अखेर तो दिवस आला. अनेक दिवसांपासून वावडय़ाच सुरू होत्या. आज सकाळी नेहमीप्रमाणे उशिरानेच जाग आल्यावर दादांनी चहा घेताना वर्तमानपत्र उघडले, आणि त्यांचे डोळे खरोखरीच चमकले. गेल्या काही वर्षांत त्यांची अवस्था भाव नसलेल्या टोमॅटोसारखी झाली होती. वारेमाप पीक आले की रस्त्यावर ओतून द्यायची वेळ येते, आणि ढिगाऱ्याकडे कुणी ढुंकूनही पाहात नाही, तसे आपले झाले होते, या आठवणीने दादांना गदगदून आले. अडगळीत पडलेला नेता आणि चलनाबाहेर गेलेल्या नोटा यांची किंमत एकच असते. काहीही करून आपण चर्चेत असले पाहिजे, या विचाराने त्यांना पछाडून टाकले होते. मग त्यांनी काही मित्रांशी चर्चाही केली. काय करावे म्हणजे नाव होईल, पुन्हा अच्छे दिन येतील, यावर घोर विचारविनिमय केला, आणि कधी नव्हे ते गावाबाहेर पडून, प्रवास करून, थोरामोठय़ांच्या भेटी घेतल्या. त्यांना पुष्पगुच्छ दिले, वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या, जगातल्या साऱ्या घडामोडींवर ट्विटरवरून भाष्य केले, सोशल मीडियाच्या प्रभावी वापराकरिता सल्लागारही नेमले. कधी तरी पडसाद उमटायचे. जुनाट पुस्तकावर जमलेली धूळ उडून गेल्यावर पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसावे, पण पुस्तक कुणीच उघडू नये तसे व्हायचे. कधी काळी कायम जनमानसात असलेल्या आपल्याला असे वंचितावस्थेत राहणे जमणार नाही, या विचाराने दादा अस्वस्थ असायचे. त्यांची ही अवस्था त्यांच्या साथीदारास पाहवत नसे. त्याने दादांचे जुने दिवस पुन्हा आणण्यासाठी जिवाचे रान करण्याचे ठरविले. त्याच वेळी त्याला, राजसाहेबांच्या झंझावाताची आठवण झाली. निवडणुकीच्या काळात साहेबांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या सभांची चर्चा होऊ लागली. मग राजकारणात वंचितावस्थेत गेलेल्या साऱ्या विरोधी नेत्यांनी साहेबांभोवती कोंडाळे केले, आणि साहेबांचे नाव पुन्हा चर्चेत आले. असेच झाले, तर पुढच्या निवडणुकीच्या काळात साहेबांचे वाढते वजन सत्ताधाऱ्यांना महागात पडणार अशी चर्चाही सुरू झाली.. हे पाहिले, आणि राजकारणात मुरलेल्या दादांच्या साथीदारास दादांचेही पुढचे ‘अच्छे दिन’ दिसू लागले. हीच पद्धत वापरायची, आणि दादांना पुन्हा प्रकाशात आणायचे, असे त्याने ठरविले. बघता बघता दादांच्या नावाचाही बोलबाला सुरू झाला. समाजमाध्यमांपासून च्यानेलांपर्यंत सर्वत्र दादांच्या बातम्या झळकू लागल्या. आता दादांचे दिवस सुरू झाले, अशी या साथीदाराची खात्री झाली. पण त्याचे समाधान झाले नव्हते. दादांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसविण्याचा त्याने चंग बांधला, आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली. ‘ईडी’ची चौकशी! ..एकदा का ‘ईडी’चे समन्स आले, की आपोआप राजकारणातील चर्चेचे सारे प्रवाह दादांभोवती भोवरे घालणार हे त्याने ओळखले. मग मोर्चेबांधणी सुरू झाली. काहीही करून ‘ईडी’ मागे लागली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू झाले, आणि पेरलेल्या अनेक सुरुंगांपैकी एका सुरुंगाची वात पेटली.. अखेर ‘ईडी’ची ती नोटीस आली, आणि वर्तमानपत्रांचे रकाने भरले. टीव्ही च्यानेलांवर दादांच्याच चर्चा सुरू झाल्या. विरोधकांनी दादांच्या पाठीशी उभे राहण्याची स्पर्धा सुरू केली.. सारे काही जमून आले होते.. आज अंमळ उशिरा उठल्यानंतर वर्तमानपत्रातील बातम्या पाहताना दादांची छाती अभिमानाने फुलली होती. मग त्यांनी पत्रक काढले, ‘कार्यकर्त्यांनी शांत राहावे, अशा कितीही नोटिसा आल्या, चौकशा झाल्या, तरी आपण घाबरत नाही’..!
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2019 रोजी प्रकाशित
‘राज की बात’..!
निवडणुकीच्या काळात साहेबांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या सभांची चर्चा होऊ लागली
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-08-2019 at 00:02 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on ed notice raj thackeray abn