सुहासिनी देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीअरविंदांच्या राजकीय तसेच आध्यात्मिक जीवनात त्यांचे महाराष्ट्र आणि मराठी माणसांशी असलेले नाते महत्त्वपूर्ण आहे. केम्ब्रिजमध्ये शिकत असताना ते ज्या ‘इंडियन मजलिस’ या देशभक्त विद्यार्थ्यांच्या संघटनेकडे आकर्षित झाले, त्यात अनेक मराठी व्यक्ती होत्या, ज्या पुढे अरविंदांच्या राष्ट्रीय कार्यात त्यांना साहाय्यभूत झाल्या होत्या. केम्ब्रिजमधील वास्तव्यात ‘लोटस अँड डॅगर’ या भारतीय विद्यार्थ्यांच्या गुप्त संघटनेचेही श्रीअरविंद सदस्य बनले. देशकार्यासाठी जीवन वाहण्याची संघटनेची शपथ त्यांनी ज्या सदस्यांबरोबर घेतली त्यात मोरोपंत जोशी व मोरेश्वर गोपाळ देशमुख हे दोन मराठी विद्यार्थी होते. दोघेही पुढे राष्ट्रीय काँग्रेसच्या नेमस्त गटात सामील झाले आणि श्रीअरविंदांच्या जहाल विचारसरणीपासून व क्रांतिकार्यापासून दूर गेले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्लंडमध्ये श्रीअरविंदांचा परिचय बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी झाला आणि ते संस्थानाच्या कारभारात अधिकारी म्हणून नियुक्त झाले. त्यांच्याबाबत सयाजीरावांनीच म्हटले आहे. ‘श्रीअरविंदांच्या रूपाने मला अवघ्या २०० /- रुपयांत कोहिनूर हिराच प्राप्त झाला.’ श्रीअरविंदांनी बडोदा संस्थानात रुजू होण्याचे कारण म्हणजे एकतर महाराज गुणग्राहक आणि प्रागतिक विचारांचे होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या संस्थानात प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा होती.

बडोद्यात खासेराव जाधव यांच्या वाड्यात तसेच बंधू कॅप्टन माधवराव जाधव यांच्या घरीही त्यांचे वास्तव्य होते. माधवराव श्रीअरविंदांच्या राजकीय विचारात व गुप्त क्रांतिकारी कार्यातही सामील होते. माधवरावांना युरोपात सैनिकी शिक्षण घेण्यासाठी पाठवावे अशी योजना श्रीअरविंदांनी लोकमान्य टिळकांच्या मदतीने बनविली होती. यासाठी श्रीअरविंदांना साहाय्य मिळाले ते एक मराठी मित्र न्या. गोविंद दीनानाथ मडगावकर यांचे. मडगावकर हे केम्ब्रिजमध्ये शिकत असताना मजलिसचे सदस्य होते. १२ वर्षांनी मुंबईत अचानक श्रीअरविंदांची व त्यांची भेट झाली. श्रीअरविंदांचे क्रांतीविषयक विचार ऐकून ते प्रभावित झाले व त्यांनी तातडीने हॉटेल ताजमध्ये गुप्त बैठक घेऊन श्रीअरविंदांना या कामात आर्थिक साहाय्य करण्याचे मान्य केले. या बैठकीसाठी लो. टिळकही उपस्थित होते.

जतींद्रनाथ बॅनर्जी या बंगाली तरुणास नाव बदलून बडोदा संस्थानाच्या अश्वदलात भरती करण्याचा आणि सैनिकी शिक्षण देण्याचा धाडसी डाव श्रीअरविंदांनी रचला तो माधवरावांच्या मदतीने. त्या काळी बंगाली तरुणांना नेभळट म्हणून ब्रिटिश सैन्यात प्रवेश मिळत नसे.

१८९३ मध्ये भारतात आल्यानंतर श्रीअरविंद जसे बडोदा संस्थानात रुजू झाले त्याप्रमाणे त्यांचे केम्ब्रिजमधील एक मित्र व मजलिसचे सदस्य हे के. जी. देशपांडे हे मुंबईस ‘इंदुप्रकाश’चे संपादक म्हणून रुजू झाले त्यांनी श्रीअरविंदांना भारतातील तत्कालीन राजकीय परिस्थितीवर लेखमाला लिहिण्यास सांगितले. श्रीअरविंदांचा भारतातील पहिल्यावहिल्या राजकीय लेखनाचा आरंभ अशा तऱ्हेने अवघ्या २१ व्या वर्षी झाला तो मुंबईच्या ‘इंदुप्रकाश’मधील ‘न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड’ या परखड लेखमालिकेने. इंदुप्रकाश हे काँग्रेसचे मुखपत्र, त्यातून न्या. रानडे यांच्यासारखे मवाळ नेते त्याच्या विश्वस्तांपैकी एक. रानडे यांनी या लेखमालिकेवर आक्षेप घेतला आणि निनावी लेखकांस आपली जहाल भाषा सौम्य करण्याचा सल्ला दिला. अशा लेखांऐवजी ‘भारतातील तुरुंगाचे व्यवस्थापन’ या विषयावर अभ्यास करून लेख लिहिण्याचा वडीलकीचा सल्लाही दिला. “तो त्या वेळी आपल्याला फारसा भावला नाही, तरी पुढे अलिपूरच्या कारावासात राहण्याची वेळ आली त्या वेळी त्यावर गांभीर्याने विचार करायला हवा होता, असे आपल्याला वाटले,” असे श्रीअरविंदांनी म्हटले आहे.

श्रीअरविंदांचा राजकीय क्षेत्रातील अनेक उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्वांपैकी न्या. रानडे यांच्याशी अल्पकाळ संबंध आला तर लो. टिळक व ना. गोखले यांच्यासोबत दीर्घकाळ संबंध आला. ना. गोखले यांच्याविषयी ते लिहितात, राजकारणी म्हणून गोखल्यांबद्दल कुठलाही आदर आपल्या मनात राहणे अशक्य होते. मग मनुष्य म्हणून ते कितीही गुणवान असोत काँग्रेसच्या विविध अधिवेशनांत गोखले आणि श्रीअरविंद यांच्यामध्ये सौहार्दापेक्षा संघर्षाचे प्रसंगच अधिक आले. कोलकाता अधिवेशनात स्वराज्य – स्वदेशी – बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चार ठरावांवरून उभयतांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला तो गोखले यांनी या ठरावांचा मसुदा तयार करताना भाषेच्या सौष्ठवासाठी (?) त्यांच्या शब्दयोजनेत फेरबदल केले, त्या ठरावांना अगदीच मिळमिळीत बनवून टाकले तेव्हा. त्यामुळे ब्रिटिश राज्य म्हणजे भारतीयांना दैवी वरदान अशी निष्ठा असलेले गोखले प्रखर राष्ट्रीय विचारांच्या श्रीअरविंद यांना म्हणूनच फारसे आदरणीय वाटले नसावेत.

याउलट पहिल्या भेटीतच लोकमान्य टिळकांविषयी त्यांच्या मनात प्रचंड आदरभाव निर्माण झाला. १९०१ मध्ये बंगालमधून अत्यंत निराश मनःस्थितीत बडोद्याला जात असताना श्रीअरविंद वाटेत ठाण्यात उतरले आणि तेथे श्री. मंदावळे यांच्या द्वारा त्यांनी उदयपूरच्या ठाकूर रामसिंग यांच्या गुप्त संघटनेची शपथ घेतली.

भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर एकाच वेळी प्रखर राष्ट्रीय विचारसरणीचा उदय झाला तो श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक यांच्या रूपाने. १८९३ मध्ये ‘इंदुप्रकाश’मधील लेखमालिकेद्वारा श्रीअरविंद यांनी प्रखर राष्ट्रवादाचा शंख फुकला. त्याच वेळी लोकमान्यांनी केसरी आणि मराठा या पत्राद्वारे काँग्रेसच्या मवाळ धोरणावर व ब्रिटिश नोकरशहांच्या कारभारावर आपली तळपती लेखणी चालवून जहाल राष्ट्रवादाचे शिंग फुंकले होते. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू करून सर्वसामान्य जनांसाठी प्रखर राष्ट्रीय विचारांच्या पाठशाळाच उघडल्या होत्या. टिळकांच्या विद्वत्तेविषयी, त्यांच्या राजकीय विचारसरणीविषयी श्रीअरविंदांना जो आदर वाटत होता तो त्यांनी लोकमान्यांच्या ‘भाषण व लेख’संग्रहाला दिलेल्या प्रस्तावनेतून प्रकट होतो. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर ‘द इंडिपेंडंट’मध्ये त्यांना श्रद्धांजली वाहणारा जो लेख त्यांनी लिहिला, त्यावरून लोकमान्यांविषयी त्यांना असलेला आदरभाव व्यक्त होतो. तर लोकमान्यही श्रीअरविंदांचे खरे स्वरूप जाणून होते, हे डॉ. कुर्तकोटी (करवीर पीठाचे शंकराचार्य) यांनी सांगितलेल्या एका आठवणीतून लक्षात येईल. डॉ. कुर्तकोटी सांगतात- “आम्ही काही मोजकेच विद्यार्थी लो. टिळकांकडे त्यांच्या ‘गीतावर्गा’ला जात असू. ज्या ज्या ठिकाणी ‘श्रीभगवान उवाच’ असे येते, त्या त्या ठिकाणी लोकमान्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ‘श्रीअरविंद उवाच’ असा बदल करण्यास सांगितले होते.

बडोद्यात श्रीअरविंदांना बंगाली किंवा गुजराथीपेक्षा मराठी मित्रच अधिक लाभले. त्यात रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई होते. दोघे संध्याकाळी फिरायला जात असत. महाराजांच्या खासगी सहलीमध्येसुद्धा बरेचदा दोघे सहभागी असत. त्यांनीही श्रीअरविंद व सयाजीराव यांच्यामधील संबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या आठवणी लिहिलेल्या आहेत. बडोद्यात श्रीअरविंदांनी विविध भारतीय भाषांचा अभ्यास केला. त्यांना फडके नावाच्या तरुण मराठी शिक्षकाने मराठी भाषा व मोडी लिपी शिकवली.

बडोदा कॉलेजात प्रथम फ्रेंच व मग इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करीत असताना त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आर. एन. पाटकर, शंकर बळवंत दीडमिशे यांसारखे मराठी विद्यार्थीही होते. या विद्यार्थ्यांनीही श्रीअरविंदांच्या हृद्य आठवणी सांगितल्या आहेत. एक शिक्षक म्हणून, व्यक्ती म्हणून श्रीअरविंदांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यामुळे प्रकाश पडतोच शिवाय श्रीअरविंदांचे शिक्षणविषयक विचार, त्यांची आगळीवेगळी शिक्षणपद्धती यावरही प्रकाश पडतो.

ज्ञानसाधनेबरोबरच श्रीअरविंदांची योगसाधनाही सुरू झाली ती मराठी मित्रांमुळे आणि पूर्णत्वाकडे प्रवास करू लागली तीही मराठी योग्यांमुळे. मित्र केशवराव देशपांडे यांनी त्यांना सुरुवातीला योगसाधना करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्या वेळी शक्तीने भारावलेल्या त्यांना ‘ब्रह्म सत्य जगन्मिथ्या’ सांगणारे तत्त्वज्ञान भावणारे नव्हते. परंतु बारीन्द्रचा असाध्य डोंगरी ताप एका नागा साधूने अद्भुतरीत्या बरा केला, हे पाहिल्यावर मायभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करता येईल असा विश्वास वाटून ते योगाकडे वळले. मित्र ए. बी. देवधर यांनी त्यांना प्राणायामाची प्रथम ओळख करून दिली. प्राणायामाचा अद्भुत अनुभव ते घेत होते. दिवसाकाठी आठ आठ तास प्राणायाम केल्यानंतर १५०-२०० ओळी सहज लिहून होऊ लागल्या. आपल्या अंगकांतीत फरक पडला. आपली चैतन्यकी वृद्धिंगत झाली असे त्यांनी नमूद केले आहे. मराठी मित्रांमुळे अनेक योग्यांच्या, साधुजनांच्या संपर्कात ते येऊ लागले त्यापैकी ब्रह्मानंद स्वामी व साखरे महाराज हे मराठी होते. ब्रह्मानंद स्वामी हे १८५७ च्या लढ्यातील एक योद्धा असावेत, असा त्यांच्याविषयी अंदाज होता. श्रीअरविंदांनी त्यांना प्रथम भेटीत प्रणाम केला तेव्हा स्वामी त्यांच्याकडे भेदक नजरेने बघत होते. आत्म्याचा आत्म्याशी जणू थेट संवाद झाला.

सुरत अधिवेशनानंतर साखरे महाराजांनी श्रीअरविंदांना ‘योगाची तातडी करा’ म्हणून सल्ला दिला. त्यानुसार बारीन्द्रच्या मार्फत त्यांनी अमरावतीच्या विष्णु भास्कर लेले यांना बोलावून घेतले. मूळचे वाईचे असणारे लेले महाराज नोकरीनिमित्ताने अमरावतीस स्थायिक झाले होते. या वेळी ते ग्वाल्हेरला होते. हाती तार पडता क्षणीच त्यांना जाणीव झाली की आपल्याला एका महान विभूतीला मार्गदर्शन करावयाचे आहे. श्रीअरविंदांना त्यांनी सरदार मुजुमदारांच्या वाड्यात तिसऱ्या मजल्यावरील एकांतातील खोलीत योगाची दीक्षा दिली. अवघ्या तीन दिवसांत श्रीअरविंदांना निर्विकल्प समाधीचा अनुभव आला.

सुरत अधिवेशनानंतर श्रीअरविंदांनी महाराष्ट्रात प्रवास केला व अनेक भाषणे दिली. तसा हा राजकीय दौरा नव्हता. सुरतेत नेमस्त आणि राष्ट्रीय पक्षांत फूट पडली. नेमस्तांनी राष्ट्रीय गटाकडे अध्यक्षपद जाऊ नये म्हणून (१९०६ च्या) कोलकाता अधिवेशनापासून कशा प्रकारे विरोध केला, कोलकाता अधिवेशनात श्रीअरविंदांनी सुचविलेले चार ठराव नेमस्तांनी विशेषतः ना. गोखल्यांनी त्याची भाषा बदलून कसे अर्थहीन करून टाकले. लोकमान्य टिळक, लाला लजपत राय या आत्यंतिक लोकप्रिय नेत्यांना अध्यक्षपद मिळू नये म्हणून आयत्या वेळी नागपूरऐवजी सुरतेत काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन का भरविण्यात आले, याविषयीचे सारे वास्तव जनतेसमोर मांडावे अशी लो. टिळकांची रणनीती होती. म्हणून त्यांनी श्रीअरविंदांना पुण्यास बोलविले. सोबत लेले महाराज होते. तेथून ते मुंबईस गेले. मुंबईहून त्यांचा कोलकात्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात वाटेत ते ज्या ज्या ठिकाणी एखाद-दोन दिवस मुक्कामास थांबले, तेथे तेथे स्थानिक नेत्यांच्या आग्रहावरून त्यांनी भाषणे दिली यामध्ये नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर अशा ठिकाणी त्यांनी विविध विषयांवर भाषणे दिली. लोक त्यांना ऐकण्यास उत्सुक होते. मराठी पत्रांमध्ये ठिकठिकाणी त्याचे वृत्तांत छापून आले. अनेकांनी त्यांना पानसुपारीची निमंत्रणे दिली. पुण्यातील मुक्कामात त्यांना अनेक ठिकाणी पानसुपारीची निमंत्रणे होती. त्यात ‘काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे हे उल्लेखनीय नाव. अनाथ विद्यार्थिगृहाच्या मागील बाजूस असलेल्या ‘काळ’च्या कार्यालयात श्री. गोविंद पांडुरंग बापट यांनी श्रीअरविंदांना बॉम्बस्फोटाचे प्रात्यक्षिक दाखविले. हिंगण्याच्या स्त्रीशिक्षण संस्थेसही त्यांनी भेट दिली. गायकवाड वाड्यात झालेल्या भाषणाच्या वेळी टिळकांचे राजकीय गुरू महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे अध्यक्षस्थानी होते. याशिवाय अण्णासाहेबांची व श्रीअरविंदांची एक खासगी मुलाखत राजमाचीकराच्या वाड्यात झाली. महर्षी अण्णासाहेबांनी अंतःस्फूर्तीने त्यांचे विभूतीमत्व जाणले होते. निरोप देण्यासाठी ते टांग्यापर्यंत आले आणि त्यांच्या हातास स्पर्श करून त्यांना ‘महाराष्ट्राकडून स्फूर्ती दिली.’

पुण्याशी श्रीअरविंदांचे एक विशेष नाते सांगायचे तर पुण्याच्या पर्वतीवर त्यांना आलेली दिव्य आध्यात्मिक अनुभूती. पर्वतीवर श्रीअरविंदांनी काही काळ ध्यान केले व तदनंतर त्यांनी एक काव्यदेखील लिहिले.

पुण्याहून ते मुंबईस गेले. १५ जानेवारीला गिरगावात त्यांचे भाषण झाले ते राष्ट्रीय शिक्षणावर. १९ जानेवारीला झालेल्या भाषणावेळी त्यांचे मन निर्विकार, निर्विचार, निःस्पंद अवस्थेत गेले होते. लेले महाराजांच्या समवेत आलेल्या निर्विकल्प समाधीचा परिणाम या व्याख्यानाच्या वेळी तीव्रतम झाला. लेले महाराज बरोबर होते. त्यांनी श्रीअरविंदांना म्हटले, ‘श्रोत्यांना नारायण समजून नमस्कार करा. मनापेक्षा वेगळ्या उगमस्थानातून आपोआप बोलले जाईल.’ अशा प्रकारे मनाच्या अत्यंत उच्च निःस्पंद अवस्थेत श्रीअरविंदांनी व्याख्यान दिले.
मुंबईत ते खोपकर नावाच्या गृहस्थाकडे उतरले होते. लोकमान्य टिळकही या भाषणावेळी उपस्थित होते.

‘नाशिक वार्ता’ या स्थानिक पत्रात त्यांच्या दोन्ही व्याख्यानांचा वृत्तांत आलेला होता. आदले दिवशी जुन्या सरकारी वाड्यात तर दुसरे दिवशी काळाराम मंदिरात त्यांची भाषणे झाली.

धुळ्यातील भाषणांचे वृत्त ‘आर्यावर्त’ या साप्ताहिकातून आले होते. अमरावतीत त्यांचा मुक्काम जी. एस. ऊर्फ दादासाहेब खापर्डे यांच्याकडे होता. दादासाहेब खापर्डे लोकमान्य टिळकांचे अत्यंत निकटवर्ती व विश्वासू सहकारी. ते उत्तम गुजराथी बोलू शकत. हसतखेळत श्रोत्यांशी संवाद साधत राजकीय भाष्य करण्याची त्यांची वक्तृत्वशैली लोकप्रिय होती. म्हणून सुरत अधिवेशनाच्या आधी काही दिवस सुरतेत राष्ट्रीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी टिळकांनी दादासाहेबांना पाठविले होते. श्रीअरविंददेखील सुरतेत अधिवेशनापूर्वीच येऊन दाखल झाले होते. तेथपासूनचा त्यांचा घनिष्ठ संबंध. नागपूरच्या श्रोत्यांना श्रीअरविंदांना ऐकण्याची भरपूर संधी मिळाली. डिसेंबरमध्ये सुरत अधिवेशनास जात असताना त्यांनी वाटेत नागपूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणी व्याख्याने दिली होती. आता परतीच्या प्रवासातही नागपुरात त्यांनी व्यंकटेश थिएटर, इतवारी बाजार येथे व्याख्याने दिली.

श्रीअरविंदांच्या महाराष्ट्रातील भाषणांना अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी नागपूरच्या ‘देशसेवा’ या पत्रांतून प्रसिद्धी दिली. नंतर पुस्तक रूपानेही ती भाषणे प्रकाशित केली. त्यासाठी अच्युतरावांना अडीच वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही झाली. पुढे ते पाँडिचेरीस जाऊन राहिले.

श्रीअरविदांनी १९०५ च्या वंगभंगाच्या धामधुमीत ‘नो कॉम्प्रमाइज’ नावाची पुस्तिका लिहिली आणि कोलकात्यास पाठवून दिली. कोणीही ही पुस्तिका छापण्यास तयार नव्हते. अशा वेळी कुलकर्णी नावाच्या मराठी युवकाने रातोरात त्या पुस्तिकेची जुळणी करून दिली.

१९०५ मध्ये श्रीअरविंदांनी भवानी-मंदिर संहिता लिहिली. ही संहिता ‘राष्ट्रमत’चे हरिभाऊ मोडक व वसईचे ख्यातनाम वकील काकासाहेब पाटील यांच्यापुढे प्रथम मांडली. हा मानसुद्धा दोघा मराठी व्यक्तींना मिळावा हे महाराष्ट्राचे केवढे भाग्य!

आपल्या क्रांतिकार्याचा भाग म्हणून नर्मदाकिनारी सुरू केलेल्या ‘गंगानाथ विद्यालया’त बहुसंख्य मराठी मंडळी सामील होती. केशवराव देशपांडे, लेफ्ट. माधव जाधव, खासेराव जाधव, ए.बी. देवधर, हरिकृष्ण तळवलकर वगैरे बडोदे संस्थानातील अधिकारी मंडळी तर श्रीअरविंदांच्या बरोबरीने विद्यालयाच्या स्थापनेत व या राष्ट्रीय शाळेच्या संचालक मंडळात होतीच, पण त्याव्यतिरिक्त अनेक मराठी क्रांतिकारक याच्याशी संबंधित होते. जॅक्सन खून खटल्यातील एक आरोपी विठ्ठल बाळकृष्ण जोशी, ‘अभिनव भारत’शी संबंधित रत्नागिरीचे विठ्ठल लक्ष्मण ऊर्फ मामा फडके, दत्तात्रेय बाळकृष्ण ऊर्फ काका कालेलकर, स्वा. सावरकरांचे बालमित्र वामनशास्त्री दातार, बेळगावचे नागेश वासुदेव गुणाजी अशी अनेक मराठी मंडळी राष्ट्रीय विद्यालयात शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय उपचार देणारे वैद्य म्हणून समाविष्ट होती. तसेच बडोदा सोडून जेव्हा ते कोलकात्यातील नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू झाले, त्या वेळी त्यांच्याबरोबर अनेक मराठी माणसे अध्यापनासाठी अल्प वेतनावर रुजू झाली होती.

१९०७ च्या माणिकतोळा बॉम्बस्फोटात अनेक मराठी तरुण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या श्रीअरविदांशी संबंधित होते, असे अहवालावरून दिसते. त्यात अनेकांची धरपकड तसेच चौकशी करण्यात आली. विष्णु भास्कर लेले, अच्युतराव कोल्हटकर, पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट), यवतमाळचे सिद्धनाथ काणे, बाळकृष्ण हरी काणे इत्यादी त्यात होते. सेनापती बापट यांनी १० हजार पृष्ठांचे श्रीअरविंदांचे साहित्य मराठीत भाषांतरित करून मराठी वाचकांवर मोठे उपकारच केले आहेत. सेनापती बापटांच्या भाषांतरांच्या वह्या बारकाईने वाचून, संपादित करून पुस्तक रूपाने प्रकाशात आणण्यास ज्यांचे साहाय्य झाले ती दोन माणसे मराठीच होती. भा. द. ऊर्फ आप्पाजी लिमये आणि विमलताई भिडे. या दोघांच्या अथक प्रयत्नांनी श्रीअरविंद व माताजी यांच्या विचारांना वाहिलेले ‘संजीवन’ त्रैमासिक २०२३ साली ७४ वर्षे पूर्ण करून पंचाहत्तरीत प्रवेश करेल!

बंगाल आणि महाराष्ट्राला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे टिळकभक्त आणि श्रीअरविंदांचेही भक्त असे सखाराम गणेश देऊस्कर. टिळकांच्या प्रेरणेने त्यांनी ‘शिवाजीर कथा’ हे पुस्तक लिहून बंगालमध्ये स्वराज्याविषयी प्रेम निर्माण केले. तर श्रीअरविंदांच्या प्रेरणेने ‘देशेर कथा’ हे पुस्तक लिहून स्वदेशी व बहिष्कार चळवळीला मोठी प्रेरणा दिली.

श्रीअरविंद मराठ्यांच्या इतिहासाने, विशेषतः शिवाजी महाराज आणि महाराजांच्या तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे या दोन वीरांच्या पराक्रमाने प्रभावित झाले होते. त्यांचे बाजीप्रभू हे वीररसाने ओतप्रोत भरलेले दीर्घ काव्य तसेच कॉन्व्हर्सेशन ऑफ द डेड (स्वर्गातील संवाद) याद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला लाभलेल्या दैवी अधिष्ठानास अधोरेखित केले आहे तर ‘भारतीय संस्कृतीचा पाया’ मध्ये संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज आदी संतांचा गौरव केलेला आहे.

श्रीअरविंद सक्रिय राजकारणातून बाहेर पडून पाँडिचेरी येथे एकांतवासात निघून गेल्यावरही पुनश्च सक्रिय राजकारणासाठी त्यांचे मन वळवावे यासाठी डॉ. मुंजे व डॉ. हेडगेवार पाँडिचेरी येथे त्यांची भेट घेण्यास गेले होते. दासाहेब खापर्डे व अन्य महाराष्ट्रीय पुढाऱ्यांशी त्यांचा झालेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे.

आणखी एक मजेशीर आठवण श्रीअरविंदांनी महाराष्ट्राविषयी दिली आहे. ती तिखट मराठी जेवणाच्या स्वादाविषयी आहे. बडोद्यात शेजारी राहणाऱ्या मराठी प्रोफेसरकडे जेवणाचा प्रसंग होता. पहिला घास घेता क्षणीच त्यांना ब्रह्मांड आठवले. बडोद्यातील गुजराथी जेवण जसे त्यांच्या सौम्य प्रकृतीला पसंत पडले तसेच लोकमान्यांकडील साधे-सात्त्विक जेवण त्यांना अधिक रुचले.

श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासावर तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासावर आपल्या नावाची अमीट मुद्रा उमटवली आहे.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri aurobindo relationship with maharashtra asj
First published on: 18-08-2022 at 09:57 IST