शेखर खांबेटे हे तबला वादन, अभिनय आणि नाट्य दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रांत हौसेने मुक्तसंचार करणारे, विशेष लक्षणीय कामगिरी करणारे कलावंत होते. विजया मेहता, पु. ल. देशपांडे आणि अशोक रानडे ज्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले, त्यांच्याकडून ज्यांना कलेच्या प्रांतात खूप काही शिकता आले, असे ते भाग्यवान कलाकार होते.

कलाकाराच्या प्रतिभेला आणि कौशल्यांना देशाच्या मर्यादा नसतात. त्याच्या क्षमता त्याला या सर्व सीमा पार करून रसिकांपर्यंत पोहोचवतातच. खांबेटे यांच्याबाबतीतही असेच झाले. १९८४ साली बर्लिन येथे आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव झाला होता. विजया मेहता दिग्दर्शित ‘हयवदन’ नाटक तेव्हा सादर झाले होते. वादक, गायक आणि संवादक अशा तिन्ही भूमिका एकट्या खांबेटे यांनी यशस्वीरित्या निभावल्या होत्या. १९९२ साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचा संगीत नाटकांसाठीचा उत्कृष्ट वादकाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. आंतरबँक नाट्य स्पर्धेत अभिनयाच्या प्रथम पारितोषिकाचे ते मानकरी ठरले. १९९६ साली दोहा येथे तेथील मराठी मंडळाच्या स्थापनेसाठी जो कार्यक्रम झाला त्याचे संपूर्ण आयोजन शेखर यांनी केले होते. ‘स्वरानंद’ या ध्वनिफितींची निर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी त्यांनी विविध ४० विषयांवरच्या कॅसेट्सची निर्मिती केली होती. संगीत आणि नाटक या दोन विषयांशी निगडित ११ विषयांवरील कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी एकट्याने केली. कलेच्या क्षेत्राकरिता त्यांचे हे भरीव योगदान या ठिकाणी मुद्दाम नमूद करावे, असे आहे.

हेही वाचा…एक देश, एक निवडणूक’… प्रश्न मात्र अनेक!

ढंगदार, उपज अंगाने तबलावादन हे त्यांचे वैशिष्ट्य! म्हणूनच ते गायकप्रिय आणि रसिकप्रिय होते. संगीताचार्य रानडे गुरुजी यांच्या कार्यशाळेत ते मार्गदर्शन आणि साथसंगत करत. गप्पांची मैफल रंगतदार करणे, माणसे जोडणे, रम्य आठवणींना उजळा देणे हे या कलाकाराचे गुणविशेष आवर्जून सांगितले पाहिजेत, असेच आहेत. त्यांची स्मरणशक्ती उत्तम आणि कोणतीही गोष्ट समजावून सांगण्याची हातोटी कौतुकास्पद होती. चांगल्या अर्थाने ते ‘मस्त कलंदर’ होते. प्रत्येक कृतीमध्ये कलात्मक दृष्टी ठेवून श्रोत्यांना सामोरे जाण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. कलात्मकता त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रतिबिंबित होत असे. उमद्या स्वभावाचा दिलदार कलाकार म्हणून ते सर्वत्र लोकप्रिय होते. तरुण वयात बिकट प्रसंगांना तोंड देऊन यशस्वीरित्या त्यातून ते बाहेर आले. त्यातून खचून न जाता त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन अंगिकारला. बऱ्याच कौटुंबिक जबाबदाऱ्या एकाच वेळी पेलल्या. न डगमगता निष्ठेने आपली कामे केली, म्हणून उतारवयातही ते समाधानी राहिले.

कलाकार किती वेगवेगळ्या रूपांत समोर येऊ शकतो, याचे खांबेटे हे चालते बोलते उदाहरण होते. नाट्य संगीताचा कार्यक्रम असू दे किंवा शास्त्रीय संगीताचा… ‘बैठकीची लावणी’ असू दे किंवा ‘देवगाणी’ त्यांना कोणताही संगीतप्रकार वर्ज्य नव्हता. दायाबायाचा तोल राखत ते आपली कामगिरी चोख बजावत असत. त्यांची तबला साथ असली की गायक मंडळी खुश, निवांत असत… निवांत अशासाठी की तालाला कच्चे असलेले गायक भरकटले की त्यांना सांभाळून घेणारा तबलावादक हवासा वाटे. गायकांना प्रोत्साहन देत तबलासाथ करणे हे सर्वच वादकांना जमत नाही. शेखर यांना ते छान जमत असे आणि त्यांचे हेच वेगळेपण त्यांना अन्य कलाकारांपेक्षा खास ठरवणारे होते. एकदा एनसीपीएमध्ये पु. ल. देशपांडे एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. त्यांनी मजेदार पद्धतीने शेखर यांची ओळख करून दिली होती. ते म्हणाले, “हा कलाकार रिझर्व बँकेत नोकरी करतो अशी ‘अफवा’ आहे. आम्ही सांगू तेव्हा तो तालमीला हजर असतो.” उदरनिर्वाहाचे साधन आणि संगीताची साधना यांचा बेमालूम मेळ त्यांनी जुळवून आणला होता.

शेखर खांबेटे यांना संगीताचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला. त्यांच्यात अगदी बालवयापासूनच असलेली सूर-तालाची जाण त्यांच्या वडिलांनी हेरली आणि त्यांना तबल्याच्या तालाकडे वळविले. शेखर यांनी वडिलांच्या मर्गदर्शनाखालीच तबलावादनाचे प्राथमिक धडे गिरविले. त्यानंतर अनेक मान्यवरांकडून त्यांनी धडे घेतले. १९८४ पासून पंडित श्रीधर पाध्ये यांच्याकडे संगीत शिकत होते. ते स्वतःला कायम विद्यार्थीच मानत. असा हा मस्त कलंदर, अनेकांचा मार्गदर्शक होता. नवोदितांना आधार होता. संगीताच्या क्षेत्रात त्यांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा…‘लाडके’ अर्थकारण कधी?

एक आठवण या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते. शेखर आणि मी समवयस्क. आम्ही दोघे भारतीय रिझर्व्ह बँकेत एकाच खात्यात कामाला होतो. अगदी समोरासमोर बसायचो. आमची मैत्री घट्ट होती. त्याच्या सहवासात मला संगीतातले अनेक बारकावे समजले आणि त्या दृष्टीने मी श्रीमंत झालो. तबल्यातले नवे कायदे, पलटे तो मला बाकावर वाजवून दाखवत असे आणि मला लिहूनही देत असे. काही दिवसांनी, ‘कायदा बसवायला घेतला का?’ असे तो आवर्जून विचारत असे. तो नुकताच जर्मनीला जाऊन आला होता तेव्हाची एक हृद्य आठवण सांगावीशी वाटते. एक अतिशय किमती सोनेरी पेन त्याने तिथून आणले होते. मी लिहून पाहिले, मला ते खूप आवडले. मी स्तुती केली आणि म्हटले ‘आपल्याकडे मिळेल का असं?’ तो म्हणाला, ‘अरे हे पेन तुला आवडलय ना? तूच वापर. मला या पेनचा उपयोग नाही, या पेनने तू तुझे लेख लिही. ते स्वतःकडे ठेवणे थोडे अवघड वाटले, तेव्हा त्याने माझ्या शर्टाला ते पेन लावले आणि म्हणाला फक्त लिहिण्यासाठी तिथून ते तू काढायचे. रोज तुझ्या शर्टावर हे पेन मला दिसले पाहिजे. मित्रांवर प्रेम करण्याच्या त्याच्या अनेक तऱ्हा होत्या. त्यापैकी ही एक

हेही वाचा…उपवर्गीकरणावरील आक्षेपांना उत्तरे आहेतच!

कलाकार हा काळाबरोबर अधिकाधिक प्रगल्भ होत जातो आणि जाताना आपल्यामागे आपल्या कलेचा ठेवा सोडून जातो. खांबेटे यांनी घडविलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या रूपाने त्यांच्या वादनाचा वारसा यापुढेही कायम राहील. त्यांचे संगीत ज्यांनी ऐकले, त्यांच्या कानांत ते कायम निनादत राहील.

mohankanhere@yahoo.in