-श्रीकांत विनायक कुलकर्णी

बहुतेक प्राचीन देवालयं ही राहत्या वस्ती व नगरांपासून दूर, दुर्गम ठिकाणी आढळतात. वाढत्या नागरीकरणामुळे मुळातले गावाबाहेरचे परिसर आता गाव-शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी आले आहेत, हा भाग अलाहिदा. मुळात देवस्थानं, शक्तिस्थानं वा उपासना केंद्र ही पावित्र्य व शांतता अबाधित रहावी या कारणांस्तव लोकसंपर्क व वावर यापासून अलग असणं अभिप्रेत असतंच, परंतु आणखी एक महत्वाचं कारण असतं. ज्या प्रमाणे वीज ही वीजच असते पण घरातली वीज ही अत्यंत सौम्य स्वरूपाची असते. फार सुलभ रितीने उपलब्ध करून दिलेली असते म्हणून आपल्याला झेपते. याच विजेची नैसर्गिक, रौद्र वा असंस्कारीत रूपं मात्र आमच्या पेलण्यापलीकडची असतात. म्हणूनच पॉवर प्लांट्स, सब स्टेशन्स ही घरं वस्त्यांपासून दूर असतात. त्याचप्रमाणे, शक्तिस्थानं ही शक्तिस्रोत असतात. विधीवत उपासना करून त्या शक्ती आपापल्या उद्दीष्टांनुरुप कृपान्वित करून घेतल्या जाऊ शकतात. या मूलस्रोतातली अन आपल्या आत्मतत्त्वातली एकतानता साधनेतनं जेव्हा अनुभूतीच्या पातळीवर उमटू लागते तेव्हा आपणास खऱ्या अर्थी साक्षात्कार होवू शकतो. आपलं तीर्थक्षेत्री जाणं, देवस्थानी जाणं फलदायी ठरू लागतं.

दैवी शक्तींची स्वयंभू स्थानं त्याचप्रमाणे अशी स्थानं जिथे महान योगी, तपस्वी आदींनी तपश्चर्या करून किंवा उपासना व यज्ञयाग करून दैवी शक्तींना प्रसन्न करून घेतलं त्या ठिकाणचं वातावरण भारलेलं असतं. दैवी अवतरण व अस्तित्वामुळे त्या साऱ्या परिसरातील कण अन् कण पवित्र झालेला असतो, दैवी पावित्र्य तिथल्या पंचमहाभूतांत अर्थात तिथल्या अवकाशात, वायुमंडलात, जळात, भूमीत उमटलेलं असतं, मिसळलेलं असतं. काळ लोटतो तसा, प्रवाही वृत्तीमुळे, वायुमंडलातील तसेच जळातील प्रभाव विरळ होत जातो परंतु, पृथ्वीतत्त्व अर्थात तिथल्या दगडामातीतला हा दैवी प्रभाव, त्या भूभागाची काही उलथापालथ झाली नसल्यास टिकून राहू शकतो, अगदी शतकानुशतकं, युगानुयुगं सुद्धा. अन हेच असतं स्थानमाहात्म्य.

हेही वाचा…लेख : निवडणूक निकाल – परकीय गुंतवणूकदारांच्या नजरेतून

तीर्थाटनं वा देवदर्शनामागील हेतू पुण्यसंचय, पापक्षालन, संकटनिवारण आणि अर्थातच देवाप्रतीची श्रद्धा, आदर अन कृतज्ञता व्यक्त करणं या पैकी काहीही असू शकतो. त्यासाठी मनी श्रद्धा एकवटलेली असते. अंतर्मुखता असते, एक आर्त भाव असतो, याचकवृत्ती असते. या साऱ्या वृत्ती जेव्हा मनी उमटतात तेव्हा साहजिकच इतर व्यावहारिक व्यवधानं, इंद्रियसुखं, छानछोकी वा आवडीनिवडीतला चोखंदळपणा वा एरवीचे चोचले मागे पडतात. वृत्ती सात्विकतेकडे झुकलेली असते. त्यामुळे कष्टप्रद गोष्टीही करण्याची तयारी सहज दाखविली जाते.

याच्या नेमकी उलट मनोवस्था असते ती पर्यटन हा उद्देश असतो तेव्हा. मन बहिर्मुख झालेलं असतं, नवनवीन अनुभव घेण्यास उत्सुक असतं, विविध इंद्रियसुखं व संभाव्य सुखानुभवांच्या केवळ कल्पनेनंही मन उद्दीपित झालेलं असतं.

हेही वाचा…यंदा यूट्यूब वाहिन्या जिंकल्या, म्हणून मुख्य माध्यमं हरली?

तर या अशा पूर्णत: परस्परविरोधी मनोवस्था एकत्रित करून तीर्थाटन अन पर्यटन हे दोन्ही पक्षी एकाच दगडात मारण्याचा आधुनिक प्रघात व कल हा फेरविचार करावा असा आहे. यात पर्यटन तर साधलं जात असावं पण, दैवी कृपेस पात्र होण्याकरिता आवश्यक असलेली शारीरिक व मानसिक स्थिती वा व्रतस्थ वृत्ती नसल्याने तीर्थाटन केवळ नाममात्रच साध्य होत असणार. हा प्रघात पडण्याचं मुख्य कारण म्हणजे वाढतं व्यापारीकरण अन व्यापारी व गिऱ्हाईक या दोघांना असलेला जास्त लाभाचा लोभ. हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग, खानावळी, टॅक्सीवाले ते पूजासाहित्य, मूर्तीतसबिरी विक्रेते ते अगदी गर्भगृहातले पुजारी, पंडे, बडवे यांच्या लोभानं वेढलेल्या वातावरणात तीर्थक्षेत्रांचं पावित्र्य अबाधित राखणं हे त्या त्या उपास्य दैवतांकरताही दिव्यच ठरत असावं.

याकरता अश्या परिसरांकरता राखीव वनं, हेरिटेज ठिकाणं अशा ठिकाणी असते तशी वेगळी नियमावली लागू करावी. तिची काटेकोर अंमलबजावणी सरकार आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळ ह्यांच्या समन्वयातनं होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ मुख्य देवस्थानापासूनच्या दीड-दोन किलोमीटर परिघातील परिसरात-
१) रहाण्याची उत्तम सोय असावी, साधी पण स्वच्छ. तारांकीत हॉटेल्स वा सवंग लॉजिंग बोर्डिंग यांना थारा नसावा.

२) खाण्यासाठी उत्तम अन पुरेशा सोयी हव्यात, परंतु त्यात चटकदार किंवा झणझणीत असे तामसी प्रकार टाळून ताजे चवदार पण साधे अन शाकाहारी पदार्थ असावेत.

३) चहा- कॉफी, दूध-ताक-लस्सी, नारळपाणी वा लिंबाचं सरबत आदी वगळता इतर पेयं या परिसरांतील दुकानांत नसावी.
४) सारे वाहनतळ किमान अर्धा किलोमीटर दूर असावे, मात्र वृद्ध वा आजारी यांच्याकरिता व्हीलचेअर वगैरेची सोय असावी.
वाढलेल्या नागरीकरणामुळे वरील सारं शक्य होईलच वा व्यवहार्य ठरेलच असं नसलं तरी प्रामाणिक प्रयत्न मात्र जरूर व्हावेत.

हेही वाचा…मोदी हे सर्वसमावेशक नेते…

जाता जाता, तीर्थक्षेत्र हा विषय आहेच तर तीर्थ या शब्दाचा नेमका अर्थ काय ते ही पाहू. तीर्थ हा शब्द ‘तृ’ या धातुस ‘थक्’ प्रत्यय जोडून तयार झालेला आहे ‘ज्यामुळे तरून जाऊ ते’ या अर्थी. ‘तरति पापं संसारं वाऽनेनास्मिन् वेत्ति तीर्थम्’ या श्लोकात ज्याच्याद्वारे मनुष्य पापांमधूनही तरून जातो अर्थात मनुष्यास पापांपासून मुक्ती मिळते, त्यास तीर्थ म्हणतात असा उल्लेख आहे.

हेही वाचा…आम्ही छोटे काजवे, पण अंधाराशी लढलो..

आपल्या शास्त्रांत धर्म (धार्मिकतादी नैतिक मूल्यं), अर्थ (समृद्धी आदी आर्थिक मूल्यं), काम (आनंद, प्रेमादी मानसिक मूल्यं) आणि मोक्ष (मुक्ती, आत्म-साक्षात्कार आदी आध्यात्मिक मूल्यं) असे चार पुरुषार्थ दिलेले आहेत. या चारापैकी तीन – धर्म, काम अन मोक्ष या अर्थांप्रत काही अंशी पोहोचणं हे ‘तीर्थ’क्षेत्री जाऊन साध्य होतं अन हे साधण्याकरता वापरलं जाणारं धन म्हणजेच चारापैकी उरलेला चौथा ‘अर्थ’. म्हणजेच, तीर्थक्षेत्री जाऊन प्राप्त करण्यासारखे असतात ते तीन अर्थ या अर्थी आपण ‘तीर्थ’ या शब्दाची योजना करू शकतो. धन या अर्थी साधायचा पुरुषार्थ हा मुख्यत्वे कर्मांतून सिद्ध होतो आणि त्याकरता आवश्यक असणारं संचित हे पहिल्या तीन अर्थांतून वाढीस लागतं. तर, खऱ्या पुरुषार्थ साधकांनी तीर्थाटन आणि पर्यटन यातीला भेद ध्यानी घेत आपापला मार्ग चोखाळावा हे उत्तम.

sk3shrikant@gmail.com