Premium

जखमी प्राण्यांसाठी ‘प्यार’

माणसाच्या बेजबाबदार वर्तनाने, क्रौर्याने प्राण्यांसमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. मानवी चुकांमुळे जखमी झालेल्या, आजारी पडलेल्या, बेवारस फिरणाऱ्या प्राण्यांवर मायेची फुंकर घालण्याचे कार्य चंद्रपुरातील ‘प्यार फाउंडेशन’ करत आहे.

animal lovers
जखमी प्राण्यांसाठी ‘प्यार’

रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नि:स्वार्थ प्रेम

‘‘मुक्या प्राण्यांचे दु:ख, वेदना माणसाला समजण्यापलीकडच्या आहेत, त्यामुळेच प्राण्यांचे संगोपन, त्यांची सेवा, त्यांच्या जखमांवर मायेची फुंकर घालणे, हेच माझे जीवितध्येय्य आहे,’’ असे ‘प्यार फाउंडेशन’चा संस्थापक देवेंद्र रापेल्ली सांगतो. खरे, नि:स्वार्थ प्रेम प्राण्यांमुळे मिळते, त्यामुळेच आपण प्राण्यांची सेवा करण्याचा, त्यांच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतल्याचे तो सांगतो.

 चंद्रपूर जिल्ह्याला मानव आणि वन्यजीव संघर्षांची मोठय़ा प्रमाणात झळ बसते. या वन्यजीवांच्या रक्षणासाठी वनखाते तत्पर आहे, पण इतर प्राण्यांचे काय? चंद्रपूर जिल्ह्यातील अशा प्राण्यांच्या संरक्षणाची धुरा हाती घेतली आहे ‘प्यार फाउंडेशन’ म्हणजेच ‘पेटॅनिटी अँड अ‍ॅनिमल रिहॅबिलिटेटर्स फाउंडेशन’ने. ही संस्था तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या, मरणासन्न अवस्थेतील, जखमी, मोकाट प्राण्यांसाठी आश्रयस्थान आहे.

‘प्यार फाउंडेशन’ जखमी प्राण्यांवर मलमपट्टी तर करतेच शिवाय त्यांच्यावर मायेची पाखरही घालते. संस्थेत आजमितीस ७०० पेक्षा अधिक प्राणी आहेत. देवेंद्र रापेल्ली या ३२ वर्षांच्या युवकाच्या पुढाकारातून या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. माणसाच्या क्रौर्यामुळे आणि निष्काळजीपणामुळे जखमी झालेले श्वान, बकऱ्या, पोटात ४० ते १०० किलोपर्यंत प्लास्टिक साचलेल्या गायी, दिवाळीत कोणीतरी गंमत म्हणून तोंडात सुतळी बॉम्ब फोडल्यामुळे जखमी झालेला श्वान, तस्करांनी चारचाकी वाहनात कोंबलेल्या गायी, बेवारस श्वान, वजन वाहून निरुपयोगी झालेली गाढवे, कत्तलखान्यांतून सोडविलेल्या शेकडो गायी- वासरे, कोंबडय़ा आणि अन्यही अनेक प्रकारच्या प्राणी- पक्ष्यांना ‘प्यार फाउंडेशन’मध्ये आश्रय देण्यात आला आहे. प्रत्येक प्राण्याला येथे स्वतंत्र नाव आणि ओळख आहे, प्रत्येकाची स्वतंत्र कथा आहे.

देवेंद्र चंद्रपूरपासून २५ किलोमीटरवर असलेल्या घुग्घुस या गावचा रहिवासी आहे. लहानपणापासूनच त्याचे प्राण्यांवर विशेष प्रेम होते. त्याने एमटेक व एचआर, टेलिकॉम या विषयांत एमबीए केले आहे. सध्या तो पीएचडीचा अभ्यास करत असून नागपुरातील प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनीअिरगमध्ये सहायक प्राध्यापक आहे. आयुष्यातील काही घटनांमुळे देंवेंद्रला नैराश्य आले होते. त्याने चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नैराश्याशी लढा देत असतानाच त्याची एका व्यक्तीशी भेट झाली आणि त्याला समाजासाठी सकारात्मक काम करण्याची प्रेरणा मिळाली. देवेंद्रने प्राण्यांसाठी काम करण्याचा निर्धार केला.

घरात कोंबडय़ा होत्या. देवेंद्रने आईवडिलांचा दृष्टिकोन प्रयत्नपूर्वक बदलला आणि रापेल्ली कुटुंबीयांनी कोंबडी, बकरी कापणे बंद केले. यादरम्यान तोंडाला जखमा झालेला श्वान एका व्यक्तीने आणून दिला. देवेंद्रला प्राण्यांवर उपचाराचा अनुभव नव्हता. त्याने त्या श्वानाला चंद्रपूरच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उपचार करून काही फायदा नाही, त्याचा मृत्यू अटळ आहे असे सांगितले. तरीही डॉक्टरांना विनंती करून त्यावर उपचार सुरू केले. रुग्णालयात श्वानाला सुरक्षित ठेवण्यासाठी एक छोटी खोली देण्याची विनंती केली. श्वानावर उपचार झाले, त्याचे प्राण वाचले. ही कामाची सुरुवात होती.

पुढे अनेक जण आपले आजारी, जखमी श्वान देवेंद्रकडे आणून ठेवू लागले आणि तब्बल १२ श्वान गोळा झाले. त्यांना एकाच खोलीत ठेवण्यात येत होते. महापालिकेने बेवारस आजारी गाय आणून दिली. देवेंद्रची जागेच्या शोधार्थ भटकंती सुरूच होती. या कामात त्याला साथ दिली नूतन कोलावार या मैत्रिणीने. दोघांनी राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवले. ‘प्राणी मतदान करत नाहीत, तर त्यांच्यासाठी जागा देऊन काय फायदा?’ असेही प्रश्न विचारले गेले. अधिकाऱ्यांच्या टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नसे.

राजकारण, समाजकारणात सक्रिय असलेले किशोर जोरगेवार यांची भेट घेऊ, असे नूतनने सुचविले. तेव्हा जोरगेवार आमदार झाले नव्हते. त्यांनी दाताळा मार्गावरील इरई नदीजवळील तिरुपती बालाजी मंदिरालगतच्या जमिनीचा तुकडा दिला. जमीन खड्डे, झुडपांनी भरलेली होती. पुराचा धोका होता. देवेंद्रचे विद्यार्थी व मित्र मदतीला आले. आठवडय़ाभरात जमीन समतल करत टिनाचे शेड उभे केले गेले. तिथे १२ श्वान व एक गाय ठेवण्यात आली. १८ ऑक्टोबर २०१८ ला ‘प्यार फाउंडेशन’च्या कामाची अधिकृत सुरुवात झाली.

मोहन रेड्डी यांचा श्वान गंभीर आजारी होता. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हात टेकले होते. ते श्वानाला ‘प्यार फाउंडेशन’मध्ये घेऊन आले. त्याचे प्राण वाचवण्यात फाउंडेशनला यश आले. आनंदी झालेल्या रेड्डी यांनी २० हजार रुपयांची देणगी दिली. मदतीचा ओघ सुरू झाला. बेवारस, कत्तलखान्यात नेण्यात येणाऱ्या गायी संस्थेत येऊ लागल्या. प्राण्यांची संख्या वाढत होती. औषधे, चारा, खाद्य कमी पडत असे. जैन समाज, अग्रवाल समाज मदतीला धावून आला. ‘रोटरॅक्ट क्लब’चे निखिल मेहाडिया यांनी गायी ठेवण्यासाठी टिनाचे शेड तयार करून दिले. माधवी जोगी यांनी श्वानांसाठी खोली तयार करून दिली. ‘प्यार फाउंडेशन’चा व्याप वाढत गेला.

फाउंडेशनमधील सर्व प्राण्यांवर उपचारांसाठी महिन्याकाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च होतो. अनेक जण सढळहस्ते, तर काही जण नाव पुढे येऊ न देता आर्थिक मदत करतात. ‘प्यार फाउंडेशन’च्या कार्याविषयी ऐकल्यानंतर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी फाउंडेशनला भेट दिली. गायी ठेवण्यासाठी लोखंडी शेडची जागा कमी पडत असल्याचे पाहून त्यांनी पाच लाख रुपये खर्च करून शेड बांधून दिले. प्राण्यांना उपचारांसाठी नागपूर तसेच चंद्रपूरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयांत न्यावे लागते. त्यासाठी एक आधुनिक रुग्णवाहिका भेट दिली. एका दानशूर व्यक्तीने पिण्याच्या पाण्याची

व्यवस्था केली. तर राहुल पुगलिया, करण पुगलिया यांनीही आर्थिक मदत केली. आज संस्थेत प्राण्यांची काळजी घेण्यासाठी १६ पगारी कर्मचारी आहेत. आठ ते दहा विद्यार्थी एक नवा पैसा मोबदला न घेता नियमित सेवा देतात. ‘प्यार फाउंडेशन’मध्ये प्राण्यांवरील उपचारांसाठी तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आधुनिक शस्त्रक्रिया कक्ष बांधण्यात आला आहे. या कार्यासाठी वडील आणि बहिणीने मदत केल्याचे देवेंद्र सांगतो. पशुवैद्यकीय विभागाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ बंडू कडूकर येथील प्राण्यांवर नियमित मोफत उपचार करतात. स्वत: देवेंद्र याने प्राण्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. वेळप्रसंगी तोदेखील प्राण्यांवर उपचार करतो. प्यार फाउंडेशनमध्ये एकूण सात सदस्य आहेत. समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. जयश्री कापसे गावंडे यांच्याकडूनही संस्थेला वेळोवेळी मदत मिळते.

फाउंडेशनमध्ये प्राण्यांची संख्या वाढत असल्याने घुग्घुस मार्गावरील नागाळा येथे राधाकृष्ण गोधाम सुरू करण्यात आले आहे. तिथेदेखील गायी ठेवण्यात आल्या आहेत. प्राण्यांवर प्रेम करा हा संदेश देण्यासाठी प्यार फाऊंडेशन शाळा, महाविद्यालयांत जनजागृती करते. गोशाळा व्यवस्थापन, कत्तलखान्यांपासून गोमातेचे रक्षण, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्राण्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन, तत्काळ वैद्यकीय सेवा देणे, अपघातप्रकरणी २४ तास आपत्कालीन सेवा देणे इत्यादी कामे संस्थेच्या वतीने केली जातात.

प्राण्यांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी महामार्गावर स्कॅनर लावण्यात यावेत, अशी देवेंद्रची मागणी आहे. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात प्राण्यांवर उपचार करण्यासाठी आधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय नाही, त्यामुळे येथील प्राण्यांना नागपूर, मुंबईला न्यावे लागते किंवा तेथील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करावे लागते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चंद्रपूरमध्येच आधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे हे प्यार फाउंडेशनचे लक्ष्य आहे. एक लाख गायींची गोशाळा बांधण्याचेही उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. संस्थेला आजवर असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Love for injured animals pyar foundation in chandrapur ysh

First published on: 26-09-2023 at 00:03 IST
Next Story
सुसंस्कृत राजकारणी दुर्मीळ असताना बॅ. नाथ पै यांची आठवण हवीच…