ठाणे ते मुंब्रा, दिवा येथील प्रवाशांसाठी विशेष बससेवा

ठाणे : मध्य रेल्वेच्या कळवा ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी रविवारी मध्यरात्री २ ते सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कळवा-मुंब्रा तसेच ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर उपनगरीय रेल्वे थांबणार नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेच्या टीएमटी परिवहन सेवेने ठाणे ते मुंब्रा, दिवापर्यंत ६५० हून अधिक बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. 

ठाणे ते दिवा बससेवा

ठाणे येथील चेंदणी कोळीवाडा येथून दिव्याला जाण्यासाठी रविवारी पहाटे ५ वाजता पहिली बस उपलब्ध असेल. तर रात्री ११.३० वाजता शेवटची बस सुटेल. दिव्याहून ठाण्यात येण्यासाठी दिवा स्थानक परिसरात रविवारी सकाळी ६ वाजता बसगाडी उपलब्ध असेल. तर शेवटची बस सोमवारी रात्री १२.३० ला सुटेल. प्रत्येकी १० मिनिटांच्या अंतराने या बसगाड्या सुटणार असून ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे अशा एकूण २०४ फेऱ्या या मार्गावर होतील.

ठाणे ते मुंब्रा बससेवा

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून मुंब्रा येथील पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यासाठी बसेस उपलब्ध होतील. ठाणे रेल्वे स्थानक येथून रविवारी पहाटे ५ वाजता पहिली बस सुटेल. तसेच सोमवारी मध्यरात्री १.३५ मिनिटांनी शेवटची बस सुटेल. तर मुंब्रा पोलीस ठाणे ते ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने येण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाणे येथून रविवारी ५.४५ मिनिटांनी पहिली बसगाडी सुटेल. शेवटची बसगाडी सोमवारी मध्यरात्री २.२५ वाजता सुटेल. प्रत्येक १५ ते २० मिनिटांनी बसगाडीची ही सुविधा उपलब्ध असेल. या मार्गावर ठाणे स्थानक ते मुंब्रा पोलीस ठाणे आणि मुंब्रा पोलीस ठाणे ते ठाणे स्थानक अशा एकूण ४६० फेऱ्या होतील.