‘अन्यथा’ या सदरातील गिरीश कुबेर यांचा ‘बेगानी शादी में..’ हा लेख (लोकसत्ता, ८ फेब्रु.) विशेष भावला. कारण मीही एक संगणक अभियंता असून, गेली १०-१२ वर्षे या क्षेत्रात आहे. या लेखात उल्लेख केलेला प्रश्न (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक तरी उत्पादन भारतीयाने जन्माला घातले आहे का?) मला व माझ्या मित्राला अनेकदा पडला आहे. या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आम्हाला अजूनही मिळालेले नाही. या क्षेत्रातील इतर स्नेह्य़ांबरोबर व संबंधितांबरोबर चर्चा केल्यास ते फारच शालेय उत्तरे देत असतात.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला व काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. सध्या राजकारण, सिनेमा व क्रिकेट वगैरे नंतर बरे पैसे मिळतात ते आयटी क्षेत्रात. त्यामुळे इतर क्षेत्रांतील पदव्या घेतलेले तरुण-तरुणी या क्षेत्राकडे वळतात. फार थोडय़ा लोकांना सॉफ्टवेअर तयार वगैरे करण्यात रस असतो. बहुतेक जण एखाद्या आयटी कंपनीत चिकटले की सुरुवातीची फार तर ४-५ वर्षे प्रत्यक्ष संगणकप्रणालीवर (सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग) काम करतात. कारण त्यांना मॅनेजर होण्याची घाई झालेली असते. त्यामुळे संगणकप्रणाली तयार करण्याचे काम नवीन भरती झालेल्या मेंढरांवर सोपवून, हे उंटावरचे शहाणे उरलेली नोकरीची र्वष शेळ्या हाकत काढतात!
हे मॅनेजर होण्याचे खूळ तमाम भारतीयांना लागलेले आहे. इच्छा असो ना नसो, या ४-५ वर्षे अनुभव असलेल्यांना मॅनेजर व्हावेच लागते. लायकी व कुवत नसतानाही मॅनेजरचे पद मिळाल्यामुळे इतर लोकांसाठी हे लोक डोकेदुखी होऊन बसतात. मग इतर लोकांचा या क्षेत्रात काही करून दाखवायचा उत्साहच संपतो व त्यांचे उरलेले आयुष्य (नोकरीतले) मुख्य कामापेक्षा मॅनेजर लोकांना निरनिराळे रिपोर्ट व तक्ते भरून देण्यात जाते!
बरं, कुठलीही भारतीय व्यक्ती मॅनेजर झाली की तिच्यातले दुर्गुण शतपटीने वाढतात! माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये मला फार थोडे लोक मॅनेजमेंट विषयाची जाण असलेले व खरोखरच मॅनेजमेंट मनापासून आवडणारे असे भेटले आहेत. बाकी तमाम भारतीय मॅनेजर लोकांची बुद्धी एखाद्या किराणा भुसार दुकानाचा मालक किंवा एखाद्या लाकूड किंवा कोळशाच्या वखारीचा मालक किंवा बांधकामावरचा मुकादम या लोकांएवढीच असते. कोणीही हाताखाली काम करायला आला की त्याला फक्त चार प्रश्न विचारायचे असे यांचे ठरलेले असते.
१) उशिरा का आला? २) लवकर का गेला? ३) सुट्टी का घेतली? ४) घरून का काम केलं? (हा प्रश्न हल्लीचे उच्चभ्रू मजूर म्हणजेच आयटीवाल्यांना विचारला जातो.) काम असो वा नसो, जो जास्त वेळ थांबतो आणि सुट्टय़ा घेत नाही तो हुशार!
या अशा सगळ्या वातावरणात ‘लाळघोटेपणा’ व ‘लडिवाळपणा’ हे अंगभूत खास भारतीय गुण ज्यांच्याकडे असतात, ते तरुण-तरुणी तरून जातात व एक दिवशी मॅनेजर होतात व आपल्या हाताखाली मेंढरांना जगड्व्याळ शब्दात मॅनेजमेंटचे डोस पाजतात!
मला अनेकदा कामानिमित्त परदेशात जाण्याचा योग आला. तेथे मात्र आपल्यासारखी मॅनेजर होण्याची घाई कोणालाही नाही हे जाणवले. अनेकदा, तेथील संगणक अभियंता त्याच्या वयाची ३०-४० वर्षे संगणकप्रणाली तयार करण्यातच घालवतो व कित्येकदा तो कंपनीतून रिटायर होताना संगणक अभियंताच असतो. त्यामुळे त्या संगणकाच्या भाषेचे किंवा प्रणालीचे सखोल व उत्तम ज्ञान त्याला असते. तुम्ही सहज म्हणून आपल्याकडील कुठल्याही संगणक क्षेत्रातल्या माणसाला विचारा की तो नक्की काय करतो?
१० पैकी ७ ते ८ लोक तुम्हाला कसले न् कसले मॅनेजर असलेले आढळतील! फार थोडी लोकं अशी आहेत, जी २० वर्षांपेक्षा अधिक काळ या क्षेत्रात असूनही प्रत्यक्ष संगणकप्रणालीवर काम करतात. किंबहुना तुम्हाला संगणक क्षेत्रात ७-८ वर्षे झाली व तुम्ही दुसरीकडे कुठे इंटरव्ह्य़ूला गेलात की हा प्रश्न हमखास येतो. ‘अरे ७-८ वर्षे झाली?’ अजून सॉफ्टवेअर डेव्हलपरच आहेस? मॅनेजर नाही झालास? बरं एखादा म्हणाला की नाही बाबा मला मॅनेजर व्हायला आवडतं, मला संगणकप्रणाली तयार करण्यातच रस आहे. तर त्याच्याकडे, ‘आता याची शंभरी भरली, फार दिवस काही हा येथे टिकत नाही!’ अशा नजरेने बघतात!
-सत्येन सुभाष वेलणकर, पुणे
‘ गुलामगिरी ‘ म्हणणे पटत नाही..
‘बेगानी शादी में..’ हा लेख वाचला. ज्याला आपण भारतीय म्हणतो, त्याला भारताबद्दल प्रेम, आपुलकी आहे का, हे सर्वप्रथम तपासायला हवं. ती नसेल तर केवळ ‘भारतीय’ म्हणून त्याचे कौतुक वाटणे निर्थक ठरते. अर्थात दुसऱ्याच्या यशात आनंद मानण्यात गर काहीच नाही. आनंद व्यक्त करण्याच्या पद्धतीबद्दल मतभेद असू शकतात. त्याचा वापर टीआरपी वाढवण्यासाठी करणे िनद्य असू शकते. पण ‘आपल्यापकी कोणाच्या एकाच्या यशाचा आनंद सगळ्यांना वाटणे’ हा टीकेचा विषय होऊ नये. एखाद्याचे मूल पहिले आल्याचा आनंद शेजाऱ्यांना होणे, गावातला कोणी खूप शिकून एखाद्या कंपनीत किंवा अन्य कुठे उच्चपदस्थ झाला तर उभ्या गावाला त्याचा अभिमान वाटणे, मराठी कलाकार िहदीत चमकल्यावर मराठी माणसांना त्याचा अभिमान वाटणे अशी कितीतरी उदाहरणे आहेत. तेव्हा नाडेलांच्या यशाचा आनंद साजरा करण्याला ‘गुलामगिरी’ म्हणणे पटत नाही. इतर देशातल्या लोकांना असा आनंद होत नाही म्हणून आपल्यालाही होऊ नये, असे म्हणणे तर अजिबातच पटत नाही.
-केदार केळकर, दहिसर (प.)
हेच का आपले पुढारलेपण?
अंदमानमधील पर्यटनाच्या दुरवस्थेबद्दल वाचून (रविवार विशेष, ९ फेब्रु.) मेंदूला झिणझिण्या आल्या. या बाबतीत माझा नायजेरियाचा अनुभव उत्तम आहे. नायजेरियातील लेगोस शहर हे अटलांटिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले असून मुंबईप्रमाणेच उत्तम बंदर आहे. समुद्राचे पाणी अनेक ठिकाणी खोलवर आत घुसलेले असून अनेक खाडय़ा तयार झालेल्या आहेत. त्यांचा वापर शहरांतर्गत वाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणावर केला जातो. सरकारतर्फे एका स्वतंत्र खात्यामार्फत याचे नियमन केले जाते. त्यांनी यासाठी कडक नियम तयार केले असून त्याचे पालन केले जाते. मला माझ्या कामाच्या निमित्ताने कंपनीच्या छोटय़ा स्पीड बोटीने प्रवास करावा लागतो. आतापर्यंत एकदाही मला लाइफ जॅकेट घातल्याशिवाय बोटीवर तर सोडाच, पण धक्क्यावरही जाऊ दिले गेले नाही. बोट चालविणाऱ्यालाही जॅकेट घालावे लागते. तसेच नियामक मंडळाच्या बोटी गस्त घालतात आणि नियम मोडणाऱ्या बोटमालकांना मोठा दंड केला जातो. आपण भारताला आफ्रिकेतल्या देशांपेक्षा पुढारलेले मानतो. मग आपल्याकडे ही शिस्त कधी येणार?
-नितीन कुलकर्णी, लेगोस, नायजेरिया