देशाचे माजी हवाईदल प्रमुख प्रदीप नाईक यांच्यानंतर आता नव्याने नियुक्त झालेले नौदलाचे व्हाइस अॅडमिरल किशोर ठाकरे यांच्या निमित्ताने नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ठाकरे कुटुंब मूळचे अमरावती जिल्हय़ातील कारंजाचे. वडील ओंकार ठाकरे यांना आरंभापासून सैनिकी शिक्षणाची आवड. त्यामुळे येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी प्रादेशिक सेनेत नाव नोंदवले. या सेनेत मेजर हुद्दय़ापर्यंत पोहोचलेल्या या प्राध्यापकाने तीन युद्धांत सैन्यदलाला मदत करण्याची कामगिरी प्रभावीपणे बजावली. एनडीएचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या किशोर ठाकरे यांना खरे तर हवाईदलात जायचे होते. त्यांची निवड झाली, पण उंची आड आली. मग त्यांनी नौदलाची सेवा स्वीकारली. लोणावळ्याचे आयएनएस शिवाजी, वेलिंग्टनचे संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय व सिकंदराबादच्या संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ठाकरे १९७९ मध्ये नौदलात मरिन इंजिनीयर ऑफिसर म्हणून रुजू झाले. आपल्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी नौदलाच्या तांत्रिक विभागात अनेकदा उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यासाठी त्यांना २००६ मध्ये नौसेना पदकाने, तर २०१३ ला अतिविशिष्ट सेवा पदकाने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले.
नौदलात सर्वोत्तम अभियंता म्हणून ओळखले जाणारे ठाकरे २००८ मध्ये देशात प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्सचे अध्यक्षही होते. सध्या नौदलाच्या आरमारी उपयोगाच्या जहाजबांधणी विभागाचे प्रमुख म्हणून काम करणारे ठाकरे पाणबुडीतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. नौदलाच्या पी-७५ या प्रसिद्ध पाणबुडी कार्यक्रमाचे ते महासंचालक होते. परदेशी बनावटीच्या पाणबुडय़ा हाताळण्याचे खास प्रशिक्षण त्यांनी घेतले असून यासाठी ते काही काळ जर्मनीत वास्तव्याला होते. जर्मनीची एसएसके पाणबुडी व नंतर संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या पाणबुडीचे प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. नौदलाच्या तांत्रिक सेवेतील अधिकाऱ्यांसाठी व्हाइस अॅडमिरल हे सर्वोच्च पद असते. या पदावर विराजमान झालेले ठाकरे हे सातारा सैनिकी शाळेचे पहिलेच विद्यार्थी आहेत. विदर्भाच्या सहकार चळवळीतील दिवंगत बाबासाहेब केदार यांचे जावई असलेले ठाकरे निवृत्तीनंतर तरुणांमध्ये सैन्यदलाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2015 रोजी प्रकाशित
किशोर ठाकरे
ठाकरे कुटुंब मूळचे अमरावती जिल्हय़ातील कारंजाचे.
Written by रत्नाकर पवार

First published on: 05-12-2015 at 00:40 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishor thakre profile