माणिक कोतवाल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज आपण सर्व भारतीय चांद्रस्पर्शाच्या दिव्य क्षणाचा आनंद लुटत आहोत. अमेरिकास्थित डय़ुक विद्यापीठामध्ये ‘फ्रिट्झ लंडन प्रोफेसर ऑफ फिजिक्स’ म्हणून कार्यरत असलेला माझा मुलगा डॉ. आशुतोष कोतवाल याने चंद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वितेबद्दल गौरवाची भावना व्यक्त करताना असे उद्गार काढले की ‘‘एका यशाच्या उदरात भावी कर्तृत्वाची बीजे दडलेली असतात. आजचा दिवस भारतीय शास्त्रज्ञांच्या नावाने साजरा केला जावा.’’ आपल्या अभिनंदन संदेशामध्ये आशुतोष पुढे असे म्हणाला ‘‘जागतिक वैज्ञानिक विश्वाने इस्रोच्या वैज्ञानिकांचे व अभियंत्यांचे या ऐतिहासिक घटनेबद्दल अभिनंदन केले आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरण्यात यशस्वी होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. जागतिक पातळीवरच्या वैज्ञानिक अन्वेषणामधील भारताचे स्थान किती उंचावले आहे, त्याची ग्वाही आता मिळाली आहे. सर्व भारतीय आणि भारतीय उगमाचे परदेशस्थ या सर्वाची मने अभिमानाने उत्फुल्ल झाली आहेत.’’ खरोखरच आपल्या भारताची प्रतिमा २१व्या शतकामध्ये उजळत चालली आहे. कारण भारतीयांच्या आंतरिक चैतन्याला अनेक दिशांनी आविष्कृत होण्याच्या संधी मिळत आहेत. भारतीयांची अवकाश क्षेत्रातील भरारी आता दिगंताकडे झेपावत आहे. २३ ऑगस्ट २०२३ या दिवसाची या क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णमयी नोंद होणारच, पण या सुवर्णयुगाची तुतारी फुंकणारा १५ ऑगस्ट १९६९ हा दिवसही तेवढाच महत्त्वाचा आहे.

भारताच्या अवकाशभरारीचे प्रस्थान त्या दिवशी ठेवले गेले. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) स्थापना या दिवशी झाली. डॉ. साराभाई यांच्या दूरदृष्टीला अवकाशातला दूरचा पल्ला दिसत होता. डॉ. कलाम, डॉ. सतीश धवन, डॉ. वसंत गोवारीकर असे एकेक प्रतिभावंत सहकारी या भरारीमध्ये सामील झाले. या सर्वाच्या उत्तुंग कल्पनांना निधडेपणाने विश्वासाचे बळ देणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी देशाला लाभल्या, हे भारताचे भाग्यच! विज्ञान-तंत्रज्ञानाचे बीज रुजवताना व त्याची जोपासना करताना नेहमीच अंतज्र्ञान, दृढविश्वास, चिकाटी या गुणांचा कस लागतो. या वृक्षाची फळे समाजाला दिसायला मोठा कालावधी जावा लागतो.

या आरंभकाळात आपला अवकाश कार्यक्रम अमेरिका, फ्रान्स, रशिया या देशांच्या सहकार्याने चालवत, पुढील ३० वर्षांमध्ये भारत स्वयंपूर्ण झाला. वातावरणाचा अभ्यास करणारी रॉकेट्स, ती प्रक्षेपित करण्याची सुविधा, स्वदेशी इंधननिर्मिती अशी पावले टाकत आंतरराष्ट्रीय समुदायासाठी रॉकेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्याइतका या काळात भारत समर्थ झाला. आपल्या द्रष्टय़ा वैज्ञानिकांच्या डोळय़ांसमोर त्यांचे ध्येय स्पष्ट होते. शतकाच्या अखेरीपर्यंत भारताचे स्वत:चे दूरसंपर्क आणि पृथ्वी निरीक्षणाचे उपग्रह असतील, ते उपग्रह अवकाशात हव्या त्या कक्षेत प्रक्षेपित करणारी स्वदेशी रॉकेट असतील असा निर्धार त्यांनी केला. तो निर्धार पार पाडण्याचे काम  ताज्या दमाचे डॉ. कलाम प्रभृती सहकारी यांनी केले. एक गोष्ट महत्त्वाची अशी, की या सर्व अध्वर्यूंच्या मनात आणखी एक विचार स्पष्ट झालेला होता. तो म्हणजे भारताचा अवकाश कार्यक्रम देशाच्या सर्वागीण विकासाशी पूर्णपणे बांधील असेल.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलै १९८० या दिवशी उपग्रह प्रक्षेपणाचे पहिले रॉकेट (एलएलव्ही ३) अवकाशात झेपावले. रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरू लागला. त्यानंतर इस्रो शास्त्रज्ञांनी एएसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही अशा रॉकेटची निर्मिती केली. या रॉकेटद्वारा ४००० किलो वजनाच्या दूरसंपर्क उपग्रहाला पृथ्वीपासून ३६,००० किमीवर भूस्थिर कक्षेत सोडण्यापर्यंत इस्रोने प्रगती केली. भारतीय बनावटीच्या ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाचे प्रक्षेपण १९ एप्रिल १९७५ रोजी रशियाच्या रॉकेटच्या साहाय्याने झाले. त्यानंतर १९७६ पासून देशाला आवश्यक विविध कृत्रिम उपग्रहांची निर्मिती होऊ लागली. वैश्विक किरण, सूर्याकडून येणारे न्यूट्रॉन, गॅमा किरणांच्या नोंदी घेणारे सेन्सर व इतर वैज्ञानिक उपकरणे यांनी युक्त असे भास्कर, अ‍ॅपल व त्यानंतर देशामध्ये परिवर्तन आणणाऱ्या ‘इन्सॅट’सारख्या उपग्रहांची निर्मिती सुरू झाली.

या ‘इन्सॅट’मुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांतीच घडली. असंख्य वृत्तवाहिन्या, केबल टीव्ही आणि ‘थेट घरापर्यंत’ हे तंत्रज्ञान शक्य झाल्याने देशामधील खेडी जगाशी जोडली गेली. आंतरजाल फाइव्ह जीपर्यंत पोचले आहे. हवामानासंबंधीच्या आपत्कालीन यंत्रणांना या तंत्रज्ञानाची साथ मिळू लागल्याने जीवितहानी टळू लागली. ‘नाविक’ नावाच्या उपग्रहशृंखलेमुळे स्वदेशी ‘जीपीएस’ सुविधा उपलब्ध होऊ घातली आहे. या सर्व वाटचालीच्या आधारावर भारताच्या ‘चंद्रयान’ व ‘मंगळयान’ या मोहिमा उभ्या राहिल्या आहेत. पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांच्या भोवती फिरणारे उपग्रह इस्रोने तयार केले आहेत. इतर ग्रहांचा व अवकाशाचा अभ्यास करणारी वैज्ञानिक यंत्रणा इस्रोकडे आहे. देशातील संशोधन संस्था व विद्यापीठे या यंत्रणेमध्ये सहकार्य करीत आहेत. पुढील दोन वर्षांत ‘गगनयान’ मोहिमेवर जाण्यासाठी आपले तरुण आकाशवीर सज्ज होत आहेत. रशियाकडून त्यांना प्रशिक्षण मिळत आहे. सूर्यिबबाला गिळू पाहणाऱ्या हनुमंताची आठवण जागी करणारी ‘आदित्य’ मोहीम हाती घेण्याचे सामर्थ्य आमच्या अवकाशशास्त्रज्ञांनी मिळवले आहे.

हा सर्व आढावा घ्यावासा वाटला, तो १४ जुलै २०२३ रोजी प्रत्यक्षात आरंभ झालेल्या ‘चंद्रयान ३’ या मोहिमेमुळे! या यानामध्ये समाविष्ट असे तीन महत्त्वाचे घटक आहेत. ते म्हणजे प्रॉपल्शन मोडय़ुल म्हणजे नियंत्रण यंत्रणा. विक्रम नावाचे (डॉ. साराभाई यांच्या आदरणीय स्मृतिप्रीत्यर्थ) लँडर आणि ‘प्रज्ञान’ नावाचे रोव्हर हे होते. नियंत्रण यंत्रणा ही ‘आय-थ्री के’ धर्तीची एक संदूक आहे. तिच्या एका बाजूला सौर पॅनेल जोडलेले आहे. वरील पृष्ठभागावर एक मोठे सिलिंडर असून, त्याचा उपयोग ‘विक्रम’चा उड्डाणतळ म्हणून होणार आहे. या यानातील इंधन ७३८ वॉट शक्ती निर्माण करू शकते. ‘विक्रम’ लँडर हे संदूकच्या आकाराचे आहे. चंद्रभूमीवर टेकण्यासाठी चार पाय असून, चांद्रस्पर्श सुरळीत व हळुवार होण्यासाठी त्याच्यावर अनेक सेन्सर बसवलेले आहेत. ‘विक्रम’जवळ ‘सीएचएएसटीई’ यंत्रणा आहे, ज्यायोगे चांद्रीय पृष्ठभागावरील थर्मल गुणधर्म, भूकंपजन्य घडामोडी, वायू व प्लाझ्मा पर्यावरण इत्यादीचे मोजमाप होईल. ‘प्रज्ञान’वरील यंत्रणेमध्ये दोन वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने अभ्यास होणार आहे – ‘अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर’ आणि ‘लेझर इंडय़ुस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप’ ही ती दोन उपकरणे आहेत. भारताच्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून १४ जुलै रोजी निघालेले ‘चंद्रयान-३’ ४० दिवसांचा प्रवास करून २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४७ वाजता अखेरच्या टप्प्यावर पोहोचले. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशामध्ये १०० किमी अंतरावरच्या कक्षेमध्ये फिरत असताना, ‘विक्रम’ अलग झाले आणि चंद्रभूमीच्या दिशेने अधोगामी उतरणीला लागले. भूमिस्पर्श करतानाची ‘विक्रम’ची गती दोन मीटर प्रतिसेकंद अशी होती. विक्रम आणि प्रज्ञान यांचे चंद्रभूमीवरचे वास्तव्य एका चांद्रदिवसीय कालावधीचे म्हणजे १४ पृथ्वीय दिवसांचे असणार आहे.

चंद्रयान-३ मोहिमेची काही वैशिष्टय़े लक्षात घेण्याजोगी आहेत आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या सामर्थ्यांची द्योतक आहेत. पहिले म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा निर्णय, याअगोदरच्या परदेशी मोहिमांमध्ये विषुववृत्तावर याने उतरली होती. दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभाग उल्काजन्य खोल खड्डय़ांनी व्यापलेला आहे. त्यामुळे विषुववृत्ताच्या मानाने तो उतरण्यासाठी अचूक दक्षतेची मागणी करणारा आहे. तरीही भारताचे दक्षिण ध्रुवावर सफल होणे हे महत्त्वाचे आहे. हा धोका पत्करल्यामुळे भारताला सर्वप्रथम चांद्रीय जल हिमविषयक माहिती मिळणार आहे. येथे हे बर्फमय पाणी विपुल प्रमाणात आहे. भावी अवकाश अन्वेषणामध्ये या पाण्याचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे. आकाशवीरांना वापरण्यासाठी, तसेच भावी अंतराळ मोहिमांमध्ये रॉकेट इंधनामध्ये रूपांतर करण्यासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. अमेरिकेच्या नासाबरोबर ‘आर्टेमित्य’ करारान्वये भारत चंद्रविषयक ज्ञान सगळय़ांबरोबर वाटून घ्यायला बांधील आहे. रशिया या करारामध्ये बांधलेला नाही. याला रशियाचा ‘नेमेसीस’ म्हणावे काय? काही असो, आजचा दिवस भारतीय अस्मितेला उंचावणारा आहे. अनेक भारतीय तरुण-तरुणींच्या प्रज्ञेला नवी ऊर्जा देणारा आहे, यातच आपणा सर्वाचा सात्त्विक आनंद आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successfully landing the vikram lander on the south pole of the moon indian space success ysh