प्रकाश जावडेकर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक २४० जागा मिळवूनही बहुमतापासून दूर असल्यामुळे भाजपला आघाडी सरकारचा पर्याय स्वीकारावा लागला. त्यानिमित्ताने ‘मोदींना असे सरकार चालवण्याची सवय नाही’ अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेला त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या एका मंत्र्याचे हे उत्तर-

सत्तेच्या प्रमुख पदावर सलग २३ वर्षे राहिले आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही जगातील एकमेव नेते आहेत. ते १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर गेली १० वर्षे भारताचे पंतप्रधान आहेत. आता त्यांची पुढील पाच वर्षांसाठी पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. एका अर्थाने हा त्यांच्या लोकप्रियतेवर जनतेच्या पसंतीचा शिक्का आहे. दहा वर्षे पंतप्रधान राहूनही, त्यांची लोकप्रियता निरंतर टिकून आहे. लोकांनी या निवडणुकीत पंतप्रधान म्हणून मोदी यांनाच पसंत केले आहे, हे सत्य आहे.

अनेकांचा असा गैरसमज झाला आहे की पंतप्रधान मोदींना पहिल्यांदाच संयुक्त सरकार चालवावे लागणार आहे, पण ते खरे नाही. २०१४ आणि २०१९ ही दोन्ही सरकारे एनडीएचीच होती. त्यातही घटक पक्षांचे खासदार मंत्री होते आणि दर अधिवेशनापूर्वी एनडीएची संयुक्त बैठक व्हायची.

नरेंद्र मोदी यांचे गुजरातचे १३ वर्षांचे शासन म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन एका राज्याला प्रगतीच्या नव्या टप्प्यावर नेऊन ठेवण्याचा कालखंड होता. या काळात पूर, भूकंप आणि अनेक नैसर्गिक संकटे आली. त्याचबरोबर दंग्यामुळे परिस्थिती बिघडली होती, पण त्यांनी कायदा सुव्यवस्था आणि त्याचबरोबर सर्व समुदायांमध्ये एक विश्वासाचे वातावरण तयार केले आणि म्हणून गेल्या १२ वर्षांत तिथे एकही दंगल झाली नाही.

मुख्यमंत्री म्हणून आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख असणारे ‘मोदी २०’ हे पुस्तक फार महत्त्वाचे आहे. कारण त्यामध्ये विविध क्षेत्रातील २० मान्यवर व्यक्तींनी लेख लिहिले आहेत, आपले अनुभव सांगितले आहेत. या पुस्तकातून मोदींचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसतोच आणि त्याचबरोबर आवश्यक त्या सर्वांना बरोबर घेऊन प्रश्नाची सोडवणूक कशी करायची याचे दर्शन घडते. एका अर्थाने हे ‘गुड गव्हर्नन्स’ चे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते की मोदींची दृष्टी केवळ पक्षीय किंवा संकुचित नाही तर विकासासाठी पूरक अशा सर्वांचा सहयोग घेण्याचीच आहे. मला वाटते की हीच त्यांच्या पुढील दहा वर्षांच्या एनडीए सरकारच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

हेही वाचा >>>सहानुभूती ठाकरेंना आणि फायदा मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचा…

ते जेव्हा कुणालाही भेटतात तेव्हा ते पूर्ण वेळ लक्ष देऊन बोलणाऱ्याचे म्हणणे ऐकतात, त्यातला मुद्दा समजून घेतात. त्यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तेवढी विचारतात. जो कोणी त्यांना भेटतो तो त्यांच्यामुळे प्रभावित होऊन जातो. कारण जिथे दहा मिनिटे वेळ दिलेला असतो, तिथे अर्धा तास सहज जातो. ते अवांतर गप्पा मारत नाहीत. तुमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात. मोदी ‘गुड लिसनर’ आहेत.

ते सर्वांबरोबर काम करू शकतात आणि ते कसे सर्वांबरोबर काम करतात ते मी दहा वर्षे प्रत्यक्ष पाहिलेले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणाही मंत्र्याला ठेवलेल्या विषयावर वेगळे मत असल्यास मांडण्याचा पूर्ण अधिकार असायचा. ते शांतपणे ऐकून घ्यायचे आणि त्या म्हणण्यामध्ये दम आहे असे वाटले तर अधिकाऱ्यांना सांगायचे की हा विषय आज पुढे ढकलू या आणि यानंतर पुन्हा एकदा नीट विचार करून, जे मुद्दे उपस्थित झाले त्यांचा परामर्श घेऊन मग पुन्हा मंत्रिमंडळात ठेवा. ते कुणालाही बोलू देत नाहीत असा गैरसमज असू शकतो. पण मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत रामविलास पासवान तसेच भाजपाचे इतर मंत्रीही आपापले मत मांडायचे. आणि हेच यापुढेही सुरू राहील.

मोदीजींसाठी राजकारण हे २४ तास करायचे व्रत आहे. त्यांचा तो व्यवसाय नाही किंवा त्यांचा तो नुसता छंद नाही. देशाचे काही भले करण्यासाठी आपल्याला मिळालेली ही संधी पुरेपूर वापरायची आहे, हे त्यांच्या सतत मनात असते आणि सहकाऱ्यांच्या मनावरही ते सतत हेच बिंबवत असतात. त्यामुळे २०२४ ते २०२९ या पाच वर्षांच्या काळात हे सरकार उत्तम पद्धतीने चालेल याविषयी मला कोणतीही शंका नाही.

मोदींना राजकारणाची जबरदस्त समज आहे. सगळे छोटे-मोठे प्रवाह ते टिपत असतात. त्यांच्याकडे नेमकी, महत्त्वाची अशी माहिती सतत येत असते. त्यांची जबरदस्त स्मरणशक्ती त्यांना खूप उपयोगी पडते. ते लगेच संबंधित माणसांशी बोलून परिस्थिती समजावून घेतात. त्याच्यावर काय उपाय करता येईल याबाबत दहा ठिकाणांहून वेगवेगळी माहिती घेतात आणि त्या माहितीच्या आधारावर ठाम निर्णय घेतात. पण त्यावर कोणाला चर्चा करायची असेल तर त्याला ते कधीही नाही म्हणत नाहीत. शेवटी संयुक्त सरकार चालवताना त्यामध्ये घटक पक्षांचा संवाद महत्त्वाचा असतो आणि तो ते निश्चितपणाने पार पाडतील याची मला खात्री आहे, कारण मला तसा अनुभवही आहे.

मोदींचा आणखी एक विशेष आहे. ते केवळ सरकारमधीलच नव्हे, केवळ एनडीएच्याच नव्हे तर सर्व खासदार, सर्व मुख्यमंत्री यांनाही तितक्याच आदराने वागवतात. मनमोहन सिंग, देवेगौडा आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे वागणे मी जवळून पाहिले आहे. केवळ भाजपच्याच नव्हे, तर अन्य पक्षांच्या आमदार व मुख्यमंत्री यांच्याही व्यक्तिगत सुखदु:खामध्ये ते सामील होतात, स्वत:हून चौकशी करतात. अधूनमधून संपर्क करतात. शिवसेना २०१९ नंतर मोदींच्या सरकारमधून बाहेर पडली त्या वेळेला अरविंद सावंत हे मंत्री होते. त्यानंतरही नेहमी मोदी त्यांची आस्थेने चौकशी करायचे. अशीच चौकशी आणि संबंध त्यांनी अकाली दल बाहेर पडल्यावरही त्यांच्याशीही ठेवले. मला वाटते घटक पक्षांबरोबर सरकार चालवण्याचाच हा परिणाम आहे.

अटलजींनी सहा वर्षे घटक पक्षांबरोबर एनडीए सरकार चालवले. त्याच परंपरेत मोदी गेली दहा वर्षे सरकार चालवत आहेत आणि याही पुढे चालवत राहतील याची खात्री बाळगावी. कोणी अवाजवी मागणी केली तर ते आपले मत स्पष्ट सांगतात, पण ते खासगी बैठकीत. मला तरी या सरकारच्या भविष्याविषयी तसेच स्थैर्याविषयी जराही शंका वाटत नाही.

जेडीयू, तेलगू देसम या पक्षांच्या सहभागामुळे लोकांच्या मनात ही शंका आली. पण हे दोन्ही पक्ष गेल्या दहा वर्षांत काही काळ एनडीए सरकारचा भाग होते. तेलगू देसम २०१८ पर्यंत सरकारचा भाग होते आणि जेडीयू २०१६ पर्यंत आणि पुन्हा २०२२ पासून सरकारमध्ये आहेच. त्यामुळे २०२४ साली काही तरी वेगळेच घडले आहे आणि आता मोदी हे सरकार कसे चालवतील असा प्रश्न उपस्थित होण्याचे काही कारणच नाही.

काल झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये त्यांनी एकदाही भाजप सरकार असे म्हटले नाही. त्यांनी एनडीए सरकार असाच उल्लेख सातत्याने केला. सर्व पक्षाच्या नेत्यांनी उत्स्फूर्तपणे मोदीजींचे स्वागत केले आणि त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यांची सगळ्यांची भाषणेही हे सरकार दीर्घकाळ चालेल याची ग्वाही देणारी होती.

लेखक माजी केंद्रीय मंत्री आहेत.

officeofprakashjavadekar@gmail. com

Story img Loader