डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा बहुतांश भाग डोबिवलीमध्ये येतो. मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांच्यानंतर प्रमुख शहरांमध्ये डोंबिवलीचा समावेश होतो. हे शहर पश्चिमेकडून चोळेगांव, पूर्वेकडून आयरेगाव, दक्षिणेकडून पाथर्ली आणि उत्तरेकडून ठाकुर्ली या गावांनी वेढलेले आहे. डोंबिवलीचा इतिहास फार जुना आहे. इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. या ठिकाणी राहणारे मूळ निवासी ‘डोंब’ लोक होते आणि त्यांच्यावरुन या ठिकाणाला डोबिवली असे नाव पडले असे मानले जाते.
सुरुवातीला डोंबिवलीला शहराचे स्वरुप मिळाल्यावर तेथे नगरपालिका तयार करण्यात आली. पुढे ऑक्टोबर १९८३ मध्ये कल्याण आणि डोबिंवली दोन्ही शहरांची मिळून एकच महानगरपालिका स्थापन केली गेली. मुंबईतून मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक डोंबिवलीमध्ये वास्तव्याला गेले. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. डोंबिवलीची ओळख असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला १९९९ मध्ये सुरुवात झाली.
डोंबिवली शहराच्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. लोकसंख्येचा विचार करायला गेल्यास डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. हे शहर मुंबई लोकलसाठीही महत्त्वपूर्ण आहे. मुंबईतील बहुतांश नोकरदार वर्ग हा या शहरात वास्तव्याला असल्याने एका प्रकारे हे शहर आर्थिक राजधानी पाठबळ पुरवते असे म्हणता येईल.