पंधरा दिवसांत काम सुरू; राष्ट्रवादीमुळे प्रकल्प रखडल्याचा महापौरांचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सॅटीस प्रकल्पाच्या मार्गिका उभारणीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असून त्यापाठोपाठ आता या प्रकल्पातील महत्त्वाचे काम मानल्या जाणाऱ्या स्थानक परिसरातील डेकच्या उभारणीचे काम येत्या १५ दिवसांत हाती घेतले जाणार आहे. या कामात अडसर ठरत असलेली १२ घरे आणि ११ टपऱ्या हटविण्याबरोबरच ३८ वृक्ष पुनरेपण करण्याची कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने शुक्रवारच्या बैठकीत घेतला आला.

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी सॅटीस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून त्याचधर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सॅटीस -२ प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. २७० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. आतापर्यंत ४० टक्के प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. टाळेबंदीच्या काळात या प्रकल्पाचे काम बंद झाले होते. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर प्रकल्पाचे काम सुरू झाले असले तरी ते संथगतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी एक बैठक घेऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीला स्मार्ट सिटी लिमिटडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, प्रभारी उपायुक्त शंकर पाटोळे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे स्थानक परिसरात सॅटीसच्या डेकच्या उभारणीचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार होते. परंत आता एकाच टप्प्यात हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामात मंगला शाळेजवळील शिवसेना शाखेसह ६ घरे, ठाणे पूर्व रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १० लगत असलेली ६ घरे, वाहनतळाच्या जागेत असलेल्या ११ टपऱ्या तसेच रेल्वेच्या पादचारी पुलाखालील टपऱ्याही बाधित होत आहेत. या सर्व बाधितांचे एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील घरांमध्ये पुनर्वसन करून ती बांधकामे हटविण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले. तसेच या कामात ३८ जुने वृक्ष बाधित होत असून त्याचे पुनरेपण करण्याचेही आदेश त्यांनी दिले.

 ‘राष्ट्रवादीमुळे प्रकल्प रखडला’

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सॅटीस- २ प्रकल्पाच्या डेकच्या उभारणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावावर विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव पुढे पाठविता येत नव्हता. अखेर माझ्या स्वाक्षरीचा हा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे पाठविला आणि त्यांनी त्यास तात्काळ मंजुरी दिली, असा आरोप महापौर म्हस्के यांनी केला. तसेच प्रकल्पाची पाहाणी करत फोटो काढण्याऐवजी प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी बैठक घेतल्याचे सांगत त्यांनी भाजपलाही टोला लगावला.

सॅटीसची रचना अशी..

ठाणे पूर्व सॅटीस डेक एकूण १४.५९ मीटर लांबीचा असणार आहे. त्याची उंची ९ मीटर इतकी असणार आहे. त्यात ४.५० मीटरचा पोटमाळा असणार आहे. पुलाखालून लहान वाहने जाणारा आहेत. पुलाच्या पोटमाळय़ावर  रेल्वेचा विश्रांती कक्ष असणार आहे. तर, पुलाच्या वरती  टीएमटी बस, खासगी कंपन्यांच्या बसचा थांबा असणार आहे. शौचालये, फुड कोर्ट असणार आहे. याशिवाय, याठिकाणी रेल्वेची आठमजली इमारत असणार आहे. या पुलामुळे ठाणे पूर्व व पश्चिम भागातील वाहतुकीवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

गुन्हे दाखल करा

सॅटीस प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वीही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पात अडसर ठरत असलेल्या बेकायदा बांधकामातील बाधितांचे पुनर्वसन करण्याचे आदेश महापौर म्हस्के यांनी दिले होते. दरम्यान, याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून वेगाने कारवाई सुरू नसल्याचे शुक्रवारच्या बैठकीत समोर येताच महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. टपऱ्या आणि बांधकामे हटविण्यासाठी विरोध होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी यावेळी केला. त्यावर या कामात अडथळे आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेश म्हस्के यांनी दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acceleration satis project traffic jams ysh
First published on: 22-01-2022 at 00:02 IST