कोणतीही भाषा आधी निर्माण होत असते आणि तिचे व्याकरण नंतर तयार होत असते. भाषेची ओळख तिच्या व्याकरणशुद्धतेशी निगडित असते, याचे भान मातृभाषा मराठी असणाऱ्या भाषकांनी फार पूर्वीच सोडले आहे. पण तरीही मराठीचे मराठीपण ज्या व्याकरणात अडकलेले आहे, त्याबद्दल शेवटच्या श्वासापर्यंत कमालीचा आग्रह धरणाऱ्यांपैकी अरुण फडके हे एक होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाषेचे सौंदर्य तिच्या योग्य वापरात असते, हे मराठीजनांना पटवून देण्यासाठी फडके यांनी जिवाचा आटापिटा केला आणि शुद्धतेचा आग्रह धरत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शुद्धलेखन हा अतिशय गहनगंभीर विषय असून भाषेचा वापर करणाऱ्यांसाठी ती एक अडचण असते, असा नेहमीचा समज असतो. मला हवा तसा मी भाषेचा उपयोग करेन, इतरांनी ज्याचे त्याने पाहून घ्यावे, असा हट्टाग्रह धरून भाषेचे नुकसानच होत असते. संवाद हा जर भाषेचा मूळ हेतू असेल आणि तो एकाच वेळी अनेकांशी होणार असेल, तर तो सर्वाना सहज समजेल असा असायला हवा, त्यासाठी संवादात सहभागी झालेल्या आणि होणाऱ्यांनी भाषेच्या वापराबद्दल एकवाक्यता ठेवायला हवी. अन्यथा जे सांगायचे आहे, त्याऐवजी भलतेच काही पोहोचण्याची शक्यता अधिक. अरुण फडके यांचा शुद्धलेखनाविषयीचा आग्रह याच कारणासाठी होता. नियमांच्या आग्रहाचा कधीकधी बाऊ होतो, असे अनेकांना वाटत असते. परंतु फडके यांनी त्याचा बाऊ होऊ न देता, भाषा अधिक योग्य पद्धतीने व्यवहारात कशी राहील, यासाठीच प्रयत्न केले. वडिलोपार्जित मुद्रणाचा व्यवसाय असला तरी आधुनिकतेशी नाळ जोडण्यासाठी संगणकीय भाषा निर्मितीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

‘मराठी लेखन कोश’ ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची मोठी ओळख. पण भाषेचा उपयोग करणाऱ्या कुणालाही सहजपणे हाताळता येईल, अशी ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’, ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ‘सोपे मराठी शुद्धलेखन’, ‘चकवा शब्दांचा’ यांसारखी खिशात मावतील अशा आकाराची पुस्तके त्यांनी तयार केली. त्यामागचा त्यांचा हेतू हाच, की भाषेचा वापर अधिक योग्य आणि नेमकेपणाने व्हावा. फडके यांचा हा आग्रह कधीही दुराग्रहात परावर्तित झाला नाही, हे विशेष. एकारलेपणाने एकटय़ानेच लढाई करत राहण्यापेक्षा अधिकांना त्यात सहभागी करून घेण्यातच हित आहे, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे कितीही साध्या शंकेलाही ते अतिशय मनापासून उत्तर देत. प्रश्नकर्त्यांला ज्याअर्थी शंका येते, त्याअर्थी त्याला भाषेबद्दल प्रेम आहे, असे समजायला हवे, असे ते म्हणत. त्यामुळेच मिळेल त्या व्यासपीठावरून शुद्धलेखनाविषयी मार्गदर्शन करण्याची संधी ते सोडत नसत. त्याचा परिणाम असा झाला, की मराठीच्या सुयोग्य वापरासाठी एक चळवळ उभी राहिली. चर्चासत्रे, कार्यशाळा, भाषणे, अभ्यासवर्ग अशा अनेक मंचावरून अरुण फडके सातत्याने कार्यरत राहिले. आज महाराष्ट्रात त्यांचे विद्यार्थी असलेल्यांची संख्या खूपच मोठी आहे. फडके यांचा आग्रह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या चळवळीचे हे सगळे शिलेदार आहेत. भाषेविषयी कमालीचा जिव्हाळा असणाऱ्या, व्रतस्थ, शांत, संयमी, ऋजू व्यक्तिमत्त्वाच्या फडके यांचे आकस्मिक निधन ही भाषेच्या अभ्यासकांसाठी खूपच दु:खद घटना आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun phadke profile abn