उदय गणेश जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज २२ डिसेंबर गीता जयंती. श्रीमद्भगवद्गीतेचे भारतीयांच्या जीवनातील महत्त्व वेगळे सांगायला नको. गीता, तिच्यातील आशय यावर आजही तितक्याच हिरिरीने चर्चा होते. याचे उदाहरण म्हणजे ‘लोकसत्ते’त मंगळवार १२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेला ‘भगवद्गीतेतील कर्मरुप हिंसा/अहिंसा’ हा ॲड. राजा देसाई यांचा लेख. त्यावर थोडक्यात प्रतिक्रिया देत आहे.

१. महाभारत हा वैदिक काळाच्या उपरान्त, समाजजीवनाचे अथांग दर्शन घडविणारा जयो नामेतिहासोऽहम् आहे. भगवद्गीता दर्शन हे त्या पश्चातच्या अडीच-तीन हजार वर्षानंतरचे, (कदाचित) चार्वाक, जैन, बौद्धांच्या सामाजिक घुसळीनंतरचे प्रबोधन असावे. ग्रीक (इ. स. पू. ३२७-३२३, अलेक्झांडर व इ.स.पू. १९०/१८० डीमिट्रिस, मिन्यांडर); शक (इ.स. पू. १५०-५७; सन. १५० ते २०० वर्षे राजकीय अस्तित्व); कुशाण (इ.स ४०-१६२); व हुणांच्या (इ.स. ४५० स्कंदगुप्त ते ५४० यशोधर्माने त्यांचा शेवट केला) आक्रमणांनंतर, जैन-बौद्धांच्या अहिंसेच्या अतिरेकानंतर (राजकीय उपद्व्यापानंतर) तेजोहीन, पापभिरू झालेल्या वैदिक शासनकर्ते व समाजासाठी ‘अहिंसा परमो धमैः, धर्मेहिंसा तथैव च।।’ (महाभा. अनुशा. अ. ११६-११७). अहिंसा श्रेष्ठ धर्म (गुण) आहे (परंतु) स्वधर्माच्या रक्षणार्थ केलेली हिंसासुद्धा श्रेष्ठतम आहे, हे सांगणे आवश्यक होते. (राजा देसाई यांनी वरील श्लोकाचा पहिला अर्धा भागच उद्धृत केला आहे). महाभारतात कुठेही अहिंसेचे ‘गोडवे’ गायले गेलेले नाहीत. अहिंसा हा महाभारतकालीन गुण नाहीच. महाभारतातील जीवन रोखठोक आहे. ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। असे भगवद्गीतेद्वारा सर्वकालीन अभिवचन आहे. पुढे, ‘परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’… ‘मी’ पुन्हा पुन्हा अवतार घेईन असे श्रीकृष्ण रुपकातून ईश्वराचे उद्घाटन करतात. धर्म रक्षणार्थ, दुष्कर्मे करणाऱ्यांच्या विनाशासाठी केलेली हिंसा ही हिंसा ठरत नाही, ती आवश्यक असते. येथे युद्ध म्हणजे हिंसा ठरत नाही. ‘यतो धर्मोस्ततः जया:।।’ हा उद्घोष महाभारतामधून अकरा वेळा येतो. त्यामुळे भगवद्गीतेचा विचार करतांना वरील पाश्वभूमी लक्षात असावी. पुढील काळात हिंदुस्थानावर परकीय लुटारू, विध्वंसक दुष्टांच्या आक्रमणांना सुरुवात होऊन हिंदुस्थानाच्या संस्कृती, संपत्ती, ऐश्वर्य यांच्या नष्टचर्याला सुरुवात झाली. तेव्हा या परिस्थितीत अहिंसेसाठी युद्ध टाळणे म्हणजे समाजविघातक दुष्ट शक्तींना मोकळे रान सोडणे ठरले असते. हा सामाजिक ‘विवेक’ आहे, तीच ईश्वराज्ञा आहे.

२. धर्मप्रचार व प्रसारार्थ हिंसा हा मुद्दा त्याकाळात नव्हताच. तेव्हा हाही गीतेतला विषय नाहीच. अर्थात अशी हिंसा सर्वकालीन निंद्य आहे. असो.

३. अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करणे येथे गौण आहे (अन्यथा पांडवांवरील अन्यायाचे उल्लेख गीतेत आले असते). शोक, मोह व आसक्ती यामुळे अज्ञानातून अर्जुन आपला स्वधर्म विसरून स्वकर्तव्याची भलावण, कर्तव्याला विन्मुख करू पाहत आहे. क्षत्रिय म्हणून युद्ध हे त्याचे स्वकर्म, क्षत्रियाचा स्वधर्म आहे. विषयाचे सातत्य राखण्यापुरते युद्धाचे उल्लेख येतात. ‘आत्मज्ञानावाचून शोक, मोह निवृत्त होणार नाहीत’ (इति शंकराचार्य) म्हणून गीतेमधून सर्व चर्चा आत्मज्ञानाची आहे. असे भगवद्गीता हे मोक्षशास्त्र आहे. मोक्ष हा कुठल्याही कृती-कर्मांनी मिळत नाही. वैदिक कर्मकांडे सगुण उपासनांदी द्वारे मोक्ष प्राप्त होत नाही. युद्धाचे फळ मोक्ष आहे असेही सांगितलेले नाही. सवे कर्मे अनासक्तपणे, ‘मा फलेषु कदाचन। ’ वृत्तीने केल्यास; ज्ञानयुक्त कर्मत्याग-कर्मसंन्यास म्हणजे सकाम बुद्धी सोडून केल्यास बुद्धी कर्माने म्हणजे पाप पुण्यादी कर्मफलांनी लिप्त होणार नाही. ‘सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा’ बुद्धीच्या समत्व योगाने (बुद्धीयोग) केल्यास यथायोग्य समयी क्रममुक्तीला प्राप्त होशील (भगवद्गीता), तेही जमत नसल्यास सर्व कर्मे, जे जे करशील ते सदैव ईश्वरार्पण होऊन कर. अगदी ‘तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च’ सर्वकाली सदैव माझे स्मरण करून युद्ध कर. ‘लाभालाभौ जयाजयौ’ अशा समत्व बुध्दियोगाने “ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापफलंमवाप्स्यस” युद्धाला तयार हो, कधीच पापाने लिप्त होणार नाहीस. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन, तू शोक करू नकोस. आत्मज्ञानाला पुढे करत कर्मयोग हाच श्रीमद्गभगवद्गगीतेचा संदेश आहे, सिद्धान्त आहे. भक्तिमार्ग सहकारी साहाय्यक साधना आहे. प्रकृतीज त्रिगुणांपासून कर्म प्रवृत्त होते; आत्मा, ‘मी’, अकर्ता असतो हे ‘ज्ञान’ आहे. ते परोक्ष आहे. जोपर्यंत अपरोक्ष आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत द्वैतच सत्य आहे. देह हाच आत्मा आहे, सर्व अनुज्ञा परिहार (Do’s & Don’t) सत्य मानून व्यवहार होतात. हा सर्व उपनिषदांसह गीतेतील सिद्धान्त आहे. व्यक्तित्वाचा निरास करून स्वधर्म स्वकर्म सांगता येणार नाही. जोपर्यंत मनुष्यजीवन आहे तोपर्यतच आत्मज्ञान प्राप्त करता येईल. अपरोक्ष आत्मानुभवाने बुद्धीतील द्वैताचा भेदभावांचा अपरिवर्तनीय बोध होऊन सर्वसमत्व वृत्ती होते. द्वैत व्यावहारिक पातळीवर आणि अद्वैत पारमार्थिक पातळीवर सत्य आहेत. द्वैतावाचून व्यवहार शक्य होणार नाहीत, अद्वैतात व्यवहाराचा अभाव आहे. द्वैत मृत्यूपर्यंत सत्य आहे. अद्वैत पारमार्थिक सत्याचे तत्त्वज्ञान आहे, जीव-जगाचे, विश्वाचे आत्मरुप ‘केवलाद्वैत’ आहे. द्वैत आणि अद्वैत एकाचवेळेस सत्य आहेत असा ज्ञानेश्वरांसारखा घोटाळा करू नका.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: December 22 is geeta jayanti the importance of bhagavad gita in the life of indians dvr