ठाणे : ठाणे येथील मुंब्रा परिसरात गुरुवारी सकाळी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगा मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत तिरंगा झेंडा आणि महापुरुषांच्या पोस्टरसोबतच टिपू सुलतानचे पोस्टर दिसून आले. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात लावण्यात आलेले टिपू सुलतानचे पोस्टर पालिका प्रशासनाने काढून टाकले होते.
मुंब्रा शहरात दोन दिवसांपूर्वी टिपू सुलतानचे पोस्टर लावण्यात आलेले होते. हे पोस्टर पालिका प्रशासनाने काढून टाकले होते. हा विषय चर्चेत असतानाच, गुरुवारी सकाळी मुंब्रा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त निघालेली तिरंगा मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगा मिरवणूक काढली होती. मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा अशी ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते. या मिरवणुकीत दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तींच्या हातात तिरंगा झेंडे आणि अनेक महापुरुषांचे पोस्टर होते. यामध्ये टिपू सुलतानच्या पोस्टरचाही समावेश होता.
हेही वाचा – डोंबिवली, कल्याणमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीतून सव्वा कोटीची फसवणूक
हेही वाचा – कल्याणमध्ये आवडीचे जेवण करत नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात कढई मारली
दुचाकीस्वार मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील झाले होते आणि या मिरवणुकीमुळे रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. यावरून वाहतूक पोलीस आणि आयोजकांमध्ये वाद झाला. परंतु काही वेळातच पोलिसांनी आयोजकांची समजूत काढून मिरवणुकीला पुढे सोडले.
© The Indian Express (P) Ltd