विदेशी प्रजातीच्या झाडांच्या हानीचे प्रमाण अधिक

ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे एकटय़ा ठाणे शहरात तीन दिवसांत २३६ वृक्ष भुईसपाट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातील अंदाजे ७० ते ८० टक्के वृक्ष विदेशी जातीचे आहेत. यातील बहुतांश वृक्ष रस्त्याकडेला उभी असलेली वाहने, घरे, इमारतींच्या संरक्षण भिंती, विजेच्या तारा यावर पडली. या वाहनांचे तसेच इतर मालमत्तांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शहरात विदेशी झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसाने दाणादाण उडाली. १७ ते १९ मे या तीन दिवसांच्या कालावधीत ठाणे शहरात २३६ वृक्ष भुईसपाट झाल्याची अधिकृत नोंद आहे. यामध्ये अंदाजे ७० ते ८० टक्के वृक्ष हे विदेशी प्रजातीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वाधिक पडझड झालेल्या विदेशी वृक्षांमध्ये पर्जन्य वृक्ष, सोनमोहर, गुलमोहर यांसारख्या वृक्षांचा सामावेश आहे. ठाणे शहरात १९ ठिकाणी घरे, संरक्षण भिंती, विद्युत खांब यांवर वृक्ष पडून मोठे नुकसान झाले आहे. तर १० ठिकाणी वाहनांवर वृक्ष पडून वाहनांचा चुराडा झाला आहे. यामध्ये आठ महागडय़ा कार आणि दोन रिक्षांचा सामावेश आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात अशाच पद्धतीने डॉ. रितेश गायकवाड यांच्या कारवर सोनमोहरचे भलेमोठे वृक्ष कोसळून त्यांच्या कारचा चुराडा झाला आहे. सुदैवाने त्यांना या घटनेत जास्त दुखापत झाली नाही. शहरात सुरू असलेले काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण यामुळे विदेशी वृक्षांची पडझड होऊ लागली आहे. हे वृक्ष देशी वृक्षांच्या तुलनेत ठिसूळ झाले आहेत, असे वनस्पतीशास्त्र अभ्यासक चित्रा म्हस्के यांनी सांगितले.

ठाण्यात विदेशी वृक्षांची पूर्वीच लागवड झाली होती, मात्र आता आम्ही रस्त्याकडेला देशी वृक्षांची लागवड करत आहोत.

– अल्का खैरे, वृक्ष प्राधिकरण अधिकारी, ठाणे महापालिका

ठाण्यातील विविध ठिकाणच्या रस्त्याकडेला विदेशी वृक्ष मोठय़ा प्रमाणात आहेत. तसेच या वृक्षांना काँक्रीटीकरणाने वेढलेले आहे. शहरातील अनेक भागांत एकाच पद्धतीच्या वृक्षांचीही लागवड झालेली आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळेही झाडे पडतात. तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे अद्याप रस्त्याकडेला, पदपथांवर वृक्ष पडून आहे. आमचे पथकही महापालिकेला वृक्ष बाजूला सारण्यास मदत करत आहे. आता पडझड झालेल्या वृक्षांच्या जागी देशी वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. 

– रोहित जोशी, पर्यावरणप्रेमी