रवींद्र माधव साठे – (सभापती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ)

भारतीय लोकशाहीत ‘लोकप्रतिनिधी’ या घटकाला अतिशय महत्त्व आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या राम नाईक यांच्या वयाची ९० वर्षे आज (१६ एप्रिल) पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यकुशल लोकप्रतिनिधीच्या वाटचालीवर टाकलेला हा प्रकाशझोत..

महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनसंघ व पुढे भाजपमध्ये तीन ‘रामभाऊ’ ख्यातकीर्त झाले. स्व. रामभाऊ म्हाळगी, स्व. रामभाऊ कापसे व अलीकडच्या काळात पद्मभूषण म्हणून ज्यांचा सन्मान झाला ते रामभाऊ नाईक. या तिघांतील समान विशेष असा की, सुरुवातीस महाराष्ट्र विधानसभेत आमदार आणि नंतर संसदेत खासदार म्हणून ते निवडून गेले आणि तिघांनीही आपली राजकीय व संसदीय कारकीर्द गाजविली. यातील दोन रामभाऊ (म्हाळगी व कापसे) आज हयात नाहीत. रामभाऊ नाईक १६ एप्रिल रोजी वयाची तब्बल ९० वर्षे पूर्ण करीत आहेत.

रामभाऊंचा जन्म १९३४ मध्ये सांगलीतील आटपाडी गावी झाला. तेथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुणे येथून वाणिज्य पदवीधर झाले व पुढे मुंबईतून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एका खासगी कंपनीत त्यांनी नोकरी पत्करली. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध राहिला. ते मुंबईत गोरेगाव येथे स्थायिक झाले आणि १९६० पासून राजकारणात सक्रिय झाले. १९६९ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी जनसंघाचे पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस  मुंबईचे संघटन सचिव आणि मग १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर मुंबई भाजपचे ते पहिले अध्यक्ष झाले. भाजपच्या मुंबईतील प्रथम राष्ट्रीय अधिवेशनात ते संयोजक होते. मुंबईत भाजपचे संघटनात्मक कार्य वाढण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. १९७८ मध्ये बोरिवलीमधून ते आमदार म्हणून प्रथम निवडून आले. तीन वेळा आमदार व पुढे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा त्यांचा विक्रम नोंद घेण्याजोगा.

हेही वाचा >>> चिप-चरित्र: व्हिएतनाम युद्धाचा असाही लाभ..

रामभाऊंच्या राजकीय प्रवासात जनतेने त्यांची विविध रूपे पाहिली. पक्ष कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासन कुशल केंद्रीय मंत्री व उत्तर प्रदेशचे राज्यपालपद अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. त्या निभावताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंचे दर्शन कार्यकर्त्यांना व जनतेला घडले. सार्वजनिक जीवनात रामभाऊंनी स्वत:चा वैशिष्टयपूर्ण ठसा निर्माण केला.

डॉ. हेडगेवार, स्वा. सावरकर, पं. दीनदयाळ उपाध्याय, रामभाऊ म्हाळगी हे त्यांचे आदर्श होत. स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी संसदीय लोकशाहीतील लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श जनतेपुढे ठेवला. तीच परंपरा रामभाऊ नाईक यांनी आपल्या संसदीय जीवनात चालू ठेवली. म्हाळगींचा वारसा सांगणारे त्यांचे वैशिष्टय म्हणजे लोकप्रतिनिधी हा लोकांना नेहमीच उत्तरदायी असला पाहिजे या भूमिकेतून प्रतिवर्षी मतदारांना आपल्या कामाचा अहवाल सादर करण्याची त्यांनी काटेकोरपणे जोपासलेली परंपरा! लोकसभेत सदस्य असताना रामभाऊ ‘लोकसभा में राम नाईक’ अशा शीर्षकाने अहवाल प्रकाशित करत. पण पुढे अतिशय अनपेक्षितपणे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी ‘लोकसेवा में राम नाईक’ या नावाने आपल्या माजी व भावी मतदारांविषयी असलेली आपले उत्तरदायित्व पाळणे सुरूच ठेवले. पुढे ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाल्यावरही त्यांनी या परिपाठात खंड पडू दिला नाही.

रामभाऊंची मला ओळख झाली ती माझ्या शालेय जीवनात. तो काळ होता बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असतानाचा. १९७८ मध्ये रामभाऊ बोरिवलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. बोरिवलीत आम्ही अभिनव नगरात स्वतंत्र प्लॉट घेतला होता. या वसाहतीत आठ-दहा प्लॉटचे एक युनिट होते. युनिटमधील सभासदांनी आपापली घरे स्वत: बांधण्याची पद्धत होती. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीत सिमेंट हा महत्त्वाचा घटक. त्या काळी सिमेंटची खूप टंचाई होती. सरकारी कोटयात सिमेंट मिळत असे, पण ते मिळवणे जिकिरीचे असे. बाहेर काळया बाजारात सिमेंट घेणे ही गोष्ट आवाक्याबाहेरची. आमच्या युनिटमधील सर्व सभासद एकत्र जमले. सिमेंट मिळविण्याच्या दृष्टीने कोणते प्रयत्न करता येतील याचा विचार झाला. रामभाऊ त्याच वेळी सिमेंट समितीचे सदस्य होते. माझ्या वडिलांनी रामभाऊंशी संपर्क साधून आपण सिमेंट मिळविण्याचे प्रयत्न करू, अशी कल्पना मांडली. इतर सभासदांनी ही कल्पना उचलून धरली परंतु सरकारी यंत्रणेस पैसा चारल्याशिवाय आपल्याला सिमेंट मिळूच शकणार नाही, असे सभासदांचे मत होते. माझ्या वडिलांना मात्र रामभाऊंना भेटल्यावर आपले काम निर्धोकपणे होईल असा विश्वासच नव्हे तर खात्री होती. वडील रामभाऊंना भेटले. रामभाऊंनी क्षणाचाही विलंब न करता सिमेंट समितीचा सदस्य या नात्याने उचित अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्याचा लाभ असा झाला की आम्हास जास्तीचा एक नया पैसा खर्च न करता सरकारी किमतीतच (रु.२५/- प्रति गोण) सिमेंट उपलब्ध झाले.

साधी राहणी, सचोटी, भपकेबाजपणाचा लवलेश नाही, स्वच्छ पेहराव, वेळ पाळणे ही रामभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े. हाती घेतलेले काम व्यवस्थितपणे व निर्दोष करण्याचा त्यांचा आग्रही स्वभाव आहे. कार्यक्रमाची आखणी करणे, योजना करणे, कार्यवाही करणे व कार्यक्रमानंतर त्याचा पाठपुरावा करणे, ही कोणत्याही कार्यक्रमाच्या यशस्वी व्यवस्थापनाची चतु:सूत्री आहे. संघ पठडीत यांस कार्यक्रमाची पूर्वतयारी व पूर्णतयारी करणे म्हणतात. अशा व्यवस्थापनात रामभाऊ वाकबगार आहेत.

मुद्रित शोधन हा काहीसा कंटाळवाणा प्रकार, परंतु रामभाऊंच्या सान्निध्यात आलेल्यांना याची नेहमी प्रचीती येते. कार्यालयीन पत्रकापासून पार्टीच्या प्रकाशनात छापला जाणारा प्रत्येक शब्द वा मजकूर शुद्ध व निर्दोष असला पाहिजे, असा त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिला आहे.

कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण वर्गात व अन्य कार्यक्रमांत रामभाऊ नेहमी सहभागी होतात. प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शक वक्ता म्हणून सहभागी होताना रामभाऊ उशिरा आलेत असे ऐकिवात नाही. दिलेली वेळ व शब्द पाळणे हा त्यांचा खाक्या तसेच पूर्वतयारीशिवाय रामभाऊंनी विषयमांडणी केली, असे कधी घडले नाही. रामभाऊंच्या डायरीत एखाद्या कार्यक्रमाची नोंद झाली तर त्यांना कार्यक्रमाचे पुन्हा स्मरण करण्याची गरज भासत नाही. कार्यक्रमाच्या ५-१० मिनिटे आधी ते नक्कीच पोहचणार, रामभाऊ म्हणजे वेळेचे व्यवस्थापन व शिस्त याचा वस्तुपाठ आहेत. आजच्या राजकारण्यांत हा गुणविशेष क्वचितच सापडतो.

रामभाऊंचा स्वभाव मैत्री करण्याचा आहे त्यामुळे केवळ भाजपमध्येच नव्हे तर पक्षाच्या बाहेरील अनेक जणांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत. ते लोकप्रिय आहेत. यांत रेल्वे हमालापासून अन्य राजकीय पक्षांतील नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते ते उद्योगपतींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. एकदा मला रामभाऊंबरोबर दिल्लीपर्यंत प्रवास करण्याचा योग आला. त्या वेळी ते खासदार वा मंत्री नव्हते. आम्ही मुंबई सेंट्रल स्थानकात राजधानी एक्सप्रेसमध्ये बसलो होतो. गाडी सुटायला सुमारे अर्धा तास होता. या वेळेत रेल्वेच्या स्टेशन मास्तरापसून ते हमालापर्यंत अनेकजण रामभाऊंना भेटून गेले. सर्वांनी रामभाऊंची खुशाली विचारली. त्यांच्या सर्वांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचे एक वानगीदाखल उदाहरण.

मतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा मन:पूर्वक प्रयत्न करणे, हा त्यांचा स्वभाव आहे. लोकप्रतिनिधीने मतदारसंघ कसा बांधला व जोपासला पाहिजे याचे उदाहरण रामभाऊंनी प्रस्तुत केले. मुंबईकर त्यांना ‘रेल्वे प्रवासी मित्र’ म्हणून ओळखतात. ते केंद्रात मंत्री झाल्यानंतर स्थापन झालेले ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळ’, महिला विशेष गाडी, संसदेत ‘वंदे मातरम्’ व ‘जन-गण-मन’ गाण्याच्या प्रथेचा आग्रह, बॉम्बे व बंबईचे ‘मुंबई’ असे नामकरण, ही त्यांच्या संसदीय कार्याच्या उपलब्धीची उदाहरणे.

लोकप्रतिनिधी हा नेहमी आपल्याला उपलब्ध असायला हवा, अशी भारतीय मतदारांची अपेक्षा असते. शिवाय लोकप्रतिनिधीने आपले काम करायला हवेच याबद्दल कामाच्या कायदेशीर चौकटीचा विचारही न करता मांडलेला ठाम आग्रहही असतो. रामभाऊंनी निवडून आल्यानंतर मतदारांच्या या मानसिकतेचे मर्म ओळखले. त्यामुळेच रामभाऊंना फोनवरून निरोप ठेवल्यानंतर त्यांचा फोन आला नाही, असे सहसा घडले नाही. त्यांचे कार्यालय हे लोकप्रतिनिधीचे कार्यालय कसे असावे याचा उत्तम वस्तुपाठच होता. त्यांनी व्हिजिटिंग कार्डाला शोधलेला पर्याय, आमदार निधीतून बांधलेले दुमजली शौचालय त्यांच्या कल्पकतेची साक्ष देतात. त्यांचा अहवाल आणि पत्रे ही गुणवत्तेबाबतच्या काटेकोरपणाची चुणूक दर्शवितात. पक्षनिष्ठा, संघनिष्ठा, हाती घेतलेल्या कामाचे स्वामित्व (ओनरशीप) घेणे, हे त्यांच्या व्यक्तित्वाचे नोंद घेण्याजोगे विशेष. सामाजिक समस्यांविषयी ते कायम संवेदनशील राहिले. प. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली अंत्योदय संकल्पना त्यांचा आदर्श होती. केवळ मतदारसंघातील नव्हे तर देशातील कुष्ठपीडित रुग्णांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी व त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी त्यांनी संसदेत घेतलेला पुढाकार, मुंबईत गोराई- मनोरी भागातील नागरिकांसाठी समुद्राखालून पाईपलाईन टाकून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था, अर्नाळा किल्ल्यात समुद्रात मनोरे उभारून रहिवाशांसाठी उपलब्ध केलेली वीज, तारापूर अणु ऊर्जा प्रकल्प टप्पा ३ व ४ मुळे अक्करपट्टी व पोफरण गावातील विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी दिलेला लढा, केंद्रात स्वतंत्र मच्छीमार मंत्रालय स्थापनेसाठीचा पाठपुरावा ही उदाहरणे त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेची साक्ष देतात. रामभाऊ नाईक खऱ्या अर्थाने जनतेचे सच्चे पाईक राहिले.

भारतीय लोकशाहीत ‘लोकप्रतिनिधी’ या संस्थेस अतिशय महत्त्व आहे. विद्यमान स्थितीत या संस्थेस अधिक सुदृढ व विश्वासार्ह बनविण्याची आवश्यकता आहे. ते होण्यासाठी रामभाऊ नाईक यांच्यासारख्या कार्यकुशल, कार्यमग्न, उत्तरदायी आणि परिपक्व लोकप्रतिनिधींची अधिक गरज आहे. रामभाऊंची वयाची ९० वर्षे पूर्ण होत असली तरी मनाने ते तरुणच आहेत. त्यांच्याकडे अखंड जनसेवा करण्याची तीच उभारी आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन व त्यांना पुढील काळातही निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

ravisathe64 @gmail.com