पांडुरंग बलकवडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १६७४ या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. ही हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली घटना होती. या वर्षी तिथीनुसार २ जून या दिवशी आणि तारखेनुसार ६ जून रोजी राज्याभिषेकाला ३४९ वर्षे पूर्ण होऊन राज्याभिषेक शके साडेतीनशेव्या वर्षांत पदार्पण करत आहे. त्यानिमित्त काय-काय आठवायचे?

शिवाजी महाराजांची कृषी क्रांती

१६४२ मध्ये १२ वर्षांच्या शिवबांना घेऊन जिजाऊ पुण्यामध्ये आल्या. शिवबांच्या हस्ते कसबा गणपतीची पुनर्स्थापना करून आणि सोन्याचा नांगर फिरवून त्यांनी आपल्या कार्याचा शुभारंभ केला. लाल महाल या पवित्र वास्तूमध्ये जिजाऊंनी शिवबांवर आदर्श संस्कार करून एक युगपुरुष घडविला. वयाच्या १५ व्या वर्षी शंभूमहादेवाच्या साक्षीने शिवबांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प सोडला. स्वराज्य निर्मितीसाठी शिवबांना या देशात प्रस्थापित असलेल्या आदिलशाही, कुतुबशाही, जंजिरेकर सिद्दी आणि मुघलांसारख्या बलाढ्य सत्तांशी तसेच पोर्तुगीज, इंग्रज, डच यांच्यासारख्या युरोपियन सत्तांशी संघर्ष करावा लागला. या सर्व सत्ता स्थानिक रयतेवर अन्याय-अत्याचार करीत होत्या. एकेकाळचा वैभवशाली समृद्ध भारत १७ व्या शतकामध्ये वैराण वाळवंट झाला होता. इथल्या सामान्य रयतेची अवस्था पोटाला अन्न नाही, अंगाला वस्त्र नाही, राहायला घर नाही, अशी होती. याच पार्श्वभूमीवर शिवाजी राजांनी येथे पुन्हा नंदनवन करण्याचा प्रयत्न सुरू केला. अन्यायकारी सत्तांमुळे उद्ध्वस्त झालेली शेती पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे, बियाणे, बैलजोडी तसेच चार महिने पोटाला पुरेल एवढे धान्य दिले आणि पडीक पडलेली शेतजमीन लागवडीखाली आणणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्षे सारा माफ केला. याच्या परिणामी शेतकरी प्रोत्साहित होऊन कामाला लागला आणि थोड्याच कालावधीत शहाजी राजांची जहागीर पूर्णरीत्या लागवडीखाली आली. त्या जहागिरीतील सर्व शेतकरी समृद्ध झाले.

शिवाजी महाराजांची सामाजिक क्रांती

स्वराज्यातील शेतकरी समृद्ध झाला. साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यावर अवलंबून असलेला १८ पगड जातीचा समाज समृद्ध होण्याची प्रक्रिया सुरू झाली. कालपर्यंत जो शेतकरी अर्धपोटी होता तो शिवाजी राजांच्या कृषी क्रांतीमुळे आता समृद्ध झाला होता. घर नसलेल्या शेतकऱ्यांनी आता हक्काचे घर बांधायला सुरुवात केली. त्यामुळे गवंडी, सुतार, वीट बनविणारा कुंभार आणि लोहारालाही काम मिळाले. अशा पद्धतीने शिवाजी राजांच्या नव्या धोऱणामुळे बारा बलुतेदार आणि इतर कारागीर वर्गाला हाताला काम मिळाले. तोही समृद्ध झाला. ज्यावेळी सर्व समाजच समृद्ध होतो त्यावेळी साहजिकच त्यांच्यातील आर्थिक आणि सामाजिक दरी कमी होऊन एक प्रकारची समरसता निर्माण होते. शिवाजी राजांमुळे तत्कालीन समाजात अशी समसरता निर्माण होऊन समाज एकसंघ झाला होता. शिवाजीमहाराजांनी अशा पद्धतीने १८ पगड जातींच्या समाजाला एकत्र करून स्वराज्य निर्मितीच्या कार्याला जुंपून सामाजिक क्रांतीचे अधिष्ठान दिले.

शिवाजीमहाराजांनी निर्माण केलेला राष्ट्रवाद

पूर्वी सुलतानी सत्तांच्या काळात होणारा अन्याय, अत्याचार, दैन्यावस्था आणि शिवाजी राजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील सुख आणि समृद्धी याचा विचार केल्यानंतर ‘आपले हे सुख शाश्वत टिकायचे असेल तर राजा शिवाजी आणि त्यांचे स्वराज्य टिकले पाहिजे’, हा विचार इथल्या समाजात रुजला. सर्व समाज आता शिवाजीमहाराज आणि त्यांच्या स्वराज्य रक्षणासाठी कोणत्याही त्यागाला आणि बलिदानाला सज्ज झाला. याच प्रक्रियेतून तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी यांच्यासारखे हजारो तरुण स्वराज्य कार्याला पुढे आले. या विचारांनाच आपण मध्ययुगीन भारतातील नवा राष्ट्रवाद असे म्हणू शकतो.

शिवाजीमहाराजांची युद्धशास्त्रातील क्रांती

आदिलशाही, कुतुबशाही आणि मुघलांसारख्या बलाढ्य सत्तांकडे असलेले प्रचंड मनुष्यबळ, युद्धसाहित्य आणि पैसा यांच्या तुलनेत शिवाजीमहाराजांकडे या गोष्टी अगदीच नगण्य होत्या. तरीही त्यांनी हा लढा यशस्वी करण्यासाठी गनिमी कावा या नव्या युद्धशास्त्राचा विकास केला. अनेक शतकांच्या पारतंत्र्यामुळे इथला समाज पराभूत मानसिकतेमध्ये गेला होता. अशा समाजाला शत्रू कितीही बलाढ्य असो त्याचाशी लढणे आपले आद्य कर्तव्य आहे ही भावना तसेच स्वातंत्र्याची प्रेरणा समाजामध्ये निर्माण करून शिवाजी राजांनी त्यांना लढण्यास प्रवृत्त केले. दुर्गम सह्याद्री आणि त्यातील गडकोट यांच्या सहाय्याने शत्रूशी संघर्ष करणे तसेच वेळी-अवेळी अचानक छापा घालून शत्रूची रसद तोडणे, याचा परिणाम शत्रूला शरण येण्याशिवाय पर्याय रहात नसे. शक्ती आणि युक्तीचा अनोखा मिलाफ घडवून त्यांनी शत्रूला निष्प्रभ केले.

शिवाजीमहाराजांची नैतिक-वैचारिक क्रांती

शिवचरित्राचा अभ्यास केला तर आपल्याला शिवाजीमहाराजांचे त्यागमय जीवन आणि आदर्श राजनीती याचा संगम पाहावयास मिळतो. याच त्यांच्या जीवनचरित्रामुळे तत्कालीन समाज प्रेरित होऊन त्यागास सिद्ध झाला होता. शिवाजीमहाराजांनी आपल्या राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. महिलांवर अत्याचार करणारा कितीही मोठ्या अधिकारावरील व्यक्ती असली तरी त्याची गय न करता कठोर शासन केले जात असे. शिवाजीमहाराजांचे प्रतिस्पर्धी अफजलखान आणि औरंगजेब यांचे जीवनचरित्र अभ्यासले तर त्यामध्ये शिवाजीमहाराजांचे वेगळेपण जाणवते. सत्ता मिळविण्यासाठी औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैद करून तुरुंगात टाकले. दारा, मुराद आणि सुजा या तीन भावांची निर्घृण हत्या केली. ज्येष्ठ पुत्र महंमद सुलतान याचा खून केला. इतर धर्मियांवर धार्मिक अत्याचार केले. याउलट शिवाजीमहाराजांनी आदिलशहाने कैद केलेल्या वडील शहाजी राजांच्या सुटकेसाठी तह करून राज्यातील प्रदेश आणि किल्ले दिले. आपला धाकटा सावत्रभाऊ व्यंकोजीराजे यांना आपल्या अधिकाराचे राज्य बक्षीस दिले.

शिवाजीमहाराजांची सांस्कृतिक क्रांती

शिवाजीमहाराजांच्या राज्यामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना आपल्या श्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य होते. अन्यायाने लादलेला धर्म नाकारून पुन्हा स्वधर्मात येण्याचा मार्ग शिवाजीमहाराजांनी खुला केला. बजाजी निंबाळकर आणि नेतोजी पालकर ही त्याची उदाहरणे आहेत. त्या काळामध्ये मराठी भाषेवर परकीय भाषांचा मोठा प्रभाव होता. म्हणून शिवाजीमहाराजांनी भाषाशुद्धी करण्यासाठी राज्यव्यवहार कोश निर्माण केला. शिवाजीमहाराजांच्या शत्रूंनीही त्यांच्या त्यागाचे, पराक्रमाचे आणि चारित्र्याचे कौतुक केले आहे. शिवाजीमहाराजांपासून प्रेरणा घेऊन आपण आदर्श समाज आणि उद्याचा गौरवशाली भारत निर्माण करण्यासाठी राज्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी सिद्ध झाले पाहिजे हीच अपेक्षा.

(शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Founder of hindu swarajya king shivrajyabhishek sohala chhatrapati shivaray ysh
Show comments