विनायक लष्कर
ओडिशात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने स्वत:ला जाळून घेऊन प्राध्यापकाकडून होणाऱ्या छळातून सुटकेसाठी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना, त्याच राज्यात पुरी येथे अन्य एका मुलीला ‘मित्राला भेटायला जाते’ म्हणून रस्त्यात अडवून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. दिल्ली राजधानी क्षेत्रातील नोएडा येथील शारदा युनिव्हर्सिटीत दंतवैद्यक शाखेत शिकणाऱ्या मुलीने कर्मचाऱ्यांकडून छळ होतो म्हणून आत्महत्या केल्याचेही उघड झाले आहे. या साऱ्याजणी पुरुषी मानसिकतेच्या बळी आहेत, हे उघडच आहे. या निमित्ताने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो – आपण संवेदनशील पुरुष घडवण्याच्या दिशेने काही ठोस पावले उचलतो आहोत का? 

भारतीय समाजरचनेच्या मुळाशीच असलेली लिंगाधिष्ठित उतरंड ही केवळ स्त्रियांना दुय्यम वागणूक देत नाही, तर ती संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करते. लहानपणापासून मुलांमध्ये ‘पुरुषत्व’ म्हणजे ताकद, करडी भूमिका, भावना न दाखवणे आणि वर्चस्व गाजवणे, असा समज नकळतपणे बिंबवला जातो. मुलींसाठी नाजूकपणा, सहनशीलता, समजूतदारपणा या गुणांना महत्त्व देणाऱ्या सामाजिक प्रतिमा तयार केल्या जातात. याच प्रतिमांमधून पुढे जाऊन स्त्रियांना कमी लेखण्याचा, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा विचार जन्म घेतो. 

आज आवश्यक आहे तो सामाजिकरणाच्या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची. मुलगा असो वा मुलगी, दोघांनाही समतेचे, सहवेदनेचे, माणुसकीचे आणि परस्पर सन्मानाचे संस्कार देणे ही काळाची गरज आहे. शाळा, महाविद्यालये, माध्यमे, धर्मस्थळे आणि घरे – प्रत्येक ठिकाणी लिंगभाव संवेदनशीलतेचा आवाज बुलंद होणे आवश्यक आहे. 

संवेदनशील पुरुष म्हणजे केवळ रडणारा किंवा भावना व्यक्त करणारा नव्हे, तर ती अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या सत्ताधारित विशेषाधिकारांची जाणीव ठेवते, त्याचा उपयोग समाजातील वंचित घटकांसाठी करते, स्त्री-पुरुष समतेच्या विचारांवर ठाम राहते आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. संवेदनशील पुरुष ही संकल्पना अशा समाजाच्या उभारणीसाठी अत्यावश्यक आहे जिथे कोणालाही केवळ त्यांच्या लिंगामुळे दडपले जाणार नाही. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत. मानसिकतेचा बदल झाला पाहिजे. हा बदल होण्यासाठी संवाद, शिक्षण, चर्चा, आणि सर्वात महत्त्वाचं – स्वतःपासून सुरूवात करणे आवश्यक आहे. कुटुंबातील पुरुष सदस्यांनी स्त्रियांना समजून घेणं, त्यांच्या मतांचा आदर करणं, आणि घरकाम किंवा मुलांच्या संगोपनासारख्या कामांमध्ये सक्रिय सहभाग घेणं – हे कृतीतून समतेचा संदेश देणारं उदाहरण ठरू शकतं. मुलं काय पाहतात, काय ऐकतात, काय अनुभवतात – हेच त्यांचं जग घडवतं. त्यामुळे जर समाजात, कुटुंबात आणि शाळांमध्ये समतेचा विचार आणि व्यवहार रुजवला गेला, तर संवेदनशीलतेच्या प्रक्रियेला गती येऊ शकते. अर्थात, हा बदल एका रात्रीत घडणारा नाही. पण या दिशेने ठाम, सातत्यपूर्ण पावले उचलली गेली तर आपण भविष्यात एक अधिक समंजस, समतेवर आधारित आणि भयमुक्त समाज घडवू शकतो. समाजाच्या परंपरागत, पुरुषप्रधान चौकटी आजही इतक्या बळकट आहेत की त्यांच्याविरोधात उभं राहणं अनेकांसाठी धाडसाचं आणि अशक्य वाटणारं काम ठरतं. परंतु, जर खरंच आपण बदल घडवण्याची इच्छा बाळगत असू, तर या समाजदबावाच्या भिंती तोडून समतेच्या आणि न्यायाच्या बाजूने उभं राहणं हे केवळ आवश्यकच नाही, तर तेच मानवी असण्याचं खऱ्या अर्थानं लक्षण ठरतं. समाजदबाव हे अन्यायाच्या व्यवस्थेचं एक प्रमुख शस्त्र आहे. आपण जर सतत बहुसंख्य समाजाच्या मतांच्या आधारावर ‘बरोबर’ आणि ‘चूक’ ठरवत राहिलो, तर कधीच अन्यायाला आव्हान देता येणार नाही. इथेच न्याय, समता, माणुसकी या मूल्यांची खरी कसोटी लागते. 

आज आपल्या समाजात किती जण असे आहेत जे वडील म्हणून मुलीच्या स्वप्नांना पंख देतात? किती शिक्षक आहेत जे लिंगभाव समतेबाबत मुलांशी मोकळं आणि संवेदनशील बोलतात? किती तरुण आहेत जे मित्र म्हणून, सहकारी म्हणून किंवा पती म्हणून स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून समजून घेतात? 

या सर्वांसाठी समाजदबावाच्या चौकटी मोडाव्या लागतात. कधी निंदा, कधी उपहास, कधी बहिष्कार – या सगळ्यांचा सामना करत, आपली भूमिका बदलण्याचं धाडस दाखवावं लागतं. आपण जर खरोखर संवेदनशील समाज घडवायचा असेल, तर “माझं काय जाणार?” ही भूमिका सोडून, “माझ्या कृतीने समाजाचा चेहरा थोडाफार का होईना, बदलू शकतो” या जाणीवेने प्रत्येकाने पाऊल उचलणं गरजेचं आहे. अन्यायाविरुद्ध शांत राहणं म्हणजे त्या अन्यायाला समर्थन देणं- हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजाचा दबाव, लोकांचं मत, कुटुंबाचा रोष या सगळ्यांपलीकडे जाऊन समतेसाठी, न्यायासाठी, मानवी स्वातंत्र्यासाठी ठाम उभं राहणं – हाच खरा परिवर्तनाचा आरंभ आहे. आणि अशा प्रत्येक कृतीतून संवेदनशील पुरुष आणि संवेदनशील माणूस घडतो. हा प्रवास अवघड असला तरीही त्याशिवाय पर्याय नाही. 

अखेर, आपल्याला असा समाज हवा आहे जिथे ‘मुलगी जिवानिशी जात नाही’, तर ती माणूस म्हणून जिवंतपणे, मुक्तपणे, सन्मानाने जगते. आणि हे घडवण्यासाठी प्रत्येक पुरुषाचं मन संवेदनशील होणं – हीच खरी क्रांती आहे! 

(लेखक तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग विभाग प्रमुख आहेत)

बारामती – ४१३१०२ 

मोबाइल – ०९१-८८०६८०६३६२