मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजेच एन. एस. जी. (नॅशनल सिक्युरिटी गार्ड)ने राबविलेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक टोरॅन्डो’ मोहिमेचे प्रमुख ज्योती कृष्णन ऊर्फ जे. के . दत्त यांच्या निधनाने दहशतवादाच्या विरोधात लढलेला एक चांगला अधिकारी देशाने गमाविला. ७२ वर्षीय दत्त यांना करोनाची बाधा झाली होती व त्यातूनच झालेल्या गुंतागुंतीत त्यांचा मृत्यू झाला. १९७१च्या पश्चिम बंगाल तुकडीतील भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी दत्त हे स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी मुलाखतींमधून गृहमंत्रालयाचा ढिसाळ कारभार, मुंबई पोलीस दलातील त्रुटी यावर बोट ठेवले होते. त्याबद्दल वादही झाला होता. दहशतवादी हल्ल्यानंतर एन. एस. जी. कमांडोंना मुंबईला पाठविण्याचा निर्णय झाला तेव्हा या पथकाचे प्रमुख असलेल्या दत्त यांनी मोहिमेचे नेतृत्व केले होते. २६ नोव्हेंबरला रात्री दहशतवादी हल्ला झाला आणि २९ तारखेला सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्या तीन दिवसांत दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहीम लवकर संपवावी म्हणून दत्त यांच्यावर बराच दबाव आणला गेला होता. पण ताज व ट्रायडन्ट हॉटेलमधील दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या साऱ्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढणे महत्त्वाचे असल्याने घाई करता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच दहशतवाद्यांचा बीमोड करण्याकरिता रासायनिक अस्त्रांचा (गॅस) वापर करण्याची सूचना त्यांनी फेटाळून लावली होती. त्यातून हॉटेलमध्ये अडकलेल्यांचा नाहक जीव जाईल अशी त्यांची ठाम भूमिका होती. बळाचा अधिक वापर करा, असे सुचविणाऱ्या महाराष्ट्र सरकारमधील एका तत्कालीन मंत्र्यांस दत्त यांनी तेव्हा भर बैठकीत चांगलेच सुनावले होते. छाबाद हाऊसमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्याकरिता कमांडोंना तेथे पोहोचणे अशक्य होते. तेव्हा हेलिकॉप्टरमधून कमांडोंना इमारतीत उतरविण्याचा धोका त्यांनी पत्करला होता. एन. एस. जी. पथकाला मुंबईत जाण्याचा आदेश दिल्यावर २०० जणांना पुरेसे विमान तीन तास उपलब्ध झाले नसल्याबद्दल त्यांनी ही मोहीम पार पडताच जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती व १२० जणांसाठीचे विमान देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कारभारावर कोरडे ओढले होते. दहापेक्षा अधिक दहशतवादी या हल्ल्यात सहभागी असावेत हा दत्त यांचा दावा होता. दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाईत यशस्वी झालेला हा अधिकारी करोनाच्या विरोधातील लढाईत मात्र हरला.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2021 रोजी प्रकाशित
जे. के. दत्त
दहशतवाद्यांचा बीमोड करण्याकरिता रासायनिक अस्त्रांचा (गॅस) वापर करण्याची सूचना त्यांनी फेटाळून लावली होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-05-2021 at 00:03 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile j k dutt akp