अशोक राणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेससह समाजवादी, सेक्युलर मंडळी, साहित्यिक, पत्रकार नेहमी असा दावा करतात, की स्वातंत्र्यलढ्यात किंवा ‘चले जाव’ चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीच योगदान नव्हते. ‘लोकसत्ता’मध्ये १२ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेले ‘संघाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह’ हे वृत्तही असेच निराधार आणि संभ्रम निर्माण करणारे आहे. या वृत्तात विदर्भातील चिमूर लढ्याचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. बालाजी रायपूरकर यांच्या वयासंदर्भात शंका उपस्थित करून ‘संघाने एका बालकाला सत्याग्रहात उतरवले होते काय?’ असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. बालाजी संघाचे स्वयंसेवक होते की नव्हते, असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. नागपूर येथील डॉ. श्याम कोरेटी व धीरेन झा यांच्या प्रतिक्रिया घेऊन त्याआधारे संघाचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नसल्याचे भासवण्याचा हा अट्टहास आहे. हे दावे वस्तुस्थितीला धरून नाहीत. त्यामुळे काही मुद्दे मांडणे गरजेचे आहे.

८ ऑगस्ट १९४२ला मुंबईतील गोवालिया टँक येथून महात्मा गांधीनी ‘चले जाव’ची घोषणा दिली आणि देशभर ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू झाले. त्याचे पडसाद विदर्भातही उमटले. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे ब्रिटिश सरकारविरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू झाले. हे आंदोलन देशभर गाजले. संघाचे स्वयंसेवक, काँग्रेस, सेवादल कार्यकर्ते व गुरुदेव सेवा मंडळ यांनी हे आंदोलन उभे केले होते. त्याची दखल १७ ऑगस्ट रोजी बर्लिन नभोवाणीने घेतली होती. संघाचे अधिकारी दादा नाईक, बाबूराव बेगडे, अण्णाजी सिरास, काँग्रेसचे उद्धवराव कोरेकर, संघ शाखेचे मुख्य शिक्षक माधवराव कठाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभे राहिले.

विदर्भात ब्रिटिशांच्या बंदुकीची पहिली गोळी झेलणारा हुतात्मा बालाजी रायपूरकर हा संघाचा कार्यकर्ता होता. या लढ्यात बालाजीसह बाबूलाल झीरे, श्रीराम बिंगेवार, रामाजी बारापात्रे, उद्धवराव खेमसकर अशा पाच चिमूरकरांना वीरगती प्राप्त झाली. जवळपास १२५ चिमूरकारांना बंदिस्त करण्यात येऊन १९ जणांना फाशीची शिक्षा झाली. ही शिक्षा काही काळानंतर रद्द झाली. १६ ते १९ ऑगस्ट असे तीन दिवस हा लढा चालला.

चिमूरच्या लढ्यासंदर्भात किशोर वैद्य यांचे ‘असे झुंजले चिमूर’ हे पुस्तक यवतमाळ येथील ‘चिन्मय प्रकाशना’ने २००२ मध्ये प्रकाशित केले. त्यात काँग्रेसचे तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे यांचा ‘राज्य मंत्री’ अशी मोहर असलेला अभिप्रायसुद्धा आहे. पुस्तकाचे लेखक किशोर वैद्य यांनी चिमूरच्या लढ्यात संघ स्वयंसेवकांचे स्थान अधोरेखित केले आहे. ते लिहितात, ‘चिमूरमध्ये लढ्याची तयारी झाली तेव्हा, काँग्रेसचे पुढारी उद्धवराव कोरेकर यांच्यासह १२ जणांना अटक करण्यात आली. काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक होताच सेवा दलाने मोर्चा काढला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिमूर शहराचे मुख्य शिक्षक माधवराव कठाणे आपल्या २०-२५ कार्यकर्त्यांसोबत ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत मोर्चात सहभागी झाले.’ (पान क्र. ९) त्या वेळी श्री. दादा नाईक, बाबूराव बेगडे, अण्णाजी सिरास हे संघाचे उच्चपदस्थ अधिकारीसुद्धा होते. बालाजी रायपूरकर यांच्या वीरगतीप्राप्तीसंदर्भात लेखक लिहितात, ‘कांताप्रसादच्या (पोलीस शिपाई) एका गोळीने बालाजी रायपूरकर नावाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाचा बळी घेतला. एक प्रतिज्ञित व निष्ठावान संघ स्वयंसेवक धारातीर्थी पडला.’ (पान क्र. १५). प्रकरण ७मध्ये शहीद बालाजी रायपूरकरच्या अंत्ययात्रेसंबंधी उल्लेख आहे. ‘चिमूरच्या इतिहासात एवढी भव्य अंत्ययात्रा चिमूरकारांनी कधीच अनुभवली नव्हती,’ असा उल्लेख करून बालाजी यांच्या चिमूरमधील निवासाविषयी खुलासा करण्यात आला आहे. ‘बालाजी रायपूरकरांच्या घरून अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. एक बालक वय वर्षे १६ मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी शहीद झाले,’ असे लिहिले आहे. उपरोक्त सर्व मुद्दे लक्षात घेतले तर ‘लोकसत्ता’च्या बातमीतील दावा फोल असल्याचेच स्पष्ट होते.

देशभक्तीसाठी वयाची बंधने नसतात. नागपूर महाल झेंडा चौकात शहीद शंकर महाले या बालकाचा पुतळा आहे. त्याला ब्रिटिशांनी फाशी दिली होती, मग शहीद महाले यांना फासावर लटकविण्यासाठी कोणी सत्याग्रहात ढकलले होते काय? हुतात्मा खुदीराम बोस, हुतात्मा बाबू गेनू अशी लहान वयाच्या हुतात्म्यांची उदाहरणे आहेत.

डॉ. श्याम कोरेटी यांनी ‘आष्टी-चिमूर सत्याग्रहात एखाद्याचा वैयक्तिक सहभाग असू शकेल, पण ते संघाचे लोक होते हे सिद्ध करणे कठीण आहे,’ असे मत व्यक्त केले आहे. १९४२ साली जेव्हा ‘चले जाव’ चळवळ झाली तेव्हा संघाजवळ मोठी शक्ती नव्हती, त्यामुळे संघ स्वयंसेवकांनी व्यक्तिश: या चळवळीत भाग घेतला. त्याचा गाजावाजा केला नाही, श्रेय घेणे तर दूरच!

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काँग्रेस मोठी संघटना होती. तो राजकीय पक्ष नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस राजकीय पक्ष झाला. संघ स्थापनेपासूनच सामाजिक, सांस्कृतिक संघटना होती. संघाने कधीही निवडणूक लढवली नाही व काँग्रेसने कोणतीही निवडणूक सोडली नाही. त्यामुळे संघाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल.

लेखक अकोला येथील रहिवासी व रा. स्व. संघाचे हितचिंतक आहेत. ashokrane2011@gmail.com

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss participation in chimur freedom fight asj
First published on: 17-08-2022 at 10:38 IST