डॉ. क्षितिजा कुलकर्णी
पुण्यात अलीकडेच एका ३७ वर्षीय गर्भवतीचा जुळी मुले, वार खाली असणे, आधी झालेली पोटाची शस्त्रक्रिया अशी जोखमीची गर्भधारणा असताना त्यातील गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. अगदी कमी वेळात अधिक गुंतागुंत झालेल्या शरीराला आधुनिक वैद्यकशास्त्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे वाचवू शकले नाही. एका दवाखान्यात संबंधित स्त्रीला इतर काही आजार असल्यामुळे गर्भधारणा होऊ देऊ नका, असा सल्ला मिळालेला होता. असे असतानाही, लग्नानंतर स्वतःचेच मूल हवे (नाहीतर जणू जगण्यालाच अर्थ नाही!) असा सल्ला २१ व्या शतकात मुलीला देणारा समाज किंवा कुटुंब प्रेमळ म्हणायचे की अंध? निष्पाप की निष्काळजी ? हट्टी की अतिआत्मविश्वासु? आणि डॉक्टरांनी मृत्यूची शक्यता स्पष्टपणे वर्तवली असताना, जीवाला धोका आहे, हे सांगितलेले असताना, दत्तक मुलाचा विचार करावा असा स्पष्ट सल्ला दिलेला असताना एखादे कुटुंब असे कसे वागू शकते?
नैसर्गिक गर्भारपण अवघड असताना आधुनिक वैद्यकशास्त्राच्या आधारे गर्भधारणा होते खरी परंतु गर्भ राहण्यापासून बाळाच्या जन्मापर्यंत, या नऊ महिन्यात बरेच बदल होतात. विशेषतः गर्भवतीचे वय जास्त असल्यास ही शक्यता दुणावते. अशावेळी फक्त गर्भारपणचा उपचार, रक्तवाढीच्या गोळ्या इत्यादीवर भागत नाही तर शरीरात होणारे इतर बदल, रक्तदाब, हृदय, किडनी यांच्यावर काही ताण येत नाही ना यासाठी जनरल फिजिशियनकडून देखील तपासणी काही वेळा आवश्यक असते. म्हणून तर आता सरकारी रुग्णालयातसुद्धा गर्भवती महिलांची तपासणी आवश्यक आणि मोफत आहे. गर्भारपणापासूनच व्यवस्थित दर महिन्याला एकाच ठिकाणी तपासणी सुरू असेल तर डॉक्टरांचाही रुग्णाचा अभ्यास नीट झालेला असतो.
परंतु, भारतातील आरोग्याची अर्थव्यवस्था हे सुद्धा याचे कारण असू शकेल कदाचित! कारण आपल्याला कमीत कमी दरात, अत्याधुनिक व्यवस्थेत, अत्युच्च शिक्षित डॉक्टरकडून (जमलं तर फोनवर, घरीच) थोडे अधिकार किंवा ताकदीचा रंग दाखवून (त्याची मजा वेगळीच!) उपचार घेतले तर गुण चांगला येत असावा. असा केस स्टडी करायला नक्कीच हरकत नाही… एकूणच भावनिक जगाची तार्किक व वैज्ञानिक जगताशी सरमिसळ करून उपयोग नाही.
रुग्णालयामध्ये होणारा खर्च हा बहुतांशी उपचाराच्या दर्जावर अवलंबून असतो. एखाद्या वैद्यकीय संस्थेचे दर्जेदारपण हे ती संस्था किती गंभीर स्वरूपाच्या आजारांचे उपचार करते, ते किती कमी वेळात करते किंवा किती जास्तीत जास्त पेशंटना सेवा देते, किती आधुनिक उपचार दिले जातात, किती अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जाते यावर अवलंबून असते. तेथील अनुभवी डॉक्टर, त्यांच्या टीम्स, त्यांचा सततचा अभ्यास यांचा तो परिपाक असतो. नॅशनल ॲक्रेडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल हेल्थकेअर, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्जेशन सारख्या संस्था यांचा दर्जा व्यवस्थापन बघतात. खरे तर सरकारी रुग्णालयाचे असे NABH standerdization झाले की असे प्रश्न उद्भवणार नाहीत. भारतात, मातामृत्यू दर, २०२० च्या गणनेनुसार एक लक्ष प्रसुतीमागे ९७/ असा आहे. हाच दर ब्रिटनमध्ये १३.५ एवढाच आहे. त्याला राजकीय रंग देण्यापेक्षा तो कमी करण्यासाठी सरकारी व खासगी क्षेत्र कसे अजून सुधारित काम करू शकते किंवा नव्याने विकसित होणाऱ्या शाखांना एकत्रितपणे बांधून रोगग्रस्त असण्याची स्थिती (मॉर्बिडिटी) आणि मृत्युदर कसा कमी करता येईल याचा अभ्यास झाला पाहिजे! भारत अजून विकसित राष्ट्रांच्या पंक्तीला बसलेला नाही. सरकारी आरोग्य क्षेत्रात तर सुधारणेला भरपूर वाव आहे. अर्थव्यवस्था बळकट होईल तसे ते शक्य होईल, त्यामुळे आपल्याकडच्या उपचारांची तुलना इतर विकसित राष्ट्रांशी करणे आत्ता तरी धाडसाचे ठरेल.
आता आपण मृत्यूविषयी आपल्या भावनिक आणि मानसिक जगात कशी उलाढाल होते ते बघू . मृत्यूमुळे होणारे मानसशास्त्रीय बदल थॅनॅटॉलॉजी (Thanatology) या शास्त्रीय शाखेत अभ्यासले जातात. मृत्यूनंतर मृत व्यक्तीचे नातेवाईक या मानसिक बदलांमधून जातात. विशेषतः अचानक, अपघाती, मनाची तयारी नसताना, कल्पना नसताना, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ओढवल्यास ही मानसिक अवस्था जास्त प्रखर असते. कुब्लॅर रॉस मॉडेल स्टेजेस ऑफ ग्रीफमधून हे समजून घेता येते. याच्या पाच अवस्था आहेत. सर्वात प्रथम नकार, धक्का बसणे, विश्वास न बसणे, संबंधित व्यक्ती जिवंत असण्याचा भास होणे, ही व्यक्ती आपल्यात नसल्याचे पूर्णतः अमान्य असणे. मग येतो अनावर राग (परिस्थिती आपल्या हाती नसल्यामुळे) त्यानंतर विश्वास उडणे (सिस्टीम, देव, माणूस, एखादी पद्धत यावरील) नाराजी, संताप. मग होते कुठेतरी प्रतारणा स्वतःशी /देवाशी/ परिस्थितीशी घासाघीस, जेणेकरून अशी घटना परत घडू नये. त्यानंतर येते उदासीनता/ डिप्रेशनची स्थिती. मग येते मान्यता किंवा स्वीकार किंवा समजून घेणे. प्रत्येकाच्या बाबतीत घटनाक्रम किंवा जटीलता, प्रखरपणा वेगवेगळा असू शकेल. कालावधी देखील वेगवेगळा असेल. तनिषाताईंच्या कुटुंबाला या अवस्थांमधून जाताना समाजाने मदत केली पाहिजे. किंवा गरज पडल्यास त्यांनी ती निष्णात व्यक्तीकडून घेतली पाहिजे. नऊ महिन्यांच्या कालावधीत घडत गेलेल्या घटनांची जबाबदारी अचानक, एकांगी पद्धतीने एकच व्यक्ती किंवा संस्थेवर, सामूहिक रीतीने ढकलण्यापेक्षा, माध्यमांना भांडवल देण्यापेक्षा, आधीपासूनच जबाबदारीने वागून, रजिस्ट्रेशन करून आणि वेळोवेळी शांतपणे फॉलो अप घेऊन, सैरभैर न होता कोणत्याही टेरिटरी केअर हॉस्पिटल (tertiary care hospital) ला जाऊन नक्कीच या ताईंचा जीव वाचायची शक्यता होती.
नुकत्याच झालेल्या कोरोना या आजाराच्या लाटेमध्ये यातील अनेक लोकांनी इथेच किंवा अशा संस्थांमध्ये उपचार घेतले असतीलही. तर एकूणच व्यवस्थापनाचे महत्त्व किती तेव्हा सगळ्यांनीच अनुभवले असेल. आज इतक्या कमी अवधीत इतकी अत्याधुनिक सुविधा सतत उंचावत नेत लाखो रुग्णांना उपलब्ध करून देताना दीनानाथ हॉस्पिटलने उत्तम व्यवस्थापनाचा दर्जा मिळवला आहे आणि अनुकरणीय ठरवला आहे. घेतलेल्या जमिनीच्या किमतीच्या कित्येक कित्येक पटीने अधिक आणि उत्तम मोबदला लोकांना मिळाला आहे. आणि नुसतेच उपचार नसून अशा संस्थांमधून कित्येक विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेऊन शहरांमध्ये आणि खेड्यापाड्यात आणि इतर देशात देखील सेवा देत आहेत, ते वेगळेच! शैक्षणिक संस्थेचं महत्त्व पुण्याला तरी सांगायची गरज नाही. या कामाचा आवाका प्रचंड आहे. एक शैक्षणिक संस्था काही दिवसात उभी नाही राहत, त्यासाठी जी बुद्धिमत्ता, सचोटी आणि परिश्रम लागतात ते लोकांना रिझवणाऱ्या भाषेत मांडणे कठीण आहे.
या घटनेने राजकारण, शासकीय आरोग्यवस्था, खासगी हॉस्पिटल सेक्टर, धर्मादाय संस्था, अत्याधुनिक व गुंतागुंतीच्या सेवा, उच्चशिक्षित वैद्यकीय चिकित्सकांची फळी, आणि एकूणच समाजामध्ये वावटळ उठवले. परिस्थितीचे आकलन होण्याआधीच प्रतिक्षिप्त क्रियेसारखा माध्यमांचा गदारोळ परकोटीला पोहोचला. अशामुळे सामाजिक स्थैर्य बळावेल की ढासळेल याचे आत्मपरीक्षण नक्कीच गरजेचे आहे. काही गोष्टींची उत्तरे देखील सापडतील, चांगले बदल घडतील, त्यामुळे भविष्यात मार्गक्रमण करण्यासाठी सुकर होईल. परंतु ज्या पद्धतीने हे केले त्यातून सामाजिक असुरक्षितता, समाजमनाची अस्थिरता, कायद्याचा अभाव, प्रसारमाध्यमांची अपरिपक्वता व दुरुपयोग दिसत आहे. सामाजिक परिस्थितीचा, लोकमानसाचा आढावा घेऊन डॉक्टरांची फळी देखील यानंतर सतर्क होईल. पण भावनेच्या आहारी जाऊन समाजातील महत्वाचा आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक घटकच दुखावण्याची आणि दुरावण्याची शक्यता अधिक!
आणि सगळे काही पैशातून आणि अधिकारातून विकत घेता येत असेल तर मात्र मानसिक स्थैर्य आधी विकत घेतले पाहिजे. जेणेकरून कायदा आणि रुग्णालये दोन्ही कमीत कमी लागतील! आणि सरकारी रुग्णालये देखील विश्वासार्ह असतील.
डॉ. क्षितिजा कुलकर्णी
drkshitijakulkarni@gmail.com
© The Indian Express (P) Ltd