लेखक, उत्तम संघटक व दलित स्त्रीवादी आंदोलनाच्या नेत्या अशी बहुविध ओळख असलेल्या रजनी तिलक या महिलांसाठी तारणहार होत्या. त्यांनी धार्मिक व पितृसत्ताक अवडंबरे झुगारून देताना जातिअंताच्या लढाईसाठी निर्णायक आंदोलन छेडले.  त्यांचे ‘अपनी जमीं अपना आसमां’ हे आत्मचरित्र बंडखोर शैलीने प्रशंसेस पात्र ठरले. उत्तर भारतीय दलित महिलांवरील अत्याचाराचे अनुभव त्यांनी प्रभावीपणे लेखणी व वाणीतून मांडले. ‘बेस्ट ऑफ करवा चौथ’ हा त्यांचा नवा कथासंग्रह असाच वाचनीय व विचारांना प्रेरणा देणारा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पितृसत्ताक पद्धतींविरुद्ध त्यांनी लढा दिला, शिवाय जातिवादालाही हादरे दिले. ‘पदचाप’ व ‘हवा सी बेचैन युवतियाँ’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह बरेच गाजले. त्यातून प्रत्येक वेळी नवी जोखीम घेण्याची त्यांची तयारी दिसून आली. सफाई कामगारांसाठी त्यांनी दिल्ली व बाहेरच्या राज्यातही मोठे काम केले होते. त्यांचा जन्म दिल्लीत एका गरीब शिंपी कुटुंबात झाला. रजनी यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे ती खंत अखेपर्यंत त्यांच्या मनात राहिली. कुटुंबाच्या मदतीसाठी त्यांनी माध्यमिक परीक्षेनंतर टेलरिंग व स्टेनोग्राफी शिकून घेतले. त्यातून त्या कुटुंबाला मदत करीत असत. संघटनात्मक अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यातून त्या दलित आंदोलन व दलित महिला आंदोलन यांच्यातील दुवा बनल्या.बामसेफ, दलित पँथर, अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी युनियन, आव्हान थिएटर, नॅशनल फेडरेशन ऑफ दलित विमेन, वर्ल्ड डिगनिटी फोरम, दलित लेखक संघ, राष्ट्रीय दलित महिला आंदोलन या  संस्थांशी त्या निगडित होत्या. सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह दलित मीडिया या संस्थेच्या त्या कार्यकारी संचालक होत्या. अभिमूकनायक या वृत्तपत्राचे संपादन त्या करीत असत. ‘आत्मकथा शांता कांबळे’, ‘बुध ने घर क्यो छोडा’, ‘डॉ. आंबेडकर व महिलाए’, ‘दलित मुक्ती नायिकाए- समकालीन दलित महिला लेखन खंड १ व २’ ही त्यांची इतर साहित्यसंपदा. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख उत्तर भारतीयांना करून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.डावी विचारसरणी न पटल्याने त्यांनी अखेर दलित विचारसरणी अनुसरली. भारतीय दलित पँथरबरोबर त्यांनी १९८३ मध्ये नवी संघटना सुरू केली. पुणे येथील दलित महिला परिषदेत त्यांना आंबेडकरी महिला चळवळीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता. पूर्वीची दलित चळवळ ही ब्राह्मणवाद, भांडवलवाद व पुरुषसत्ताक पद्धती यांना लक्ष्य करणारी होती. आता तिचे स्वरूप वेगळे आहे. त्यात शहरी प्रश्न, रोजगार, आरक्षण यांना महत्त्व आहे, त्यातूनच दलितांचे व्यक्तिगत सक्षमीकरण होईल, पण तरी ते मर्यादितच उद्दिष्ट आहे. त्यामुळे दलित चळवळीला सामूहिक नेतृत्वाची गरज आहे असे त्यांना वाटत होते. १९७२ मधील मथुरा बलात्कारकांडात त्यांनी दिल्लीत महिलांचे आंदोलन सुरू केले त्या वेळी ‘सहेली’ या संघटनेच्या माध्यमातून त्यांना मोठा अनुभव मिळाला. तेव्हापासून एकामागोमाग एक लढे देताना त्यांनी साहित्यातूनही दलितांच्या वेदनेचा आविष्कार मुखर केला होता. त्यांच्या निधनाने दलित महिलांची सहेली कायमची निघून गेली आहे.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh rajni tilak