गिरणगावातील खानावळवाल्या महिलांना खासगी सावकारीच्या दुष्टचक्रातून सोडवून त्यांना सन्मानाचे जीणे जगण्यासाठी सुरू झालेल्या अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सरस्वतीबाई जगताप म्हणजेच सरस्वती काकींचे सोमवारी निधन झाले आणि गिरणगावच्या महिला चळवळीतील एक अध्याय संपला.
सरस्वती काकींचे संपूर्ण आयुष्य सतत संघर्षमय राहिले. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय असलेल्या काकींनी १९४२ मध्ये सातारा जिल्ह्य़ातील प्रतिसरकार चळवळीतील भूमिगतांना सांभाळणे, त्यांचे निरोप योग्य पद्धतीने पोहोचविणे आणि त्यांना हत्यारांचा पुरवठा करणे आदी कामे बिनबोभाट केली. याबद्दल नंतर शासनाने त्यांचा गौरवही केला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तर गिरणी कामगारांची चळवळ होती, सर्वसामान्यांची होती. त्यामध्ये गिरणी कामगारांच्या जोडीला महिलाही उतरल्या होत्या. त्या वेळी त्या महिलांना संघटित करण्याचे काम सरस्वती काकींनी केले. भायखळ्याच्या चाळीतील त्यांचे घर म्हणजे महिला चळवळीचा अड्डा होता. महिला सत्याग्रहींचे नेतृत्व करताना त्यांना तुरुंगवासही झाला होता. कॉ. बापूराव जगताप यांच्या पत्नी एव्हढीच ओळख न ठेवता त्यांनीही आपले आयुष्य गिरणी कामगारांसाठी वेचले. चळवळीच्या धकाधकीमध्ये काकींनी त्यांचा एक मुलगा गमावला, पण त्याचे दु:ख त्या कुरवाळत बसल्या नाहीत. त्या काळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घरदार सोडून मुंबईतील गिरणी उद्योगात आलेल्या कामगारांना जेवणाखाण्याची व्यवस्था अनेक महिलांनी त्यांच्या घरात केली होती. मात्र कामगारांची नियमित आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे या खानावळीतल्या महिलांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे खासगी सावकारांकडून भरमसाट व्याजाने कर्ज घ्यावे लागत होते. अशा सावकारीच्या विळख्यातून या महिलांना सोडविण्यासाठी सरस्वती काकींनी प्रयत्न केले. कम्युनिस्ट नेते कॉ. डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक कर्मचारी संघटनेचे नेते कॉ. दादा पुरव यांनी एक योजना आखली आणि बँक ऑफ बडोदाच्या मदतीने खानावळवाल्या महिलांची स्वत:ची अन्नपूर्णा महिला मंडळ ही संस्था उभी राहिली. त्याची संपूर्ण आखणी कॉ. प्रेमा पुरव यांनी केली आणि सरस्वती काकी त्याच्या अध्यक्षा झाल्या. खानावळवाल्या महिलांमध्ये या संस्थेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी काकींनी गिरणगाव अक्षरश: पायाखाली घातला. तेथील खासगी सावकारांशी लढा देत त्यांनी संघटना बांधली. तब्बल २५ वर्षे त्यांनी हा कारभार सांभाळला आणि संस्थेच्या सुमारे १० लाखांहून अधिक महिला सदस्या झाल्या. अन्नपूर्णा महिला मंडळाचा कारभार चोख राहिला तो प्रेमाताई आणि सरस्वती काकींच्या सच्चेपणा आणि योग्य नियोजनामुळे. १९७४ मध्ये देशव्यापी रेल्वे संपामध्ये त्यांना तुरुंगवास झाला. संघर्षमय जीवन जगणाऱ्या काकी अखेपर्यंत लाल बावटय़ाशी आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या कार्याशी एकनिष्ठ राहिल्या.