आसीम गुप्ता यांच्या दीड वर्षांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये बोकाळलेल्या अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणांविरोधात विद्यमान आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जोरदार कारवाई सुरू केली असून महिनाभरात जवळपास ५५०० फरीवाल्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालविण्यात आली आहे.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथ फेरीवाला मुक्त करा, असे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत. त्यामुळे या तीनही स्थानकांबाहेर अतिक्रमण विरोधी पथकाची विशेष गस्त मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेनंतरही ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीस पुलावर पुन्हा एकदा फेरीवाले बसू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी शहरातील फेरिवाले तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात वेगवेगळ्या मोहिमा हाती घेतल्या होत्या. मात्र, त्यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी आलेले असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात शहरातील फेरीवाला आणि अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष झाले होते. शहराची मुख्य वाहीनी असलेल्या गोखले रोडवरील पदपथ तसेच सॅटीस पुलावर फेरिवाल्यांनी अतिक्रमण केले होते. खाद्य पदार्थ, भाजी तसेच अन्य साहित्य विक्रेत्यांनी पदपथ गिळंकृत केले होते. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानाबाहेरील पदपथावर साहित्य ठेवून अतिक्रमण केले होते. यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे कठीण झाले होते. तसेच पद नियुक्ती, नेत्यांचे वाढदिवस तसेच वेगवेगळ्या कार्यक्रम या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावून शहराचे विद्रूपीकरण करण्यात येते. याशिवाय, लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही शहरात अनधिकृत बांधकामे सुरू होती. याच पाश्र्वभूमीवर जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे, पोस्टर्स आणि फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले होते. महिनाभरापूर्वी आयुक्त जयस्वाल यांनी सॅटीस पुलावर पाहाणी दौरा करून फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. मात्र, या कारवाईनंतरही फेरिवाले पुन्हा सॅटीसवर परतल्याचे चित्र आहे.
महिनाभरातील कारवाई
ठाणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांतर्गत शहरातील वेगवेगळ्या भागात अनधिकृत बांधकामे, पोस्टर्स आणि फेरिवाल्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मुंब्रा परिसरात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. मुंब्रा परिसरात ११९७, कळवा परिसरात ३११, वर्तकनगर परिसरात ५१७, माजिवाडा-मानपाडा परिसरात ९४७, उथळसर परिसरात ७६, लोकमान्य-सावरकरनगर परिसरात २२४, नौपाडा परिसरात १०८४ आणि कोपरी परिसरात ३०३, अशी अनधिकृत बांधकामे, पोस्टर्स आणि फेरिवाल्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये २७६ अनधिकृत बांधकामे, २३१२ हातगाडय़ा आणि २८०४ पोस्टर्सविरोधात कारवाई करण्यात आली आहे.