डॉ. सुमित गुजराल
कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर आधुनिक उपचार अद्याप देशाच्या गावखेड्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. डॉ. अनिता बोर्जेस यांनी ही उणीव भरून काढण्यासाठी शक्य त्या सर्व स्तरांवरून आयुष्यभर प्रयत्न केले. त्या उत्तम ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट तर होत्याच, पण त्याचबरोबर आग्रही शिक्षिकाही होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यांतील डॉक्टरांना उपचारांसंदर्भात प्रशिक्षण मिळावे यासाठी त्यांनी ऑनलाइन पर्यायांपासून ते प्रत्यक्ष त्यांच्या गावात जाऊन शिकवण्यापर्यंतचे सर्व मार्ग अवलंबले…

डॉ. अनिता बोर्जेस या भारतीय ऑन्कोपॅथॉलॉजीमधील दीपस्तंभ म्हणून ओळखल्या जात असल्या तरी देशातील ग्रामीण भागातील कर्करोगाच्या रुग्णांना त्यांच्या घराजवळ चांगले व मोफत उपचार मिळावेत यासाठी झटणाऱ्या त्या कर्मयोगी होत्या. देशातील लातूर, कानपूर, जम्मू, भोपाळ, गोरखपूर यासारख्या ग्रामीण भागांत जाऊन त्यांनी तेथील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कधीच कोणाकडे पैसे मागितले नाहीत. या प्रशिक्षणासाठी त्या स्वत:च्या खिशातून खर्च करत असत.

डॉ. अनिता बोर्जेस यांचे वडील अर्नेस्ट बोर्जेस भारतातील पहिले कर्करोग सर्जन होते. अनिता यांनाही सर्जन होण्याची इच्छा होती. त्या काळात देशात चांगले सर्जिकल पॅथॉलॉजिस्ट नसल्याने कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत. वडिलांनी त्यांना सर्जिकल पॅथॉलॉजिस्ट होण्याचा सल्ला दिला. वडिलांचा सल्ला मान्य करत त्यांनी मुंबईतील नायर रुग्णालयातून सर्जिकल पॅथॉलॉजी विषयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या.

न्यूयॉर्कमधील आघाडीच्या ‘मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर’मध्ये शिक्षण घेत असताना या सेंटरने त्यांना चांगल्या पगाराची नोकरी देऊ केली. तसेच लंडनमधील ‘रॉयल मार्सडेन’मध्येही त्यांना नोकरीची संधी मिळाली. मात्र अनिता बोर्जेस यांनी भारतात काम करायचे आहे, असे सांगत या दोन्ही ठिकाणच्या नोकरीच्या संधी नाकारल्या. त्यानंतर भारतात येऊन १९८० मध्ये टाटा रुग्णालयामध्ये त्या कन्सल्टंट म्हणून रुजू झाल्या. टाटा रुग्णालयात साधारणपणे २५ वर्षे सेवा केल्यानंतर त्या २००४ मध्ये रुग्णालयातून निवृत्त झाल्या.

अनिता बोर्जेस या हुशार डॉक्टर असण्याबरोबरच एक सहृदयी व्यक्ती होत्या. चांगल्या शिक्षिकाही होत्या. देशातील चांगल्या शिक्षकांपैकी त्या एक होत्या. त्यांनी शिकविलेले विद्यार्थी भारतातील बहुतांश वैद्याकीय महाविद्यालयांत व रुग्णालयांत काम करत आहेत. तसेच अनेकांनी अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशांमध्ये नाव कमावले आहे. कर्करोगाचे निदान करण्यासाठी स्तनाची, मेंदू, रक्त, जीआयटीपीची बायोप्सी केली जाते. यामध्ये अनिता बोर्जेस यांचे काम देशातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये अव्वल आहे. जगात फार कमी व्यक्ती आहेत, ज्यांना कर्करोगाच्या पॅथॉलॉजीचे अचूक निदान करता येते. त्यामध्ये अनिता बोर्जेस यांचे नाव अग्रस्थानी आहे.

ग्रामीण भागांतील सर्वच रुग्ण हे कर्करोगावरील उपचारांसाठी मुंबईत येऊ शकत नाहीत. मुंबईमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण फक्त दोन टक्के आहे. बहुतांश रुग्ण हे स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास प्राधान्य देतात. त्यांना आपापल्या गावीच उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण भागांतील डॉक्टरांसाठी मुंबईतील टाटा रुग्णालयात प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असे, मात्र हे डॉक्टर त्यांच्या रुग्णालयात गेल्यावर त्यांना जसेच्या तसे उपचार देण्यात अडचणी येत. टाटा रुग्णालयातील आधुनिक सोयीसुविधा ग्रामीण भागांत नसल्याने या अडचणी उद्भवत असत.

देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या डॉक्टरांची ही समस्या लक्षात घेत डॉ. बोर्जेस यांनी ग्रामीण भागात जाऊन डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा व मदत करण्याचा निर्णय घेतला. देशातील लहान शहरांमध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी लॅब विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. मागील दोन वर्षांपासून आम्ही यावर काम करत आहोत. याची माहिती सरकारला कळल्यावर त्यांनी आमच्यासोबत हा कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि निधीही देण्याची तयारी दर्शवली. मात्र डॉ. अनिता यांनी निधी घेण्यास नकार दिला.

तांत्रिक बाबी व अन्य कर्मचाऱ्यांच्या खर्चासाठी निधी घ्यावा अशी सरकारने विनंती केल्यानंतर त्यासाठीच निधी घेण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नांतून पुढे आलेला ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल ट्रॅव्हलिंग स्कूल ऑफ पॅथॉलॉजी’ (टीटीएसओपी) हा प्रकल्प सरकार जानेवारी २०२६ पासून सुरू करणार आहे. यात देशातील १५ वैद्याकीय महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून, या वैद्याकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांना प्रशिक्षित करून त्यांच्या माध्यमातून आसपासच्या रुग्णालयांतील डॉक्टरांना कर्करोगावरील उपचारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावर आम्ही दोघे व टाटा रुग्णालयातील डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचारी मिळून काम करणार होतो. मात्र आता डॉ. अनिता यांचे हे अपुरे राहिलेले काम टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. असे असले तरी डॉ. अनिता यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही.

अनिता यांनी कधीही कट प्रॅक्टिस केली नाही व कोणाला करू दिली नाही. त्यांच्यासमोर कितीही मोठी व्यक्ती असली आणि त्या व्यक्तीने कितीही अधिकारवाणीने काही सांगिले, तरी डॉ. अनिता आपल्या तत्त्वावर ठाम राहत. आजच्या घडीला अनेक डॉक्टर हे फार्मास्युटिकल कंपन्यांकडून पैसे घेण्याबरोबरच वैद्याकीय परिषदांना जाण्यासाठी विमान तिकिटाची मागणी करतात. मात्र डॉ. बोर्जेस यांचे तत्त्व याबाबत फारच कडक होते. त्यांनी कधीच कोणाकडून पैसे घेतले नाहीत. त्या स्वखर्चाने परिषदा व प्रशिक्षणासाठी जात. प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या वैद्याकीय महाविद्यालयांकडूनही त्यांनी कधी पैसे घेतले नाहीत. त्यांच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना त्या समान वागणूक देत. एखाद्या रिक्षावाल्याच्या मुलालाही त्या प्रेमाने वागवत असत. त्यांच्याकडे असलेले ज्ञान त्यांचे विद्यार्थी व सहकाऱ्यांना त्या सढळ हस्ते देत.

वाचन हा त्यांचा छंद होता. त्यांच्या घरात एक मोठे ग्रंथालय आहेच, पण त्यांच्या गाडीमध्ये व बॅगेतही नेहमीच चार-पाच पुस्तके असत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. त्यांचे विद्यार्थी आज जगभरात नाव कमवत आहेत, त्याला डॉ. अनिता बोर्जेस यांची अध्यापनाची पद्धत आणि त्यांचा उपचारांविषयीचा दृष्टिकोनही कारणीभूत आहे. त्या आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच सांगत- मुद्दा वा माहिती कोणतीही असो, ‘का’ हा प्रश्न विचारलाच पाहिजे.

एखाद्या विद्यार्थ्याला विषय समजला नाही तर जोपर्यंत त्याला तो समजत नाही, तोपर्यंत त्या स्वस्थ बसत नसत. तो विद्यार्थी जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत त्या पुढील विद्यार्थ्याला प्रश्न विचारत नसत. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला बोर्जेस यांनी काय शिकवले हे कायमचे लक्षात राहत असे. त्यांचा पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवावर अधिक भर होता. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला अनुभवातून शिकण्याचा सल्ला देत. संशोधन हे नोकरी मिळवण्यासाठी नव्हे तर त्यातून समाजाला फायदा होईल असे काम करण्यासाठी घ्यावे, असा त्यांचा आग्रह होता. जगभरामध्ये ऑन्कोपॅथॉलॉजी शिकविणारे फार कमी शिक्षक आहेत. बोर्जेस यापैकी एक होत्या.

जगातील डॉक्टरांना कर्करोगावरील उपचारांचे ज्ञान मिळावे यासाठी डॉ. अनिता यांनी करोनाकाळात ‘ऑनलाइन टीचिंग प्रोग्राम फॉर पोस्ट ग्रॅज्युएट ऑफ पॅथॉलॉजी’ हा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमांतर्गत त्या दर आठवड्याच्या मंगळवारी व गुरुवारी सायंकाळी सात वाजता डॉक्टरांना प्रशिक्षण देत. यामध्ये आशिया, आफ्रिका आणि भारतातील सर्व डॉक्टर सहभागी होत. भारतात ७०० वैद्याकीय महाविद्यालये सुरू झाली असली तरी त्यातील ६०० वैद्याकीय महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत, त्यामुळे या महाविद्यालयांतील सर्व डॉक्टरांना या ‘प्रोग्राम’च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. हा प्रकल्प पाच वर्षांपासून सुरू असून, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

प्रा. पॅथॉलॉजी आणि मानद सल्लागार, ॲक्ट्रॅक व टाटा मेमोरियल रुग्णालय