डोंबिवली : २७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य ; कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्याने धरणातील पाणी साठा वाढला आहे.

डोंबिवली : २७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य ; कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
( कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण )

बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्याने धरणातील पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे या साठ्यातील मुबलक पाणी २७ गावांना मिळाले पाहिजे. या गावांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळाले पाहिजे यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत, असे डोंबिवली विधानसभा भाजप आमदार, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे सांगितले.

कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर आ. चव्हाण यांचे शहरातील विविध संस्था, भाजप पक्ष पदाधिकाऱ्यांनी सत्कार समारंभ आयोजित केले आहेत. भोपर येथील भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी मंत्री चव्हाण बोलत होते.

२७ गाव परिसराची लोकवस्ती वाढत आहे. नवीन गृहसंकुले या भागात उभी राहत आहेत. या परिसराचे नागरीकरण झाले आहे. नवीन वसाहतींना पाणी आणि मूळ गावांना पाणी नाही ही परिस्थिती यापुढे सहन केली जाणार नाही. यासाठी या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वता शासन स्तरावर प्रयत्न करणार आहोत, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

सागाव, देसलेपाडा, नांदिवली भागाचा पाणी प्रश्न अधिकच बिकट आहे. या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी पालिका, एमआयडीसीकडे जावे लागते. या भागातील रहिवाशांचा पाण्याचा त्रास कमी केला जाईल. या भागाला त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी आपण स्वत एमआयडीसीकडे पाठपुरावा करणार आहोत. २७ गावांना १०५ दशलक्ष पाणी पुरवठा मंजूर आहे. या गावांना प्रत्यक्षात ६० दशलक्ष पाणी पुरवठा केला जातो. या गावांचा उर्वरित पाणी पुरवठा या गावांनाच देण्यात यावा, अशी मागणी आपण शासनाकडे करुन तो पाणी पुरवठा मंजूर करुन घेऊ, असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 27 first priority to solve village water problem cabinet minister ravindra chavan amy

Next Story
ठाणे : कौटुंबिक वादातून तरुणाने घेतली खाडीत उडी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी