ठाणे – शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात मागील दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने ठाण्यात ‘ऑल-गर्ल्स लाइव्हलीहूड सेंटर’ स्थापन करण्यात आले. एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत या उपक्रमांतर्गत ६५६ तरुणींना रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले असून यातील तब्बल ८० टक्के तरुणींना विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

मॅजिक बस संस्था १९९९ पासून कार्यरत आहे. देशातील २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १२ ते २५ वयोगटातील तरुणांना सक्षम करण्याचे काम ही संस्था करते. या संस्थे अंतर्गत किशोरवयीन आणि उपजिविकेचे साधन शोधणाऱ्या तरूणांसाठी विशेष उपक्रम राबवले जातात. यामध्ये ५९ टक्के तरुणींचा सहभाग आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून शहरी भागासह ग्रामीण भागातील महिलांना नेतृत्व आणि व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम ठाण्यात सुरू असून यामध्ये कळवा, मुंब्रा आणि दिघा परिसरातील तरूणींचा सहभाग आहे. दररोज लाइवलीहुड्स उपक्रमाच्या तीन बॅच सुरू असतात. त्यामध्ये प्रत्येकी २५ ते ३० तरूणींचा समावेश आहे. या तरूणींना संवाद, आत्मजागरूकता, इंग्रजी, डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण दोन महिन्यांचे असते. त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्य करण्यात येते. या उपक्रमातून नोकरी मिळवणाऱ्या अनेक तरुणी त्यांच्या कुटुंबातील पहिल्या कमावत्या सदस्य आहेत. या माध्यमातून त्या स्वतःच्या कुटुंबाला आधार देतात. ठाणे परिसरातील ६५६ तरुणींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले असून ८० टक्के तरूणी विविध क्षे६ात नोकरी करत असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

मॅजिक बस संस्थेमध्ये तरुण महिलांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी, त्यांच्या समुदायात बदल घडवण्यासाठी सक्षम करत आहोत. ठाणे ऑल-गर्ल्स लाइव्हलीहूड सेंटरमध्ये दोन वर्षात जीवन आणि रोजगार कौशल्यांनी या तरुण महिलांचे जीवन बदलले आहे. ६५६ तरुणींना प्रशिक्षित करून, त्यापैकी ८० टक्के महिलांना स्थिर नोकऱ्यांमध्ये स्थान मिळवून दिले आहे. ज्यापैकी अनेकजणी त्यांच्या कुटुंबातील पहिल्या नोकरी करणारी महिला आहेत. – अरुण नलावड़ी, कार्यकारी संचालक, लाइवलीहुड्स, मैजिक बस इंडिया फाउंडेशन