राहुल सरवटे
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची १४१ वी जयंती २८ मे रोजी असताना, सावरकरांकडे अधिक स्वच्छ दृष्टीनं (टीकाकार आणि समर्थकांनीही) पाहण्याची गरज आहेच. विशेषत: सावरकरांचं मराठीजनांमधलं आकलन आणि इंग्रजी आकलन यांत फरक असू नये, ही अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करतं आणि काळाचं आणि मराठी राजकीयवैचारिक संस्कृतीचं अपत्य म्हणून सावरकरांकडे पाहतं..

‘द प्रिंट’ या इंटरनेट-नियतकालिकात २०२२ साली झोया भट्टी लिहितात: ‘‘दिल्लीच्या उबदार आणि प्रकाशमान अंतर्भाग असणाऱ्या फुल सर्कल बुक स्टोरच्या खिडक्यांमधून आणि अगदी जुन्या, खान मार्केटसारख्या उच्चभ्रू भागातल्या बाहरीसन्ससारख्या पुस्तकाच्या दुकानांच्या बाहेरच्या दर्शनी भागात एक आता ओळखीचा झालेला, काळी टोपी घातलेला चश्मिष्ट चेहरा तुमच्याकडे पाहात असतो- विनायक दामोदर सावरकर. आज जिवंत असणाऱ्या इतर अनेक नावांहून अधिक भव्य नाव. अनेक पुस्तकांवर आता हा पुनरुज्जीवित झालेला चेहरा झळकत असतो.’’ भट्टी यांच्या निरीक्षणात निश्चितच तथ्य आहे. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून भारतात हिंदुत्ववादाचा पाया व्यापक होऊ घातल्याच्या काळात ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकरांचा वैचारिक पुनर्जन्म झालेला दिसतो. विक्रम संपत यांनी लिहिलेलं सावरकरांचं दोन-खंडी इंग्रजी चरित्र काही काळापूर्वी प्रसिद्ध झालं. नुकताच त्यांच्या आयुष्यावर हिंदी चित्रपटही आला. अनेक लहान-मोठे लेख, काही विवादास्पद विधानं, इत्यादी प्रकरणं अधूनमधून सुरूच असतात. संपत यांच्या पुस्तकाला आणि रणदीप हुडा यांच्या चित्रपटाला जो प्रतिसाद दिसतोय त्यातून सावरकर हा ज्याला इंग्रजीत ज्याला ‘पॉप्युलर’ किंवा ‘पब्लिक’ डिस्कोर्स म्हणतात, त्यात काही प्रमाणात तरी कुतूहलाचा आणि आस्थेचा विषय झालेला दिसतो.

हेही वाचा >>>प्रधानसेवक, चौकीदार आणि आता परमात्मा का दूत…

मात्र इंग्रजी अकादमिक आणि उच्चभ्रू लेफ्ट-लिबरल विचारविश्वात सावरकरांची ओळख प्राधान्यानं किंबहुना निव्वळ ‘हिंदुत्वाचे प्रणेते, कट्टर मुसलमान-द्वेष्टे आणि महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे प्रेरणास्थान’ अशीच असल्यामुळे, सावरकरांविषयी मोठ्या प्रमाणावर अनास्था, तुच्छता किंवा काही प्रमाणात द्वेषही आढळतो. त्यामुळे सावरकर हल्ली समाजमाध्यमे, चित्रपट, यू-ट्यूब अशा पॉप्युलर चर्चाविश्वाचा भाग बनले असले तरीही ते आजवर इंग्रजी अकादमिक अभ्यासाचा विषय बनले नव्हते. त्यातही पूर्वीच्या (म्हणजे बाबरी वादाच्या पूर्वीच्या काळात) इंग्रजी लिखाणात सावरकरांना राष्ट्रवादी म्हणून पाहण्याचा एक प्रयत्न होता ज्यात ‘आधीचे’ (म्हणजे १८५७ ला हिंदू-मुस्लिमांनी एकत्रितपणे लढलेलं स्वातंत्र्यसमर संबोधणारे) इंग्रज-विरोधी आणि राष्ट्रवादी सावरकर आणि ‘नंतरचे’ मुस्लीमविरोधी, हिंदुत्ववादाचा पुरस्कार आणि गांधीवादाचा तीव्र निषेध करणारे सावरकर असा भेद रूढ झालेला होता. नव्वदोत्तर कालखंडात आणि विशेषत: भाजपच्या राजकीय उत्कर्षानंतर दोन निराळ्या सावरकरांविषयीची ही मांडणी मागे पडून त्यांना मोदींचे पूर्वसुरी आणि भावी हिंदुराष्ट्राचे वैचारिक जनक म्हणून पाहिलं जाऊ लागलं. मात्र आता सावरकरांचा अभ्यास करण्याची नितांत गरज भासू लागल्याचं दिसतं. हल्लीच सावरकरांविषयी दोन नवी इंग्रजी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. यातलं एक पुस्तक आहे, २०२२ सालचं विनायक चतुर्वेदी लिखित ‘हिंदुत्व अॅण्ड व्हायलन्स: व्ही. डी. सावरकर अॅण्ड द पॉलिटिक्स ऑफ हिस्टरी’ (मणिशंकर अय्यर हे ‘द वायर’मध्ये या पुस्तकाच्या परीक्षणात लिहितात, ‘‘असं पुस्तक जे सावरकरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतं; मात्र त्यांचा धिक्कार करत नाही’’. अर्थात अय्यरांसारख्या कट्टर सावरकर विरोधकाच्या ह्या विधानाच्या उलट एखाद्या सावरकर-समर्थकाला चतुर्वेदींचं पुस्तक सावरकर-विरोधीही वाटू शकतं.).आणि दुसरं नुकतंच आलेलं जानकी बखले लिखित ‘सावरकर अॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदुत्व’.

बखलेंच्या मते, बऱ्याच आधुनिक भारतीयांचा असा गैरसमज असतो की सावरकर हे श्रद्धाळू हिंदू तरी असावेत किंवा कट्टर माथेफिरू तरी. त्यामुळे, बखलेंच्या दृष्टीनं सावरकर त्यांच्या सर्व गुंतागुंतींसह समजून घेणं हे आपल्या काळाच्या आकलनासाठी आवश्यक आहे. त्यासाठी मुळात निव्वळ समर्थन वा द्वेष अशा भूमिकांना सोडचिठ्ठी देत सावरकरांना वसाहतिक संदर्भात पाहायला हवं… कवी, इतिहासकार, राष्ट्रवादी, मुस्लीम-विरोधी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, जात-विरोधी अशा त्यांच्या बहुविध भूमिकांमधले परस्पर ताण लक्षात घेऊन त्यांच्या एकंदर जीवनदृष्टीचं आकलन करायला हवं. बखलेंच्या मते, या आकलनातला मोठा अडथळा इंग्रजी अभ्यासजगताचं मराठी विचारविश्वाशी काहीएक नातं नसणं हा आहे. त्यातून मग सावरकर जे निव्वळ निषेधाच्या योग्यतेचे आहेत त्यांच्याबद्दल मराठी जगात काही ममत्व किंवा आस्था कशी असू शकते असा प्रश्न इंग्रजी अभ्यासकाला पडतो. बखलेंच्या मांडणीतून दोन सावरकरांची नवी कल्पना उभी राहते. आधीचे आणि नंतरचे सावरकर हे प्रारूप मागे पडून, मराठीतले सावरकर आणि इंग्रजीतले सावरकर असं नवं सिद्धांतन तयार होतं. या दोन्ही सावरकरांना एकत्र आणि समग्र पाहण्याचा प्रयत्न बखले या नव्या पुस्तकात करताना दिसतात.

हेही वाचा >>>विदर्भाचे नेते विदर्भाच्या प्रश्नांवरच बोलत नाहीत…

मूळ लिखाणाचा आधार

आणि हे करताना बखलेंनी सावरकरांचा मुद्दा शक्यतो त्यांच्याच शब्दांत दिलेला आहे. (खेरीज पुस्तकाला जोडलेल्या दीर्घ अपेंडिक्समध्ये सावरकरांचं लिखाण मुळाबरहुकूम उद्धृत केलेलं आहे.) याची कारणं दोन. पहिलं म्हणजे, सावरकरांच्या लिखाणाचं स्वरूप अनेकदा वितंडवादी (एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या अनेक विचारवंतांच्या लिखाणाचं स्वरूप असं दिसतं. महात्मा फुल्यांच्या लिखाणाच्या संदर्भात या मुद्द्याचा अधिक विस्तार गो. पु. देशपांडेंनी त्यांच्या ‘द वर्ल्ड ऑफ आयडिआज इन मॉडर्न मराठी’ या पुस्तकात केलाय.) असल्यामुळे आणि शैली अनेकदा वक्रोक्तीपूर्ण असल्यामुळे त्यांच्या विधानाचा विपर्यास होत नाहीये याचा वाचकांना पडताळा घेता यावा आणि दुसरं म्हणजे, यामुळे सावरकरांबद्दलचं लिखाण खऱ्या तटस्थ भूमिकेतून वाचकांसमोर मांडता येईल.

सावरकरांना एका व्यापक जागतिक परिप्रेक्ष्यात पाहणं बखलेंना आवश्यक वाटतं. त्यांच्या दृष्टीनं इथे दोन जोड-प्रश्न महत्त्वाचे आहेत. पहिला प्रश्न असा की, सावरकरांशी जोडल्या गेलेल्या बहुतेक गोष्टींची सुरुवात मूळ त्यांनी केलेली नाही. मग ते अस्पृश्यता-निवारणाचं कार्य असेल, किंवा हिंदुत्वविषयक भूमिकेची मांडणी असेल अथवा मुस्लीम राजकारणावरची टीका असेल. मात्र असं असूनही या सगळ्या भूमिकांचे ते प्रमुख प्रतिनिधी कसे बनले? आणि थोडंसं अधिक व्यापक वैश्विक इतिहासाच्या संदर्भात पाहायचं तर फोल्कीशसारखी जर्मन संकल्पना किंवा इटलीतला रोमानिता पंथ, किंवा हंगेरीतल्या उजव्या विचारांची मांडणी असो, अशा अनेक संकल्पना गुप्त संघटना बांधणीच्या रचना राबवीत होत्या. दुसरीकडे भारतात गांधी एक अहिंसक चळवळ चालवत होते. या सगळ्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात १९२१ साली रत्नागिरीत स्थानबद्ध असणारे सावरकर हिंदू सार्वभौमतेच्या निर्मितीच्या प्रक्रिया कार्यान्वित करतात. मराठी भाषेत संकल्पनात्मक जडणघडण झालेल्या या प्रक्रिया कोणत्या होत्या? त्या प्रक्रियांच्या इतिहासाची साधनं कुठली? आणि या प्रक्रियांवर गांधी आणि आंबेडकरांसारख्या विचारवंतांचा काय परिणाम झाला? असे प्रश्न बखलेंच्या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत.

वैश्विक इस्लामच्या भूमिकेला छेद?

सुमारे साडेचारशे पानं आणि सहा दीर्घ प्रकरणांतून बखले या १९२१ ते १९३७ दरम्यानच्या सावरकरी विश्वाचा वेध घेतात. पहिल्या प्रकरणात सावरकरांच्या अंदमानातून झालेल्या सुटकेची कहाणी येते. सावरकर आणि त्यांच्या बंधूंवर फार पूर्वीपासून ब्रिटिश गुप्तहेरांची पाळत होती आणि त्यांची ब्रिटिश दफ्तरांतली नोंद ‘रेवोल्यूशनरी टेररिस्ट’ अशीच होती. विनायक सावरकर हे ब्रिटिशांच्यानुसार कायमच ‘घातक, राजद्रोही, हिंसेला उत्तेजन देणारे’ होते आणि तरीही १९२१ च्या सुमाराला त्यांची अंदमानातून सुटका का केली गेली? निव्वळ सुटकाच नव्हे तर त्यांनी आपल्या स्थानबद्धतेदरम्यान काही अटींचं उल्लंघन करूनही त्यांना पुन्हा अटक करण्यात आली नाही. असं का घडलं असावं? बखलेंचं प्रतिपादन असं की, ब्रिटिशांना सावरकरांच्या मुस्लीमविषयक भूमिकेची संपूर्ण कल्पना होती आणि खिलाफत चळवळीमुळे बळ मिळत असलेल्या वैश्विक इस्लामच्या भूमिकेला छेद देता यावा यासाठी सावरकरांना मुक्त केलं गेलं. इस्लामिक एकीकरणाची चळवळ आणि तिला पाठिंबा देणाऱ्या गांधींसारख्या नेत्यावर सतत हल्ला करणारा सावरकरांसारखा मोहरा ब्रिटिशांना आवश्यक वाटत होता. दुसऱ्या प्रकरणात बखले सावरकरांच्या मुस्लीमविषयक भूमिकेची समीक्षा करतात. त्यांच्या मते, सावरकरांच्या दृष्टीनं मुसलमानांचे आंतरराष्ट्रीय हितसंबंध आणि भारतीय राष्ट्रवाद यांच्यात एक मूलभूत तिढा असल्याने मुसलमान खऱ्या अर्थानं भारताशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत. पण बखलेंच्या मते, केवळ खिलाफत चळवळ, मलबारातील मोपल्यांचे बंड अशा तात्कालिक घटनांमुळे नव्हे तर स्वभावत:च मुसलमान हिंसक आणि हिंदुद्वेष्टे असल्याचं सावरकर मानत होते. सावरकरांचा मुस्लीमविरोध हा केवळ एक राजकीय डावपेच किंवा गांधीविरोधी राजकारणाचा तात्कालिक भाग म्हणून नव्हता तर तो त्यांच्या मूलभूत वैचारिक भूमिकेचा भाग होता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक होता. आपल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ बखले सतत सावरकरांचं मूळ लिखाण उद्धृत करतात आणि वाचकांनाही आवाहन करतात की त्यांनी सावरकरांचं मूळ लिखाण पडताळून पाहावं.

विज्ञाननिष्ठ, कवी सावरकर

पुस्तकाचं तिसरं प्रकरण सावरकरांच्या जातविषयक लिखाणाचा आढावा घेतं. बखलेंच्या मते, सावरकर जातीच्या प्रश्नावर नि:संदिग्धपणे पुरोगामी भूमिका घेऊन सनातन्यांची काटेकोर झडती घेतात. मात्र या भूमिकेचा आधार हिंदू सार्वभौमत्व निर्माण करणं असल्यामुळे त्यांची ही भूमिका मर्यादित झाली. पुस्तकाचं चौथं प्रकरण कवी सावरकरांचा शोध घेतं, विशेषत: पोवाडा या काव्यप्रकाराचा सावरकरांनी केलेला वापर बखलेंना वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. पोवाडा निव्वळ शाब्दिक नसून त्याच्या सादरीकरणातून भावनिक वातावरणाची निर्मिती होते आणि त्यामुळे सावरकर पोवाड्याद्वारे स्थानिक मिथकांना राष्ट्रीय बनवू पाहतात असं बखलेंचं निरीक्षण आहे. पाचव्या प्रकरणात सावरकरांच्या ऐतिहासिक लिखाणाला त्या, सावरकरांचे समकालीन आणि निस्पृह इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या भूमिकेतून छेद देऊ पाहतात. सावरकर आणि शेजवलकर हे दोघेही राष्ट्रवादी भूमिका घेत असले तरीही शेजवलकर इतिहास आणि सामूहिक स्मृती यांच्या मधल्या फरकाची यथास्थित जाण ठेवतात; याउलट सावरकर इतिहास मिथकाच्या रूपातच पाहतात. पुस्तकाचं सहावं आणि शेवटचं प्रकरण अतिशय रोचक आहे. इथे बखले सावरकर हे स्वत:च एक मिथक कसे बनले हे सावरकरांच्या विविध मराठी चरित्रांचा आढावा घेऊन दाखवून देतात.

बखलेंच्या एकूण मांडणीत सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातली आणि विचारांतली जटिलता पुरेशा विस्तारानं आलेली आहे. बखले सावरकरांना त्यांच्या काळाचं आणि मराठी राजकीय-वैचारिक संस्कृतीचं अपत्य म्हणून पाहतात. मराठी सावरकर आणि इंग्रजी सावरकरांना एकत्र पाहण्याचा हा प्रयोग उत्तम साधलेला आहे आणि आज इंग्रजीत तो नितांत आवश्यक आहे.

जानकी बखले या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले) येथे इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. याआधी त्यांचं ‘टू मेन अॅण्ड म्युझिक’ हे पंडित भातखंडे आणि पंडित पलुस्कर यांनी निर्मिलेल्या भारतीय संगीताच्या अभ्यासपद्धती आणि त्यांचा भारतीय राष्ट्रवादी भूमिकांशी असणारा संबंध यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणारं पुस्तक प्रसिद्ध झालंय. त्या जवळपास गेल्या दहा वर्षांहूनही अधिक काळ सावरकरांवरच्या पुस्तकासाठीचं संशोधन आणि लेखन करण्यात गुंतलेल्या होत्या. त्याचं फळ या पुस्तकाच्या रूपात आता आपल्यासमोर आहे.

सावरकर अॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदुत्व’

लेखिका : जानकी बखले

प्रकाशक : प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस२०२४. भारतीय आवृत्ती, पेंग्विन

पृष्ठे: ४३२ ; किंमत: रु.८९९

rahul. sarwate@gmail.com