जन्म क्षणभंगूर आहे, अर्थात कोणत्या क्षणी जीवनाचा सारा खेळ अर्धवट टाकून जावं लागेल, हे सांगता येत नाही. याची जाणीव झाली तर जगण्याचं खरं मोल उमगेल. मग जगणं अधिक अर्थपूर्ण होऊ लागेल. मग ‘देवा तुझा मी सोनार’ अभंगातल्या अखेरच्या चरणाप्रमाणे ‘नरहरी सोनार हरीचा दास। भजन करी रात्रंदिवस।।’ ही स्थिती होईल, असं हृदयेंद्र म्हणाला.

योगेंद्र – पण हे भजन म्हणजे नेमकं काय असावं?
दादासाहेब – हे पहा.. एका अभंगात नरहरी महाराज म्हणतात, ‘‘नाशिवंत देह मनाचा निश्चय। सद्गुरुचे पाय हृदयीं असो।। कलीमध्ये फार सद्गुरू हा थोर। नामाचा उच्चार मुखी असो।। भजनाचा गजर नामाचा उच्चार। हृदयीं निरंतर नरहरीचें।।’’ दयाशी चर्चा व्हायची तेव्हा त्यानं ‘एकनाथी भागवता’तून या भजनाचा दाखला दिला होता.. माझं सर्व जगणं हे परमेश्वराच्या इच्छेनं सुरू आहे, असं मानून सारा प्रपंच त्याचा आहे, याची जाणीव ठेवून त्याच्या स्मरणात सर्व व्यवहार करणं, याला नाथांनी मुख्य भजन म्हटलं आहे.. दया म्हणे की परमेश्वराचं स्मरण ठेवायचा मार्ग सद्गुरुंमुळेच सोपा झाला आहे. सद्गुरू सदोदित परमेश्वरात निमग्न असतात. त्यामुळे त्यांचं स्मरण हे परमेश्वराचंच स्मरण आहे.. दयाच्या सांगण्याचा आशय या अभंगाशी मिळतोय पहा..
हृदयेंद्र – अगदी खरं आहे दादासाहेब.. सद्गुरुचे पाय म्हणजे त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांच्या बोधानुरूप चालणं हे हृदयात उतरलं पाहिजे.. आणि चरणाचा पूर्वार्धच किती मार्मिक आहे पहा.. नाशिवंत देह मनाचा निश्चय! किती खरं आहे.. देह नाशिवंत आहेच, पण तो निश्चयही नाही करू शकत! निश्चय मनच करतं! उपवास करायचा निश्चय देह नव्हे, मन करतं. मंदिरात जायचं की कुटाळक्या करायला जायचं, याचा निर्णय देह नाही, मनच करतं. तेव्हा सद्गुरुंचे पाय हृदयी धरायच्या आड देह नाही, मनच येऊ शकतं. तर आपला देह नाशिवंत आहे, हे ओळखून.. म्हणजेच या देहाचा संग, या जीवनाची संधी फार थोडी आहे, हे ओळखून शाश्वताच्या संगाचा निश्चय करायचा की अशाश्वताच्या संगाचा निश्चय करायचा, हे मनालाच ठरवायचं आहे..
योगेंद्र – आता पुढे यात म्हटलंय की, कलीमध्ये फार सद्गुरू हा थोर। नामाचा उच्चार मुखी असो।। दादासाहेब माझ्या माहितीप्रमाणे नरहरी महारााजांचे गुरू गैबीनाथ हे योगमार्गीच होते.. मग त्यांनी काय नाम दिलं होतं का?
हृदयेंद्र – आता ज्ञानेश्वर महाराजही योगमार्गीच होते, पण ‘हरिपाठा’त त्यांनी नामाचीच किती महती गायली आहे.. पण ते असो, मी काय म्हणतो.. आपलं जगणं आपल्याच नावानं भरून गेलंय ना? मी असा आहे, मी तसा आहे, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी होतो म्हणून, मी नव्हतो म्हणून.. किती मीपणानं सारं व्यापलंय.. आपल्या नावाशी आपण किती तन्मय असतो.. ही स्वनामगोडीच परमात्म्याच्या नामस्मरणाच्या आड येत असते! नाम म्हणजे ‘मी’ नाही, याचंच स्मरण का मानू नये?
ज्ञानेंद्र – पण निसर्गदत्त महाराजांच्या बोधाचा पायाच ‘मी आहे’ची जाणीव जागृत ठेवणं हाच तर आहे..
हृदयेंद्र – पण तो ‘मी’ म्हणजे देहनाम किंवा व्यक्तिनाम नव्हे! ‘स्व’ला जाणल्याशिवाय खरी स्वस्थता नाही, हाच तर त्यांच्या बोधाचा पाया आहे.. मी खरा कोण आहे, हे जाणून घेण्यासाठीचा आणि जाणल्यानंतरचा तो ‘मी आहे’चा बोध आहे..
ज्ञानेंद्र – हो हाही मुद्दा बरोबरच आहे.. पण जे नामस्मरण मानत नाहीत त्यांना या अभंगाचा उपयोग नाही..
हृदयेंद्र – पण, एकनाथी भागवतातला भजनाचा अर्थ लक्षात घेतला तर ‘भजनाचा गजर नामाचा उच्चार। हृदयीं निरंतर नरहरीचें।।’ या चरणाचा अर्थ लागतो की! ही दुनिया, हा प्रपंच माझा नाही..
कर्मेद्र – कसा काय माझा नाही?
हृदयेंद्र – या दुनियेत, या प्रपंचात आपण जन्मलो फक्त आहोत! आपल्या जन्माआधी आणि मृत्यूनंतरही ही दुनिया, हा प्रपंच असाच राहाणार आहे! मग जो माझा नाही तो माझेपणानं करण्याचा अट्टहास का? त्या माझेपणातूनच अहंकार, मद, मत्सर, क्रोधाच्या साखळीत मी अडकतो आहे. हा आत्मघातच आहे. तेव्हा हे माझं नाही, त्या जीवनशक्तीचं आहे, या जाणिवेचा अंतरंगात अखंड गजर हेच खरं भजन!