काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधी यांची तुलना ओबामा यांच्याशी केली.  जातिवंत भाट वगळता अन्य कोणाही सुबुद्ध नागरिकास अशी तुलना करण्याची इच्छा दुरान्वयानेही होणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील जातिवंत आणि उच्च प्रतीचे भाट काँग्रेस पक्षात भरलेले असून त्याची कमतरता त्या पक्षास कधीच पडलेली नाही. या नवनवोन्मेषशाली भाटसंप्रदायांत गणना करता येऊ शकेल असे तेज:पुंज नाव म्हणजे मणिशंकर अय्यर. चांगला भाट हा बुद्धिमान असावा लागतो परंतु अधिक बुद्धिमान हा अधिक चांगला भाट होऊ शकतो हे अय्यर यांच्यावरून कळून येईल. जयपूर येथील काँग्रेस शिबिरात राहुलोदय झाल्यानंतर अय्यर यांनी त्या प्रसंगाचे वर्णन ओबामा-क्षण असे केले. अमेरिकेत ओबामा यांनी जे काही केले वा करून दाखवले त्याच्याशी राहुल गांधी यांची तुलना करण्याचा मोह बुद्धिमान आणि सुमार अशा दोन्ही भाटांना आवरला नाही. येथे हे लक्षात घ्यायला हवे की राहुल गांधी यांच्याप्रमाणे ओबामा यांचे पणजोबा, आजी, वडील वगैरे मंडळी पंतप्रधान नव्हती आणि घरातील अन्य कोणीही सत्तास्थानी नव्हते. शिवाय, सत्ता उपभोगायची परंतु जबाबदारी कसलीही घ्यायची नाही ही राहुल गांधी यांना असलेली सोय ओबामा यांच्यासाठी उपलब्ध नव्हती. त्यामुळे फक्त जातिवंत भाट वगळता अन्य कोणाही सुबुद्ध नागरिकास ओबामा आणि राहुल गांधी यांची तुलना करण्याची इच्छा दुरान्वयानेही होणार नाही. अशी तुलना करून काँग्रेसमधील दरबारी खुशमस्कऱ्यांनी अमेरिकेतील ऐतिहासिक क्षण अकारण झाकोळून टाकला आहे.
अमेरिकेच्या २८१ वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचे भाग्य आतापर्यंत फक्त १५ जणांना लाभले. ओबामा हे सोळावे. परंतु इतिहास असे दर्शवितो की अध्यक्षपदाची पहिली खेप कर्तबगारीने पूर्ण करणाऱ्या अनेक अध्यक्षांवर दुसऱ्या टप्प्यात मान खाली घालण्याची वेळ आली. १९७२ साली तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन हे ६१ टक्के इतक्या भरभक्कम मताधिक्याने दुसऱ्या खेपेत अध्यक्षपदी आरूढ झाले. परंतु नंतर वॉटरगेट प्रकरणात संपूर्ण नाचक्की होऊनच त्यांना जावे लागले. रोनाल्ड रेगन हेही दुसऱ्या खेपेस पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले. परंतु त्यांच्या साहसवादी आणि बेमुर्वतखोर राजकारणाचा परिणाम म्हणून इराण काँट्रा प्रकरण घडले. रेगन यांनी युद्ध करणाऱ्या इराण आणि इराक या दोन्ही देशांना मुबलक युद्धसामग्री पुरवली आणि त्यातून आलेला पैसा निकाराग्वामध्ये कम्युनिस्ट सरकारविरोधात बंडखोरांना मदत करण्यासाठी खर्च केला. त्या प्रकरणात त्यांचे हात चांगलेच अडकले होते. त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला उत्तम गती देण्याचे त्यांचे पुण्य त्यात वाहून गेले. पुढे डेमोक्रॅट्स बिल क्लिंटन यांनाही दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर आरूढ होण्याची संधी मिळाली. पण ते मोनिका लेवेन्स्की प्रकरणात अडकले आणि त्यांचीही राजवट काळवंडली. इतिहासकालीन अध्यक्षात जॉर्ज वॉशिंग्टन असो वा थॉमस जेफर्सन किंवा अब्राहम लिंकन. या सगळय़ांनाच दुसऱ्या खेपेस सत्ता राबविताना चांगलेच नाकी नऊ आले. या पाश्र्वभूमीवर ओबामा यांनी आपली दुसरी अध्यक्षीय कारकीर्द सुरू केली आहे आणि त्यांच्यासमोरील आव्हाने पाहता इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत. परंतु दुसऱ्या खेपेस कारकीर्द काळवंडलेले काही अध्यक्ष आणि बराक ओबामा यांच्यातील मूलभूत फरक हा की त्यांचे पाय जमिनीवरच आहेत आणि त्यांना वास्तवाचे चांगलेच भान आहे. याचा प्रत्यय सत्ताग्रहणानंतर ओबामा यांनी केलेल्या भाषणात सहज दिसतो. आपला देश यापुढे देशांतर्गत व्यवस्था, अर्थरचना सुदृढ करण्यावर भर देईल असे ओबामा यांनी सूचित केले आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची मानायला हवी. याचे कारण जगाला शिस्त लावायची हे आपले निसर्गदत्त कर्तव्यच असल्याची भूमिका अमेरिकेची असते. या विश्वाचा गाडा सुरळीतपणे चालतोय न चालतोय हे पाहण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे आधीचे अध्यक्ष धाकटे जॉर्ज बुश आणि अन्य वागत आले. त्यातून जग बदलायचे ते बदलले नाहीच. उलट अमेरिका आर्थिक खाईत पार लोटली गेली. त्याची जाणीव आता रास्तपणे ओबामा यांना आहे. जगभरातील लष्कराच्या अशा भाकऱ्या भाजण्याच्या अमेरिकेच्या सवयीमुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेस चांगली गळती लागली आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशाचा खजिना म्हणजे गळका डबा झाला असून ही गळती रोखायची कशी हे अमेरिकेसमोरचे मोठे आव्हान आहे. इराकपाठोपाठ अफगाणिस्तानातूनही लवकरात लवकर आपले लष्कर मागे घेण्याची घोषणा अध्यक्ष ओबामा यांनी केली ती हे भान आल्याने. पुढची कारकीर्द आपण अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणावर खर्च करू हे ओबामा यांचे विधान त्यामुळे आश्वासक आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था आज कुंठित आहे आणि तिला गती देणे हे नव्या अध्यक्षांचे सर्वात मोठे कर्तव्य असणार आहे. २००८ साली ओबामा यांच्या नावावर अमेरिकी जनतेने भरभरून शिक्कामोर्तब केले त्याच्या आधी चार महिने अमेरिकेत बँकांनी गटांगळय़ा खायला सुरुवात केली होती. लीह्मन ब्रदर्स या बलाढय़ बँकेने बुडण्याचा पहिला मान पटकावला होता. नंतर डझनभर बँका नाहीशा झाल्या. या पाश्र्वभूमीवर आहे ते सांभाळणे हे ओबामा यांच्या पहिल्या खेपेतील आव्हान होते. ते त्यांनी उत्तमपणे सांभाळले यात शंका नाही. तरीही त्यांच्या पहिल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात बेरोजगारीचा दर मोठय़ा प्रमाणावर वाढत गेला आणि डोक्यावरचे कर्जाचे ओझे कसे कमी करायचे या विवंचनेने त्यांना ग्रासले. पहिल्या खेपेत निवडणुकीत हो.. आपण करू शकतो अशी आशावादी हाक ओबामा यांनी दिली होती. ती पूर्ण करताना काय आणि कसे हे सांगण्याची संधी काही त्यांना पहिल्या खेपेस मिळाली नाही. त्यांचा त्याबाबतचा प्रामाणिकपणा पाहून जनतेने त्यांना ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी      दुसऱ्यांदा संधी दिली. तेव्हा आता तेच त्यांचे उद्दिष्ट       असणार आहे. त्यामुळे संरक्षणमंत्रिपदी त्यांनी चक      हॅगेल यांच्या नावाची घोषणा केली आहे तर त्याच     वेळी गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख म्हणून जॉन ब्रेनन यांचे      नाव मुक्रर केले आहे. यातील हॅगेल हे इस्रायलच्या     तालावर नाचण्यास विरोध करणारे म्हणून विख्यात      आहेत तर ब्रेनन हे नवनव्या हल्ला योजनांसाठी ओळखले जातात. यातील हॅगेल यांची नियुक्ती ही         ओबामा यांच्या नव्या शांततावादी धोरणाशी सुसंगत म्हणावयास हवी. अणुबॉम्बचे तंत्र विकसित करणाऱ्या इराणवर हल्ला करावा असे अमेरिकेतील युद्धखोर घटकास वाटते. या युद्धखोरांना    इस्रायलचा छुपा पाठिंबा आहे. पण इस्रायलच्या सोयीसाठी म्हणून आपण कोणतेही युद्ध नव्याने ओढवून घेणार नाही अशी स्वच्छ भूमिका ओबामा यांनी घेतली आहे. शांततापूर्ण जगण्यासाठी सतत युद्धच करायला लागते असे नाही, असे सांगत ओबामा यांनी आपल्या राजवटीची दिशा स्पष्ट केली. त्याचबरोबर        अमेरिका बरेच काही करू शकते असा आशावाद छेडताना मूठभरांना सर्व काही मिळते आणि       अनेकांना सर्वस्व पणास लावल्याखेरीज मूठभरही मिळत नाही, ही विसंगती त्यांनी अधोरेखित केली.
या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या जयपूरफुटी अधिवेशनाकडे पाहायला हवे. तसे          पाहिल्यास मणिशंकर अय्यर यांनी नक्की कोणत्या कोनातून  पाहिले म्हणून त्यांना राहुल गांधी आणि ओबामा   यांची तुलना करावीशी वाटली असा प्रश्न पडेल. तेव्हा अय्यर यांना इतकेच सांगता येईल : ते चित्र पाहा आणि हे चित्र पाहा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: See that picture and