पाकिस्तानविरुद्ध निसटत्या पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघासमोर आता बलाढय़ इंग्लंडचे आव्हान असणार आहे. पावसाळी हवामान असलेल्या दिल्लीतून भारतीय संघ हिमवृष्टी होत असलेल्या धरमशालात दाखल झाला आहे. वातावरणातल्या बदलाशी जुळवून घेत भारतीय संघाला इंग्लंडला टक्कर द्यायची आहे.
युवा स्मृती मंधानाने गेल्या वर्षभरात दिमाखदार कामगिरी केली आहे. मात्र विश्वचषकात तिला सूर गवसलेला नाही. इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी ती आतुर आहे. कर्णधार मिताली राजवर नेतृत्व आणि फलंदाजीची धुरा आहे. वेदा कृष्णमूर्ती आणि वनिता यांना मोठी खेळी करावी लागणार आहे. वेगवान खेळीसाठी प्रसिद्ध हरमनप्रीत कौरवर भारतीय संघाची भिस्त आहे. अष्टपैलू अनुजा पाटील संघासाठी जमेची बाजू आहे. पाकिस्तानविरुद्ध भारतीय फलंदाजी ढेपाळली होती.
धरमशालाच्या गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर सन्मानजनक खेळ करण्याचे आव्हान फलंदाजांवर असणार आहे. झुलन गोस्वामीवर गोलंदाजी विभागाची जबाबदारी आहे. शिखा पांडे व पूनम यादव यांनी तिला साथ देण्याची गरज आहे. इंग्लंडची मदार कर्णधार चार्लट एडवर्ड्सवर आहे.
भारत वि.  इंग्लंड
(महिला क्रिकेट)
* स्थळ : हिमाचलप्रदेश क्रिकेट स्टेडियम, धरमशाला
* वेळ : दुपारी ३.०० पासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२
संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), झुलन गोस्वामी, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, थिरुश कामिनी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मंधाना, निरंजना नागार्जन, शिखा पांडे, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, वेलास्वामी वनिता, सुशमा वर्मा, पूनम यादव.
इंग्लंड : चार्लट एडवर्ड्स (कर्णधार), टॅमी ब्युमाऊंट, कॅथरीन ब्रँट, जॉर्जिआ एलविस, नताशा फराँट, लीडिया ग्रीनवे, रेबेका ग्रुन्डी, जेनी गन, डॅनिएल हेझेल, अ‍ॅमी जोन्स, हिदर नाइट, नताली शिव्हर, अन्या श्रुसबोले, सारा टेलर, डॅनियएल व्हाट.