शहापूर : शहापूर तालुक्यातील चक्कीचापाडा येथील २५ हुन अधिक रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली असल्याचे प्रकार गुरूवारी उघडकीस आला. ग्रामस्थांना उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी अघई आणि शहापुर उपजिल्हारुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी चक्कीचापाडा येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा त्रास झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने पाण्याचे नमुने तपासणीसाठी शहापुर आणि ठाणे जिल्हारुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

शहापुर तालुक्यातील अघई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चक्कीचा पाडा येतो. या ठिकाणी आदिवासी नागरिकांची २३ घरे आहेत. तेथील ग्रामस्थांना गेल्या दोन दिवसांपासून पोटदुखीचा तसेच अचानक उलट्या आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला. यामध्ये बहुतांशी महिला होत्या. त्यांनी अघई प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली असता गॅस्ट्रोची लागण झाल्याचे उघडकीस आले. रूग्णांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. तर, प्रकृती गंभीर असलेल्या १० रुग्णांना शहापुरच्या उपजिल्हारुग्णालयात दाखल केले. तेथील रुग्णांना उलट्या अतिसाराचा त्रास होऊ लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक आरोग्य पथक घटनास्थळी दाखल करण्यात आले.

रुग्णांवर आवश्यक उपचार सुरू असल्याचे तसेच पाड्यातील काही लहान मुलांवर देखील प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, चक्कीचापाडा येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी शहापुर आणि ठाणे जिल्हारुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.