संतोष रामराव पंडित जाहिरातकार (डिझायनर), सामाजिक कार्यकर्ते
गेले कित्येक वर्षे जाहिरात क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे संतोष पंडित हे वसई तालुक्यातील क्रमांक एकचे जाहिरातकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टचा अभ्यास केला आहे. सध्या ते मोड अॅडव्हर्टाइज अॅण्ड मार्केटिंग या कंपनीत काम करत आहेत. आतापर्यंत त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून विविध स्पर्धामधून त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीची चुणूक दाखवून दिली आहे.
वाचनाची आवड मला लहानपणापासून आहे. घरात वर्तमानपत्रे नियमित येत असल्याने लहानपणापासून वर्तमानपत्रे वाचायची सवय लागली. मग पुढे चित्ररूपी कथा वाचण्याची गोडी निर्माण झाली. खऱ्या अर्थाने पहिले गोष्टीचे पुस्तक माझ्या हातात आले ते म्हणजे श्यामची आई. माझ्या जीवनात पुस्तक हाच आधारस्तंभ राहिलेला आहे. कारण पुस्तक हे शाश्वत मार्गदर्शक आणि मित्र म्हणून आपल्या सोबत कायम राहते. त्यानंतर हळूहळू माझा कल पुस्तके वाचण्याकडे वळला आणि मी वाचण्याचा सपाटा लावला. लेखक सुभाष शिवरकर, गुरुनाथ नाईक, पु. ल. देशपांडे या लेखकांची पुस्तके मला सुरुवातीला वाचायला आवडायची. पुस्तक वाचून झाल्यावर त्या पुस्तकातील काय आवडले किंवा त्या संदर्भात लिहून काढण्याची तसेच त्यातील संदर्भाची नोंद ठेवण्याची, एक बनवण्याची सवय करून घेतली. पुस्तके वाचताना हळूहळू कलेकडे वळलो. कलात्मक पुस्तके वाचण्याचा छंद मी जोपासला. त्यातून मला जाहिरात डिझाइन करण्यास खूप मोठी मदत होते. कलेशी निगडित खूप पुस्तके माझ्या कपाटात आहेत. पण गूढकथा आणि ऐतिहासिक कथा जास्त आहेत.
वाचन हा छंद महागडा आहे. अशा वेळी आपण निश्चितच ग्रंथालयात जाऊन वाचन करतो, नोंदी करतो, पण कित्येकदा असा मोह होतो की हे पुस्तक आपल्याही संग्रही असावीत. अशातूनच आज माझ्याकडे बऱ्याच पुस्तकांचे संकलन आहे. ज्यांनी समाज बदलाच्या दिशेने कार्य करत काही घडविण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आविष्कार कथा समजण्यासाठी समाजससुधारकांची चरित्रे वाचणे आवश्यक आहे असे मला वाटते. मला इतिहासात रमायला आवडते. गूढकथा खूप आवडतात. ययाति, छावा, पानिपत, कर्ण ही माझी सर्वात आवडती पुस्तके. लेखक विश्वास पाटील यांचे ‘पानिपत’, शिवाजी सावंत यांचा ‘छावा’, गणेश बानुगडे ‘बाजिंदा’ ही दोन्ही पुस्तके अगदी माझ्याजवळची. तसेच गूढकथा, ऐतिहासिक कथा, पु. ल. देशपांडे, बटाटय़ाची चाळ हे सर्वात आवडते लेखन. आयुष्यात हास्य हवे. पु. ल. देशपांडे यांचे व्यंगात्मक लिखाण जीवनात जगायला सोपे वाटते. पण मुळात आर्टिस्ट असल्याने व्यक्ती ओळखायला पुरेसे वाटते. महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, महानायक, सोंगाडय़ा ही पुस्तके मी वाचली आहेत.
वाचनाने मला घडवलं, मी समृद्ध झालो, माझा शब्दसंग्रह वाढला. आज त्याचा फायदा माझ्या जीवनात मला सर्वात जास्त होतो. दिवसाचा एक तास मी वाचनाला देतो. फावल्या वेळेत, प्रवास करतानाचा वेळ वाया न घालवता तो मी वाचनाला देतो.
मला १९९८ मध्ये राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत साक्षरता दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला होता. त्या वेळी त्यांनी शिका आणि शिकवा या विषयावर भाष्य करणारे पोस्टर तयार केले होते. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून दीड लाख स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी मी शाळेतील अक्षर गिरवयाची पाटी काढली होती आणि त्या पाटीला मानाचा फेटा गुंडाळला होता. त्यावर ‘ग्यान से मिळे सन्मान’ असे घोषवाक्य लिहिले होते. त्यास मला प्रथम पारितोषिक मिळाले होते. तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, उमा भरती, उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या उपस्थितीत मला बक्षीस प्रदान केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी देखील पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील जाहिराती स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे.