लोकसभा निवडणुकांचे निकाल यायला दोन महिन्यांचा अवकाश आहे. पण शेअर बाजाराचे म्हणाल तर मतदान होण्याआधीच त्याने जणू या निवडणुकांचा निकाल ठरवून टाकला आहे. म्हणूनच निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पुढील तीन दिवसांत तब्बल पाच टक्क्यांची उसळी घेत ‘सेन्सेक्स’ २२ हजारांच्या उंबऱ्यावर येऊन ठेपला. भविष्यात काय घडेल याकडेच पाहत वर्तमानाची वाट चालणे हा शेअर बाजाराचा स्वभावविशेषच असल्याने सध्याची तऱ्हा आश्चर्यकारक ठरू नये. यालाच लोक बाजाराचे ‘टायमिंग’ असे म्हणतात. सध्यापुरता तरी, भाजपकडून नरेंद्र मोदीप्रणीत सत्तापरिवर्तन केंद्रात घडेल, असे बाजाराला वाटत असावे. १६ मेच्या निकालानंतर उद्भवू शकणारे जर-तरचे प्रश्न आजच्या घडीला कुणाला स्वाभाविक वाटले तरी शेअर बाजाराने या भानगडीत पडायचेच नसते. म्हणूनच भाव-भावनांवर चालणाऱ्या शेअर बाजाराची भावुकता ही या राजकारणातील मोदी लाटेवर स्वार झालेली आहे. बाजाराचा हा मोदीप्रणीत कल हा अर्थातच बहुतांश गुंतवणूकदार वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बडय़ा वित्तीय संस्थांच्या निर्देशांनुरूपच आहे. या वित्तसंस्थांची ही मोदी-भावुकता गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वप्रथम पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपकडून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा, त्यानंतर डिसेंबरमध्ये चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील भाजपची सरशी, अशा प्रत्येक टप्प्यावर लाक्षणिक स्वरूपात दिसून आली आहे. शेअर बाजारात उलाढाल करणारे प्रमुख घटक कोण हे लक्षात घेतले तर, सध्याच्या सेन्सेक्सच्या उसळीचे गमक स्पष्ट होईल. बाजारातील निम्म्याहून अधिक गुंतवणूक ही कंपन्या ज्यांच्या मालकीच्या आहेत त्या प्रवर्तकांकडूनच साधारणपणे होत असते. ही मंडळी थेटपणे वा बडय़ा दलालपेढय़ा अथवा हस्तकांमार्फत आपल्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. यातील बहुतांशांनी मोदींना भावी पंतप्रधान म्हणून पाहायची मनीषा तरी जाहीर केली आहे किंवा मनमोहन सिंग सरकारच्या शासनशून्यतेबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे. या व्यतिरिक्त विकसित देशांतील गुंतवणूकदार समूहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विदेशी वित्तसंस्था तर आपल्या बाजाराची चालकशक्तीच बनल्या आहेत. त्यांनी ठरविले तर सेन्सेक्स चढेल अथवा ठरविले तर गडगडेल, हे आपण कैकवार अनुभवले आहे. यापैकी गोल्डमन सॅक्स, नोमुरा, सीएलएसए आणि बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच यांनी रीतसर अहवाल प्रसिद्ध करून मोदी विजयाच्या पताका यापूर्वीच बांधल्या आहेत. म्हणून पुढचे दोन महिने निवडणुकांचे निकाल येईपर्यंत निर्देशांकांचा तेजीचा वारू असाच चौखूर उधळत राहिला तर नवल नाही. राहता राहिला छोटय़ा गुंतवणूकदारांचा प्रश्न. त्याचा बाजारातील थेट हस्तक्षेप अगदीच नगण्य आणि म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून असलाच तरी दोन-तीन टक्क्यांच्या पल्याड नाही. या सामान्य गुंतवणूकदारांसाठी सद्य बाजारभावनेपुढे फरफटत जाणे अथवा कुंपणावर बसून वाट पाहणे हीच भूमिका राहते. सेन्सेक्सच्या २२ हजारांपर्यंतच्या उसळीतून त्यांनी काही कमावले असण्याची शक्यता कमीच असल्याने सध्याच्या तेजीला भुलून बाजारात उडी टाकण्याचा मोह जडणारेच अधिक निघतील. पण गेल्या काही निवडणुकांकडे पाहिल्यास, सहापैकी पाच लोकसभा निवडणुकांपूर्वी बाजारात तेजीचा ज्वर असाच चढत गेल्याचे दिसून आले आणि निकालाच्या दिनी अथवा आदल्या दिवशी विक्री करून दिग्गज मंडळींनी नफा कमावून ‘टायमिंग’ साधल्याचे आढळले आहे. यंदाच्या मे महिन्यात असे पुन्हा घडल्यास सत्ताबाजाराचे इंगित जोखणाऱ्या समभाग बाजाराने छोटय़ा गुंतवणूकदारांना तोंडघशी पाडण्यासाठी रचलेला हा सापळाच ठरेल. ते होऊ नये हाच सावधगिरीचा सल्ला!
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2014 रोजी प्रकाशित
बाजाराचे मोदी ‘टायमिंग’!
लोकसभा निवडणुकांचे निकाल यायला दोन महिन्यांचा अवकाश आहे. पण शेअर बाजाराचे म्हणाल तर मतदान होण्याआधीच त्याने जणू या निवडणुकांचा निकाल ठरवून टाकला आहे.
First published on: 11-03-2014 at 12:21 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi effect shine stocks markets