शहापूर : तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण यांनी शुक्रवारी येथे तातडीने भेट देऊन आश्रमशाळेसह वसतिगृहाची पाहणी केली. शाळेमध्ये वर्गावर जाऊन तसेच काही विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत त्यांनी याप्रकरणाची चौकशी केली. विशेष म्हणजे  विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतून दिले जाणारे जेवण व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वादही घेतला. दरम्यान, याप्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोग काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहापुर तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेतील १०९ विद्यार्थी बाहेरून आलेले वर्षश्राद्धाचे जेवण जेवले. यामुळे त्यांना उलटी, चक्कर, पोटदुखी असा त्रास झाला होता. बुधवारी झालेल्या या प्रकारामुळे शासकीय व प्रशासकीय यंत्रणांची एकच धावपळ उडाली होती. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करीत परिस्थिती आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या आश्रमशाळेला महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण यांनी शुक्रवारी भेट दिली. त्यांनी वर्गात जाऊन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी वैयक्तिकपणे संवाद साधला. तसेच संतप्त महिला पालकांनी त्यांच्यापुढे विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. मुलांना काही झाले असते तर याची जबाबदारी कोणाची, अशी विचारणा करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी साबणाची छोटी वडी महिन्यातून एकदाच दिली जाते, डोक्याला लावण्यासाठी सुट्ट्या बॉटल मध्ये तेल दिले जाते, अशा तक्रारी पालकांनी यावेळी केल्या.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवली शहरे वाहन कोंडी मुक्त करण्यासाठी प्रभावी उपाय करा; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वाहतूक पोलिसांना सूचना

आम्हाला कोणताही अधिकार नाहीत. संस्थाचालक सांगतात त्याप्रमाणे केले जाते. या शाळेवर महिन्यातून तब्बल १२ ते १५ वेळा जेवण बाहेरून दिले जाते, असे सांगून अधीक्षक एन. डी. अंभोरे यांनी खळबळ उडवून दिली. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नसताना आमच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला असल्याचे सांगत अधीक्षक अंभोरे व प्राथमिकच्या प्रभारी मुख्याध्यापिका सारीका गायकवाड यांनी याबाबत आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन दिले.  यावेळी प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, आदिवासी संघटनेचे नारायण केवारी उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the poisoning incident in sant gadge maharaj ashram school members of the state commission for protection of child rights inspected the ashram school amy