुचरित्र गुलजारसाहेबांच्या आवाजात रेकोर्डेड आहे. त्याची ती सीडी होती. मग त्यांच्या त्या गहिऱ्या आवाजात गुलजारसाहेब म्हणाले, ‘‘ये पिताजी को सुनाओ.’’आणि आश्चर्य किंवा खरं तर चमत्कार म्हणजे त्या सीडीतला गुलजारसाहेबांचा आवाज ऐकून बाबांना शांत वाटायचं. हे शेवत्यांना सांगताना मला असंही वाटलं की गुलजारसाहेब ज्या सहृदयतेनं माझ्या बाबांच्या आजाराचं ऐकून रडले, त्यानं त्यांनी मलाही रडायला मुभा दिली असेल का?

जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती अशा आजाराशी झुंजत असते तेव्हा तुम्हीही तुमच्या परीनं त्या व्यक्तीच्या बरोबरीनं त्या आजाराशी झुंजता. त्या झुंजण्यात दु:ख वाटण्याची आणि डोळ्यावाटे वाहू देण्याची मुभा नसते. आणि धाडसही नसतं. रडलो तर मोडून पडू असं वाटतं. पण कधी कधी, नव्हे माझ्या बाबतीत नेहमीच, रडण्यानं आणि वाहू देण्यानं मला शांत आणि सबळ वाटलं आहे. पण दरवेळी ते जमतंच असं नाही. मुभा नसते हेच खरं. पण ते वाहू देण्याचं धाडस जेव्हा गुलजारसाहेबांसारखा माणूस दाखवतो तेव्हा आपल्यालाही त्या मुभेपर्यंत पोचायचं बळ मिळतं. असा धाडसी माणूस हा एक चालतं बोलतं ज्ञानपीठच वाटतो मला. आता वाटतं आहे, सगळे संदर्भ हरवत चाललेल्या माझ्या वडिलांची गोष्ट ही माझी कापूसकोंड्याची गोष्ट होती तर. आयुष्यात न ऐकाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे कापूसकोंड्याच्या गोष्टी का? पण त्या ऐकाव्या लागतातच ना.पर्याय नाही देत आयुष्य. पण ती गोष्ट कशी ऐकायची ही निवड आपली. म्हणजे आयुष्य कधी कधी असे आघात देतं की आपली गोष्ट आहे तिथेच थिजल्यासारखी वाटते, कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखी. कापूसकोंड्याची गोष्ट हा खेळ खेळताना आपण समोरच्या माणसाची नक्कल करून त्याला विचारतो, तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू? शिवाय कुणी गोष्ट सांगू?असं विचारलं, तीसुद्धा ‘कापूसकोंड्या’ इतकं आगळं नाव असलेल्या माणसाची, की खेळ माहीत नसलेल्या माणसाला ती ऐकायची उत्सुकता वाटते खूप. पण हळूहळू कळत जातं आपला पचका होतो आहे. मग वैताग येऊ लागतो, भ्रमनिरासही होतो, पण त्या वैतागाचीही नक्कल करून समोरचा विचारतो, कापूसकोंड्याची गोष्ट सांगू.

या खेळात सगळी सूत्रं गोष्ट सांगणाऱ्याच्या हातात पण वर म्हटल्याप्रमाणे ती कशी ऐकायची याची निवड आपल्या हातात. ऐकणाऱ्याची टरच उडत जाते पण तरीही न हरण्याचं स्वातंत्र्य असतं त्याच्याकडे. जर चिडत गेला तो तर हरत जाणार तो. पण गुलजारसाहेबांसारखी माणसं त्या कापूसकोंड्याच्या गोष्टीकडे आणि पर्यायानं आयुष्यातल्या थिजवून टाकणाऱ्या ,न ऐकाव्याशा वाटणाऱ्या गोष्टींकडेही ‘तखलीख ‘च्या दृष्टीनं पाहतात ! गुलजारसाहेब जेव्हा हा खेळ खेळतात तेव्हा गोष्टीतला कापूसकोंड्या जिवंत झाल्यासारखा वाटतो, हसतो आणि म्हणतो, ‘‘याला कळलं हा एक खेळ आहे, हा खरा खिलाडी!’’

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about gulzar sahab selected for gyanpith award amrita subhash amy
First published on: 25-02-2024 at 04:21 IST