अग्निशमन परवान्याबाबत आजपासून शोधमोहीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरातील ज्या हॉटेल व्यावसायिकांकडे अग्निशमन विभागाचा परवाना नाही अशा आस्थापनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी दिले. बेकायदा बांधकामांमध्ये सुरू असलेल्या बार तसेच हॉटेलांना अग्निशमन विभागामार्फत असा परवाना दिला जात नाही. त्यामुळे आयुक्तांच्या या आदेशामुळे बेकायदा इमारतींमध्ये सुरू असलेल्या शहरातील शेकडो हॉटेलांवर गंडांतर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ही कारवाई करत असताना महापालिका क्षेत्रातील हुक्का पार्लर्सना अग्निशमन परवाने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ठाण्यातील ग्लॅडी अल्वारीस मार्गालगत असलेल्या कोठारी कंपाउंड परिसरात महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे पब आणि हुक्का पार्लर सुरू असल्याचे प्रकरण मध्यंतरी उघडकीस आले होते. या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने युवक, युवतींचा वावर असताना अग्निशमन विभागाचे नियमही पबमालक पायदळी तुडवत असल्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणले होते. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या बेकायदा पब तसेच हॉटेलांवर कारवाईचे आदेश आठवडाभरापूर्वी दिले होते. मात्र, हे आदेश पाळले गेले नसल्याने बुधवारी आयोजित करण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौरांनी तहकूब केली. तसेच प्रशासनावर तोंडसुख घेतले.

कोठारी कंपाउंडमधील अनधिकृत हॉटेलांचा मुद्दा चांगलाच तापला असताना आयुक्त जयस्वाल यांनी तातडीने अतिक्रमण तसेच अग्निशमन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत जयस्वाल यांनी कोठारी कंपाउंडसह शहरातील सर्वच हॉटेलांचे अग्निशमन परवाने तपासा आणि ज्यांच्याकडे अशी परवानगी नसेल त्यावर तातडीने कारवाई करा, असे आदेश दिले. ठाणे शहरात बेकायदा इमारतींची संख्या मोठी असून या ठिकाणी तळ तसेच पहिल्या मजल्यावर बार तसेच रेस्टॉरंट मोठय़ा संख्येने सुरू आहेत. अग्निशमन विभागाने मध्यंतरी केलेल्या एका सर्वेक्षणात काही बडय़ा हॉटेलांमधील बार तसेच रेस्टॉरंट चालकांनीदेखील अग्निशमन विभागाचे परवाने घेतले नसल्याचे स्पष्ट झाले होते.

हॉटेलमालकांचे धाबे दणाणले

शहरातील ज्या हॉटेल आस्थापनांकडे परवाने नाहीत अशांना सात दिवसांची नोटीस पाठवून परवानगीबाबत उचित कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. दरम्यान, कोठारी कंपाउंड येथील २६ व्यावसायिक गाळेधारकांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटिसा बजाविण्यात आल्या असून १० गाळेधारकांना बेकायदा बांधकामे तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील बहुतांश हॉटेल आणि बार बेकायदा बांधकामांमध्ये सुरू असल्याने त्यांना अग्निशमन विभागाचे परवाने देण्याचा प्रश्नच येत नाही. अशा सगळ्या व्यावसायिकांना नोटिसा बजाविण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली जाणार आहेत. हुक्का पार्लर्सबाबतही असाच निर्णय घेण्यात आला असून उद्यापासूनच यासंबंधी कारवाई सुरू केली जाणार आहे.    शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे महापालिका.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on unauthorized hostel in thane
First published on: 21-09-2017 at 02:19 IST